Commodity Market : हळद, टोमॅटो वगळता सर्व पिकांच्या भावात वाढ

Turmeric Tomato Market Update : हळदीच्या किमतीतील तेजी आता कमी होऊ लागली आहे. हळदीच्या स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे. त्यामुळे फ्यूचर्स मार्केटमध्ये विकणे अजूनही किफायतशीर आहे.
Turmeric Rate
Turmeric RateAgrowon

फ्यूचर्स किमती सप्ताह ः २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर, २०२३

भारतीय हवामानशास्त्र विभागाने सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीइतका पाऊस होण्याचा अंदाज दिला असला तरी राज्यात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. पाऊसमान कमी राहण्याच्या भीतीने प्रमुख शेतीमालाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

हळदीच्या किमतीतील तेजी आता कमी होऊ लागली आहे. हळदीच्या स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे. त्यामुळे फ्यूचर्स मार्केटमध्ये विकणे अजूनही किफायतशीर आहे. मात्र हा फायदा आता लवकरच संपू शकेल.

या सप्ताहात हळद व टोमॅटो वगळता सर्व पिकांच्या भावात वाढ झाली. हरभऱ्यातील तेजी संपत आल्याचे संकेत मिळत आहेत. टोमॅटोची आवक गेल्या सप्ताहापेक्षा ५५ टक्क्यांनी वाढल्यामुळे किमती घटल्या आहेत. कांद्याच्या किमती जवळ जवळ २ टक्क्याने वाढल्या.

१ सप्टेंबर पासून NCDEX मध्ये फक्त मक्यासाठी नवीन व्यवहार (जानेवारी डिलिवरी) सुरू झाले. कापसासाठी सध्या MCX मध्ये नोव्हेंबर व जानेवारी साठी आणि कपाशीसाठी नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल साठी व्यवहार सुरू आहेत. NCDEX मध्ये मक्यासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी डिलिवरी आणि हळदीसाठी ऑक्टोबर व डिसेंबर डिलिवरी व्यवहार सुरू आहेत.

Turmeric Rate
Cotton Value Addition : कापूस पिकामध्ये मूल्यवर्धन महत्त्वाचे

१ सप्टेंबर रोजी संपणाऱ्या सप्ताहातील किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी ः

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात १.४ टक्क्यांनी घसरून रु. ६०,०८० वर आले होते. या सप्ताहात ते १.८ टक्क्यांनी वाढून रु. ६१,१६० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव ३.८ टक्क्याने वाढून रु. ६१,४०० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. ५८,५०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ४.३ टक्क्यांनी कमी आहेत. कापसाचे भाव वाढण्याचा कल आहे. आवक कमी होत आहे.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,५२२ वर आले होते. या सप्ताहात ते १.७ टक्क्यांनी वाढून रु. १,५४८ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५५२ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ०.२ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. कपाशीचे फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत.

Turmeric Rate
Maize Market : मका उत्पादकांना ‘ऊर्जा’ मिळेल?

मका ः

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात रु. २,०८० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्याने वाढून रु. २,०८५ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (ऑक्टोबर डिलिवरी) किमती रु. २१०५ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. २,१३१ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

हळद ः

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निझामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात ३.५ टक्क्यांनी वाढून रु. १४,६३२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.६ टक्क्यांनी घसरून रु. १४,२४८ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती ६.६ टक्क्याने घसरून रु. १५,११४ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. १५,९१६ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या ११.७ टक्क्यांनी जास्त आहेत. हळदीमधील तेजी कमी होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.

Turmeric Rate
Turmeric Market : हिंगोलीत हळदीला ११००० ते १४५०० रुपयांचा दर

हरभरा ः

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ३ टक्क्यांनी घसरून रु. ५,६७५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ८.४ टक्क्यांनी वाढून रु. ६,१५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव

रु. ५,३३५ आहे. गेल्या तीन महिन्यात हरभऱ्याचे भाव सातत्याने वाढत आहेत.

मूग ः

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) गेल्या सप्ताहात ५.७ टक्क्यांनी वाढून रु. ८,३०० वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ६ टक्क्यांनी वाढून रु. ८,८०० वर आली आहे. मुगाची आवक गेल्या काही सप्ताहात वाढत होती; आता ती घसरू लागली आहे. गेल्या हंगामापेक्षा या वर्षी ती कमी झाली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.

सोयाबीन ः

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ५,०२५ वर आली होती. या सप्ताहात ती २ टक्क्यांनी वाढून रु. ५,१२५ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर ः

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात ५.३ टक्क्यांनी वाढून रु. १०,०४२ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ३.२ टक्क्यांनी वाढून रु. १०,३५९ वर आली आहे. तुरीचा नवीन हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीच्या भावात तेजी आहे. आवक कमी आहे; पुढील वर्षाचे उत्पादन अनिश्चित आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com