
Amaravati News : कलिंगडासह खरबुजाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना आता अमरावती फळ व भाजीपाला बाजारात हंगामी आंबा वाणाची आवक वाढती आहे. दररोज विविध जातीच्या आंब्याची एक हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होत असून मागणी असल्याने काहीसे दरही तेजीत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
अमरावती बाजार समितीअंतर्गत असलेला फळ बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे. रोज या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. अमरावती बाजारात आंध्र प्रदेश, तेलंगणासह देशाच्या विविध भागातून आंबा आवक होत आहे. महाराष्ट्रातूनही केसरसह इतर जातीच्या आंब्याची आवक होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केसर आंब्याची रोजची सरासरी आवक ११० क्विंटल इतकी आहे. याचे दर सर्वाधीक ७००० ते ८००० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
आंध्र प्रदेशातून आवक होणाऱ्या बैगणफल्ली (बांगनापल्ली) आंब्याचे दर ३००० ते ४००० रुपये क्विंटल इतके असून याची आवक मात्र इतर जातीच्या आंब्याच्या तुलनेत सर्वाधीक २५० क्विंटल नोंदविण्यात येत आहे. विशेष म्हणजे हंगामात सर्वात आधी बैगणफल्ली आंब्याचीच आवक झाली होती. या आंबा वाणाला भौगोलिक मानांकन देखील मिळालेले आहे. स्थानिक आंबा वाणाची आवक १२४ क्विंटल इतकी आहे.
याचे दर ३२०० ते ४२०० रुपये याप्रमाणे होते. काही आंबा वाणावर लालपट्टा राहतो. त्याला लालपट्टा नावानेच ओळखले जात त्याचे व्यवहार होतात. सद्या लालपट्टा आंबा वाणाची आवक १२० क्विंटल इतकी होत आहे. याचे दर ३००० ते ४००० रुपयांप्रमाणे होते. दसेहरी आंबा वाणाची नियमित १२० क्विंटल आवक नोंदविली जात आहे. याचे दर ३००० ते ४००० रुपये असे होते.
दक्षिण भारतातील आंबा वाण अशी ओळख असलेल्या तोतापुरी आंबा वाणाची ११० क्विंटल इतकी सरासरी आवक आहे. याचे दर सर्वात कमी २००० ते २५०० रुपये क्विंटलचे होते. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या भागातून या आंबा वाणाची आवक होत असल्याचे सांगण्यात आले.
काही भागात या आंब्याला बंगलोरा किंवा संदेरशा या नावानेही ओळखले जाते. महाराष्ट्रात मात्र याची विक्री तोतापुरी या नावाने होते. लांबट आकार आणि चोचीसारखे टोक असल्याने तोतापुरी असे याचे नामकरण असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
नागपूरची दुसरी मोठी बाजारपेठ असलेल्या कळमना बाजारात तोतापुरी आंब्याची आवक १००० क्विंटल इतकी आहे. ३००० ते ४००० रुपयांनी याचे व्यवहार होत आहे. स्थानिक आंबा वाण आवक ३००० क्विंटल इतकी असून दर ४००० ते ४५०० रुपयांवर आहेत.
हापूसला वाढली मागणी
देवगडसह इतर विविध जातीच्या हापूस आंब्याची देखील ग्राहकांची मागणी आहे. अमरावती बाजारात रोजची हापूस आंबा आवक ११० क्विंटल असल्याची माहिती देण्यात आली. याचे व्यवहार १०,००० ते १२,००० रुपये क्विंटलने होत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांकडून हापूसला अधिक मागणी असल्याचे देखील व्यापाऱ्यांनी सांगितलेच.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.