फ्युचर्स किमतीः सप्ताह- १६ ते २२ नोव्हेंबर २०२४
Cotton Market : कापूस, मका, मूग व सोयाबीन यांची आवक वाढत्या प्रमाणात सुरू आहे. मका व सोयाबीन यांची साप्ताहिक आवक गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. सोयाबीनच्या किमती अजूनही हमीभावापेक्षा कमी आहेत. जागतिक किमती नजीकच्या भविष्यात वाढण्याची शक्यता फार कमी आहे. भारतातील उत्पादनसुद्धा या वर्षी वाढलेले आहे. आता शासनातर्फे हमीभावाने खरेदी करण्याचे प्रमाण वाढण्याची जरूरी आहे.
वाढलेले उत्पादन व आवक यामुळे या सप्ताहात हळद व कांदा वगळता सर्व वस्तूंच्या किमती घसरल्या किंवा स्थिर राहिल्या. सर्वात अधिक घसरण तुरीच्या भावात झाली. कांद्याच्या किमती १४.६ टक्क्यानी वाढल्या तर हळदीच्या फ्युचर्स किमती ६ टक्क्यानी वाढल्या. कांद्याची आवक अजून समाधानकारक नाही; किंबहुना ती घसरत आहे. हळदीमध्ये पुन्हा सट्टेबाजी सुरू झाली आहे. मे महिन्याचे फ्यूचर्स भाव स्पॉटपेक्षा १५ टक्क्यांनी अधिक आहेत.
२२ नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेतः
कापूस/कपाशी MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात रु. ५४,७८० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा घसरून रु. ५४,२६० वर आले आहेत. जानेवारी फ्युचर्स भाव ०.१ टक्क्यांनी घसरून रु. ५५,८२० वर आले आहेत. मार्च भाव रु. ५७,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५ टक्क्यानी अधिक आहेत. कापसाची आवक वाढती आहे. NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात २.१ टक्क्यानी घसरून रु. १,४३७ वर आले आहेत. फेब्रुवारी फ्युचर्स रु. १,४६५ वर आले आहेत तर एप्रिल फ्युचर्स रु. १,५३१ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ६.५ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. ०.३ टक्क्यानी घसरून रु. २,४३८ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्युचर्स किमती रु. २,४५१ वर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स रु. २,४८१ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.८ टक्क्यानी अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात ३.८ टक्क्यानी वाढून रु. १४,१७२ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्युचर्स किमती ६.१ टक्क्यानी वाढून रु. १४,३६८ वर आल्या आहेत. एप्रिल किमती रु. १५,३२२ तर मे किमती १६,२७६ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १४.८ टक्क्यानी अधिक आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) या सप्ताहात २.२ टक्क्यानी घसरून रु. ६,७२५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) २.६ टक्क्यानी घसरून रु. ७,५५० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. किमती कमी होत आहेत.
सोयाबीन
या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ४,३४३ वर स्थिर आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.
तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) ३.९ टक्क्यानी घसरून रु. ९,५०४ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. नवीन पिकाची आवक जानेवारी अखेर सुरू होईल.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत या सप्ताहात १४.६ टक्क्यानी वाढून रु. ६,४१९ वर आली आहे. आवक मागणीपेक्षा कमी आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) घसरून रु. २,००० वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर स्थिर आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी : arun.cqr@gmail.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.