Kolhapur News : साखरेच्या निर्यातीवरील बंधने कडक करताना यंदाच्या हंगामात साखर निर्यातीला परवानगी मिळण्याच्या शक्यता आणखी धूसर बनवली आहे. ३१ ऑक्टोबरनंतरही साखरेवरील निर्यातीची बंदी कायम ठेवली आहे.
या निर्णयामुळे साखर उद्योगाची निराशा झाली आहे. जागतिक बाजारात विक्रमी दरवाढ होत असताना देशातील कारखान्यांना मात्र या दरवाढीचा काहीच फायदा होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
कच्ची साखर, शुद्ध साखर, पांढरी साखर आणि सेंद्रिय साखर या पैकी कोणतीच साखर येथून पुढील काळात निर्यात होणार नाही. शासनाच्या या निर्णयामुळे यंदाच्या हंगामात साखर देशाबाहेर जाणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. कारखान्यांना आपला आर्थिक ताळेबंद सुधारण्यासाठी आता देशांतर्गत विक्रीवरच भिस्त ठेवावी लागणार आहे.
साखरेच्या दरात नुकत्याच झालेल्या वाढीनंतर सरकारने साखर कंपन्यांना १२ ऑक्टोबरपर्यंत उत्पादन, डिस्पॅच, डीलर, किरकोळ विक्रेता आणि विक्रीची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले होते. तसे न केल्यास कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले होते. यानंतर केंद्राने बंदी कायम ठेवली आहे.
सध्या सणासुदीच्या दिवसांमुळे साखरेला मागणी वाढत आहे. किरकोळ बाजारात साखरेचे दर ४३ ते ४४ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे केंद्राने ऑगस्टपासूनच सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे.
कारखान्यांना सातत्याने साखरेचे वाढीव कोटे देऊन साखरेची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले. गेल्या हंगामातील साखरेच्या निर्यातीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत होती. पण त्या पूर्वीच कारखान्यांनी साखर निर्यात केली होती. देशातील साखर हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे.
पण अजूनही महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या आघाडीच्या राज्यांतील हंगाम सुरू होण्यास किमान पंधरा दिवसांचा कालावधी आहे. या राज्यांतील साखर उत्पादन किमान पंचवीस टक्क्यांपर्यंत घटेल असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सावध पवित्रा घेताना निर्यात बंदी वाढविली आहे. या हंगामात निर्यातीला परवानगी देण्याचा कोणताही विचार सध्या नसल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.
तोटा महाराष्ट्र, कर्नाटकचाच
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशचे वर्चस्व असले तरी निर्यातीमध्ये मात्र महाराष्ट्र, कर्नाटकचेच वर्चस्व असते. जास्तीत जास्त निर्यात याच राज्यांतून होत असते. यामुळे या निर्यातबंदीचा फटका या राज्यांना सर्वाधिक बसू शकतो.
उत्तरेकडील राज्ये वाहतुकीस स्वस्त पडत असल्याने साखर उत्तर प्रदेशकडून विकत घेतात. यामुळे उत्तर प्रदेशला निर्यातबंदीचा फारसा तोटा होत नाही. बंदरे जवळ असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक निर्यातीला प्राधान्य देतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.