Pulses Rate : डाळींसह धान्याच्या भावात सुधारणा

Pulses Market : देशातील बहुतांश भागात मॉन्सून दाखल व्हायचा आहे. पेरण्याही रखडल्या. खरिपाची पेरणी आतापर्यंत ४२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे.
Pulses
Pulses Agrowon
Published on
Updated on

Pune News : देशातील बहुतांश भागात मॉन्सून दाखल व्हायचा आहे. पेरण्याही रखडल्या. खरिपाची पेरणी आतापर्यंत ४२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. यामुळे डाळींसह धान्याच्या भावात सुधारणा झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तूर आणि उडीद डाळीचे भाव महिनाभरात ५ ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत.

पण या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. कारण कडधान्य आणि धान्य शेतकऱ्यांनी आधीच विकले. अगदी मोजक्या शेतकऱ्यांकडे माल आहे. तर भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने आर्थिक फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने देशात अन्नधान्याच्या दरात सुधारणा झाली. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळींचे भाव वाढले आहेत. विशेष म्हणजे गहू आणि डाळींचे भाव नियंत्रणात राहावेत यासाठी सरकारने मोठे प्रयत्न केले. पण भाव कमी होण्याचे नाव घेईना.

जूनचा शेवटचा आठवडा आला तरी देशातील बहुतांश भागात पाऊस नाही. चक्रीवादळामुळे राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील काही भागांत पाऊस झाला. आसामध्ये पूरस्थिती आहे. पण मॉन्सून या भागात पोहोचलेला नाही. बिपॉरजॉय चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे ही स्थिती निर्माण झाली.

Pulses
Food Grain Market : अन्नधान्य बाजारात पुरवठावाढीच्या भीतीने घसरण

खरिपातील पेरण्यांचा विचार करता गती मंदावलेलीच आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २४) देशात ७९ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला. मागीलवर्षी म्हणजेच २३ जून २०२२ रोजी देशात १३६ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. याचाच अर्थ असा की गेल्यावर्षीपेक्षा यंदाची पेरणी तब्बल ४२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे.

भात उत्पादनासाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असतो. पण आतापर्यंत भाताची लागवड ३५ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. गेल्या हंगामापेक्षा आतापर्यंत ६ लाख हेक्टरने क्षेत्र कमी असून जवळपास ११ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली.

भरडधान्याची लागवडही जवळपास १८ लाख हेक्टरवर झाली असून गेल्यावर्षीपेक्षा ३८ टक्क्यांनी कमी आहे. कडधान्यामध्ये तुरीची लागवड तब्बल ६६ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या हंगामात याच काळात १ लाख ८० हजार हेक्टरवर तुरीचे पीक होते. पण यंदा केवळ ६२ हजार हेक्टरवर लागवड झाली.

Pulses
Pulses Crop Update : कडधान्य पिकांसाठी जिवाणू संवर्धकांचा वापर

भात, भरडधान्य पिकांची लागवड पिछाडीवर

खरिपातील भात आणि भरडधान्य पिकांची लागवड पिछाडीवर आहे. त्यातच बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे डाळींसह धान्याच्या दरात वाढ झाली आहे. ही वाढ ५ ते १५ टक्क्यांपर्यंत आहे. सरकारने गव्हावर स्टॉक लिमिट लावले पण असे असूनही गव्हाच्या भावात घट झाली नाही.

तर तुरीचे भाव एक जूनपासून सुधारलेले दिसतात. बहुतांश बाजारांत तुरीचे भाव १०,५०० रुपयांवर पोहोचले. तर डाळीनी अनेक ठिकाणी १५० रुपयांचा टप्पा गाठला. उडदाची डाळही ११० ते १२० रुपयांच्या दरम्यान आहे.

ज्वारीच्या भावात अनेक बाजारांत मागील एक महिन्यात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर बाजरीच्या भावातही २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली. पाणी टंचाईमुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी मंदीत असलेला टोमॅटो आता भाव खातोय. पालेभाज्यांचे भावही चांगलेच वाढले आहेत.

पावसाकडे लक्ष

देशातील बहुतांश भागांत जूनच्या शेवटी पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. पण हवामानात बदल झाल्यास त्यात बदलही होऊ शकतो. तसेच पेरणीयोग्य पाऊस कधी पडेल, याची चिंता शेतकऱ्यांना आहे.

चांगला पाऊस होऊन खरिपाच्या पेरण्या सुरू होईपर्यंत तरी दरातील वाढ कायम राहील. त्यानंतर उत्पादन किती होते, याकडेही बाजाराचे लक्ष राहील, असे अभ्यासकांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com