औरंगाबाद : ‘स्मार्ट कॉटन’ प्रकल्पांतर्गत (SMART Cotton Project) ‘महाकॉट’ ब्रॅण्ड डेव्हलपसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यांतर्गत शिरोडीतील शेतकऱ्यांनी प्रकल्पामधून मूल्यवर्धनासाठी (Cotton Value Addition) कापसाऐवजी त्यावर प्रक्रिया (Cotton Processing) करून ‘रुई’ गाठी (Cotton Bales) साठविण्याची तयारी केली आहे. या सर्व प्रक्रियेत कृषी विभाग शेतकरी, जिनिंग मिल व वखार महामंडळामध्ये समन्वयकाच्या भूमिकेत आहे. कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचेही मार्गदर्शन घेतले जात आहे.
राज्याचा ‘महाकॉट’ ब्रॅण्ड डेव्हलप करण्यासाठी गेल्या वर्षीपासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत. गतवर्षी अति पावसामुळे शेतकऱ्यांनी कापसापासून रुईगाठी तयार करून मिळालेल्या चढ्या दरात कापूस विकणेच पसंत केले. त्यामुळे शेतकऱ्यांनीच आपल्या कापसावर किमान प्रक्रिया करून तो साठवून आपल्या मालाच्या मूल्यवर्धनाचा प्रश्न लटकला होता. यंदाही अतिवृष्टीमुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले. परंतु शिरोडीतील शेतकऱ्यांनी यंदा कापसाऐवजी रुईगाठी तयार करून साठविण्याचा निर्णय घेतला आहे.
‘स्मार्ट कॉटन’ प्रकल्पात सहभागी गंगापूर तालुक्यातील १२ गावांपैकी भेंडाळा गावाला भेट देऊन स्मार्ट प्रकल्पाचे संचालक दशरथ तांभाळे यांनी कापूस उत्पादकांशी संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांना कापसावर किमान प्रक्रिया करत साठवून ठेवल्याने होणाऱ्या फायद्याचे अर्थकारण समजावून सांगितले. तेव्हापासून महाकॉट ब्रॅण्ड डेव्हलप करण्याच्या कामाला गती मिळाली.
शिवाय शिरोडीतील शेतकऱ्यांना नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्रात प्रशिक्षणही देण्यात आले. शिरोडीत नुकतेच वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, गंगापूरचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांच्यासह कृषी सहायक विठ्ठल चव्हाण यांच्या उपस्थितीत एकूणच प्रकल्पाविषयी बैठक झाली. या बैठकीला ४० शेतकरी शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीत किमान १०० रुईगाठी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर याविषयी तुर्काबाद येथील रिद्धी-सिद्धी जिनिंग मिलच्या प्रमुखांशी प्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चाविषयी बैठक घेण्यात आली. आता तयार होणाऱ्या रुईगाठी वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये साठविण्यासाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. जागा निश्चित झाल्यास पुढील आठवड्यात कापसावर प्रक्रिया करण्याविषयी पावले उचलली जातील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.