Kolhapur News : यंदाच्या हंगामात राज्यातील २०६ पैकी ११२ साखर कारखान्यांची एफआरपी अद्यापही प्रलंबित आहे. केंद्र सरकाच्या धोरणांमुळे अडचणीत आल्याने शेतकऱ्यांना एफआरपी देणे अडचणीचे जात आहे, असे कारखाना प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
३१ जानेवारी अखेरच्या अहवालानुसार ९४ साखर कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिली आहे. ४९ साखर कारखान्यांनी ८० ते ९९ टक्यापर्यंत, ३३ कारखान्यांनी ६० ते ८० टक्क्यांपर्यंतची रक्कम, तर ३० कारखान्यांनी ६० टक्क्यापर्यंतची रक्कम दिली आहे. एका कारखान्यावर आरआरसी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
यंदाचा हंगाम नोव्हेंबरला सुरू झाला. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने नोव्हेंबरच्या अखेरीस पूर्ण क्षमतेने सुरू झाले. हंगाम किमान महिनाभर लांबला. जानेवारी अखेर ५७० लाख टन उसाचे गाळप झाले. ऊस तोडणी वाहतूक खर्च वगळता ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम १३ हजार २५९ कोटी रुपये इतकी झाली.
या पैकी १२ हजार ७८१ कोटी रुपयांचे वितरण या कालावधीत झाले. अजूनही ४७८ कोटी रुपयांची शेतकऱ्यांची देणी कारखान्यांनी उत्पादकांना दिली नाहीत. देय रकमेच्या ९१ टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
सध्या हंगाम अंतिम टप्प्यात येत असला तरी साखरेचे दर फारसे नसल्याने ऊस उत्पादकांना एफआरपी देण्यात अडचणी येत असल्याची माहिती कारखाना सूत्रांनी दिली. दिवाळीत काहीसे दर वाढले होते. त्यानंतर मात्र किमान आधारभूत मूल्यापेक्षा (एमएसपी) १०० ते ३०० रुपयापर्यंतच दर वाढले. केंद्राने सातत्याने निर्बंध आणल्याने साखरेच्या बाजारात तेजी आली नाही.
स्थानिक बाजारात दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्राने साखर कोट्यावर नियंत्रण ठेवून अधिकाधिक साखर बाजारात उपलब्ध होईल, अशी दक्षता घेतली. साखर पुरेशी उपलब्ध झाल्यामुळे दरात वाढ होण्याची शक्यता कमी झाली.
भरीस भर म्हणून इथेनॉल निर्मितीवरही बंधने आणली. यामुळे कारखान्यांचे इथेनॉल प्रकल्पही अडचणीत आले. या सर्व घटकांचा प्रतिकूल परिणाम कारखान्यांवर होत आहे. यामुळे कारखान्यांना एफआरपी देण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.
एफआरपी देण्यात पश्चिम-दक्षिण महाराष्ट्र आघाडीवर
एफआरपी देण्यात पश्चिम- दक्षिण महाराष्ट्रातील साखर कारखाने आघाडीवर आहेत. स्पर्धेत टिकून राहण्याकरिता जादा कर्जे काढून शेतकऱ्यांच्या रकमा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कारखाना प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
इथेनॉलकडे जादा साखर वळविण्यास परवानगी द्या
शिल्लक एफआरपी वेगात मिळण्याकरिता केंद्राने किमान इथेनॉलकडे जादा साखर वळविण्याला परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगातून होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.