Onion Market Update नाशिक : कांद्याचे विक्री दर (Onion Rate) कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला २,२०० ते २,६०० रुपये प्रति क्विंटल दर (Onion Market Rate) मिळत होता.
या वर्षी मात्र हे दर ५०० ते ६०० रुपयांपर्यंत खाली कोसळले आहेत. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादकांना साह्य करावे, अशी मागणी किसान सभेने मुख्यमंत्र्यांना खुले पत्र लिहून केली आहे.
पत्रात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान ६०० रुपये अनुदाना (Onin Subsidy) बरोबरच परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी अपेक्षित इतर उपायांबाबत आग्रह धरण्यात आला आहे.
किसान सभेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की बांगलादेशाने कांदा आयातीवर मोठ्या प्रमाणात कर लादल्याने या देशात होणारी मोठी कांदा निर्यात अशक्य झाली आहे.
केंद्र सरकारच्या स्तरावर या बाबत काही पावले उचलली गेल्यास बांगलादेशामध्ये होणारी कांदा निर्यात पुन्हा एकदा व्यवहार्य बनविता येईल. केंद्र सरकारने याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
फिलिपिन्स, थायलंडसारख्या देशांमध्ये कांद्याचे भाव खूप उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. या देशांबरोबर संवाद साधून देशातील कांदा रास्त दरामध्ये या देशांना पाठविता येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
देशभरातील इतर राज्यांना संपर्क करून देशांतर्गत बिगर कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांदा पोहोचविण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
पाकिस्तानबरोबर बिघडलेल्या संबंधांमुळे पाकिस्तानला होणारी कांदा निर्यात ठप्प झाली आहे. पाकिस्तानला सध्या दुबईमार्गे कांदा जात आहे. दुबईबरोबर भारताचा व्यापार, काही कारणांमुळे तणावग्रस्त झाला आहे.
दुबईला यामुळे होणारी कांदा निर्यात बंद आहे. राज्यकर्त्या पक्षाच्या भूमिकांचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतो आहे.
राजकीय शिष्टाईच्या माध्यमातून दुबईला पुन्हा कांदा निर्यात सुरू झाल्यास कांद्याचे देशांतर्गत दर स्थिर करण्यात मोठी मदत होणार आहे.
शिवाय कांदा निर्यातीबाबतच्या सातत्याच्या धरसोडीच्या धोरणामुळे आपले जागतिक कांदा ग्राहक दुखावले गेले आहेत.
आगामी काळात याबाबत योग्य सुधारणा करण्याची हमी देऊन या दुरावलेल्या ग्राहकांना पुन्हा एकदा आपलेसे करणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारने या सर्व उपाय योजनांसाठी रास्त भूमिका बजावण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी किसान सभेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावित, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.