
पुणेः देशात रब्बी ज्वारीची पेरणी (Jowar Sowing) आता सुरु झाली. मात्र बाजारात ज्वारीचे दर (Jowar Rate) मागील महिनाभरात चांगलेच वाढले. दर वाढूनही ज्वारीची बाजारातील आवक घटली. त्यामुळं सध्या ज्वारीला ३ हजार ते ५ हजार ६०० रुपये दर मिळत आहे. दरातील ही वाढ कायम राहण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
पौष्टीक अन्न म्हणून जगात ज्वारीला मागणी वाढतेय. मागील हंगामात ज्वारीचं जागतिक उत्पादन ६२३ लाख टन झालं होतं. ते यंदा ६०३ लाख टनांपर्यंत कमी होणार आहे. जगात ज्वारी उत्पादनात अमेरिका पुढे असतो. मात्र यंदा अमेरिकेचं ज्वारी उत्पादन मागील हंगामातील ११३ लाख टनांवरून जवळपास निम्म्यानं कमी होऊन ६२ लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं व्यक्त केला.
त्यामुळं यंदा नायजेरिया जगातील सर्वात मोठा ज्वारी उत्पादक ठरणार आहे. नायजेरियात यंदा ७० लाख टन ज्वारी उत्पादन होऊ शकते. तर भारत ज्वारी उत्पादनात जागतिक पातळीवर सहाव्या क्रमांकावर राहणार आहे. भारतापेक्षा यंदा नायजेरिया, अमेरिका, सुदान, मेक्सिको आणि इथोपिया या देशांमध्ये जास्त ज्वारी उत्पादन होतं.
देशाच्या विचार करता खरिप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात ज्वारी उत्पादन घेतलं जातं. मागील हंगामात देशात ४२ लाख टन ज्वारी उत्पादन झालं होतं. तर यंदा उत्पादन ४४ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारने खरिपात ३० लाख टन उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं होत.
गेल्या खरिपातील ज्वारी उत्पादन १६ लाख होतं. सरकारने पहिल्या अंदाजात जवळपास १७ लाख टनांवर उत्पादन स्थिरावेल असं म्हटल आहे. पण यंदा उत्तर भारतातील महत्वाच्या खरिप ज्वारी उत्पादक राज्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाचा ज्वारीला मोठा फटका बसला. त्यामुळं खरिपातील उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.
देशातील स्थिती
देशात ज्वारी उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून जवळपास ३० ते ३५ टक्के उत्पादन होतं. महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा जास्त असतो. मात्र यंदा रब्बी हंगामातील ज्वारी पेरणी अडचणीत आली आहे. देशात रब्बीचा पेरा साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात सुरु होतो. मात्र ऑक्टोबर महिन्यात सलग १५ ते २० दिवस पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पिकांच्या काढणीला उशीर झाला. त्यामुळं ज्वारीच्या पेरण्या एक महिना उशीरा सुरु कराव्या लागल्या. त्यामुळं आत्तापर्यंत ज्वारीचा पेरा जवळपास २५ टक्क्यांनी कमी झाला आहे.
दराची स्थिती
राज्यात रब्बी ज्वारी पेरणीत सोलापूर, नगर, सांगली, कोल्हापूर, जळगाव, नाशिक ही महत्वाचे जिल्हे मानले जातात. मात्र या जिल्ह्यांमध्येही रब्बी पेरणीला उशीर झाला. त्यामुळे ज्वारीचा पेरा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेरणीला होणारा उशीर आणि घटणारं क्षेत्र यामुळं सध्या ज्वारीचे दर तेजीत आहेत. राज्यात ज्वारीला प्रतीनुसार ३ हजार ते ५ हजार ६०० रुपयांचा दर मिळत आहे. बाजारात ज्वारीची आवकही सध्या घटल्याचं नगर येथील ज्वारीचे व्यापारी शांतीलाल गांधी यांनी सांगितलं.
दरवाढ कायम राहणार
ज्वारीच्या दरात मागील महिनाभरात क्विंटलमागे ५०० ते १ हजार रुपयांची वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. सोलापूरसह काही जिल्ह्यांमध्ये आजही ज्वारीच्या पेरण्यांनी वेग घेतलेला नाही. पेरणीला उशीर होत असल्यानं शेतकरी हरभरा आणि गहू पेरणीला पसंती देत आहेत. त्यामुळं यंदा राज्यातील रब्बी ज्वारीचा पेरा घटण्याचा अंदाज आहे. असं झाल्यास उत्पादनही कमी राहील. उत्पादन घटलं तर ज्वारीच्या दरातील वाढ कायम राहील, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.