Pulses Crop Update : कडधान्य पिकांसाठी जिवाणू संवर्धकांचा वापर

Indian Agriculture : नत्र,स्फुरद आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणू संवर्धकांचा वापर फायदेशीर आहे. वातावरणामध्ये सुमारे २० टक्के प्राणवायू आणि ७८ टक्के मुक्त नत्र वायुरूपात अस्तिवात आहे.
Pulse Production
Pulse Production Agrowon
Published on
Updated on

डॉ. दीपाली कांबळे

Nutrient availability : नत्र,स्फुरद आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणू संवर्धकांचा वापर फायदेशीर आहे. वातावरणामध्ये सुमारे २० टक्के प्राणवायू आणि ७८ टक्के मुक्त नत्र वायुरूपात अस्तिवात आहे.

या मुक्त नत्राचा उपयोग स्वत:करिता करून घेण्याची क्षमता कडधान्य आणि द्विदल तेलबिया पिकांमध्ये आहे. रायझोबियम जीवाणू वातावरणातील नत्र शोषून मुळांच्या गाठीमध्ये एकवटून विकराच्या मदतीने मुक्त नत्राचे रूपांतर रासायनिक नत्रामध्ये करतात. पिके त्याचा उपयोग करतात.

सूक्ष्म जिवाणूंनी स्थिर केलेल्या नत्रापैकी ९० टक्के नत्र पिकांना उपलब्ध होते. पीक काढणीच्या वेळी मुळांवरील गाठी जमिनीत राहत असल्याने सुमारे १० टक्के नत्र जमिनीत मिसळते. हे नत्र दुसऱ्या पिकास उपयोगी पडते.

यासाठी कडधान्य पिकाच्या मुळांच्या सानिध्यात असलेल्या जमिनीत रायझोबियम या सूक्ष्म जीवाणूंची संख्या योग्य प्रमाणात असावी. नत्र स्थिरीकरण करणारे रायझोबियम प्रयोगशाळेत वाढवून संवर्धक निर्मिती केली जाते.

रायझोबियम जिवाणूंचे उपयुक्ततेनुसार सात गट पडतात. एका गटाचे जिवाणू दुसऱ्या गटाला उपयोगी पडत नाहीत. त्यामुळे बियाण्याला जीवाणू संवर्धक वापरताना ते कोणत्या गटाचे आहे हे पाहावे. प्रत्येक गटाप्रमाणे जिवाणू संवर्धक बियाण्यास प्रक्रिया केल्यास भरपूर प्रमाणात नत्र स्थिर केले जाते, नत्र खताची बचत होते.

Pulse Production
Nutrient Management : अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करण्याची सोपी पद्धत

रायझोबियम जिवाणू संवर्धकाचा वापर

- विविध कडधान्य गटांसाठी वेगवेगळे संवर्धक वापरावे.

- पिशवीवरील अंतिम तारखेपूर्वी संवर्धक वापरावीत.

- पाकिटे सावलीत ठेवावीत. कोणत्याही रासायनिक खतांमध्ये जिवाणू संवर्धक मिसळू नये.

- दर दिवशी जेवढे बियाणे पेरणीसाठी आवश्यक आहेत तेवढ्याच बियाण्याला प्रक्रिया करावी.

जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया

- प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम जिवाणू संवर्धक वापरावे.

- बियाणे १० मिनिटे पाण्यात भिजवावे.

- एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ मिसळावा. हे द्रावण उकळून थंड करावे. चिकट झाल्यानंतर त्या द्रावणाच्या साह्याने संवर्धक बियाण्यास चोळावे.

- भिजवलेले बियाणे बारदाना किंवा ताडपत्रीवर पसरून त्यावर संवर्धकाची प्रक्रिया करावी.

- सर्व बियाण्यास संवर्धक सारख्या प्रमाणात लागेल याची काळजी घ्यावी.

- बियाणे सावलीत वाळवून शक्य तितक्या लवकर पेरावे.

रायझोबियम जीवाणूंचे गट

गटाचे नाव - पिके

वाटाणा गट - वाटाणा, मसूर, लाख

घेवडा गट- घेवड्याचे विविध प्रकार.

बरसीम गट - बरसीम घास

अल्फा अल्फा गट - लसूण घास, मेथी

हरभरा गट - हरभरा

सोयाबीन गट सोयाबीन

चवळी गट - चवळी, भुईमूग, तूर, उडीद, मूग, वाल, मटकी, गवार, ताग, बोरू इ

संपर्क - डॉ. दीपाली कांबळे, ९३०७१६३९३९, (विषय विशेषज्ञ,कृषी विज्ञान केंद्र,बदनापूर,जि.जालना)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com