
नागपूर : हिवाळा असतानाही मार्गशीष महिन्यामुळे मागणीत (Egg Demand) घट झाल्याने अंड्याच्या दरात (Egg Rate) घसरण झाली होती. मात्र आता दर काहीसे वधारत असून, १०० अंड्यांना ५४५ असा भाव मिळत असल्याची माहिती पोल्ट्री व्यवसाय (Poultry Industry) क्षेत्रातील सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रात रोजची अंडी मागणी दोन ते अडीच कोटींच्या घरात आहे. राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकांकडून मागणीच्या तुलनेत केवळ दीड कोटी अंडी उत्पादन होते. एक कोटीपेक्षा अधिक अंड्यांचा तुटवडा राज्यात भासतो. राज्याची सर्वाधिक गरज हैदराबाद भागातून येणाऱ्या अंड्यांवर भागविली जाते.
सध्या ७५ लाख अंडी हैदराबाद येथून महाराष्ट्रात पुरवठा होतात, अशी माहिती नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटीकडून देण्यात आली. मागणी आणि पुरवठ्यात तफावत असतानाही हैदराबाद येथून पुरवठा होणाऱ्या अंड्यांमुळे राज्यातील दर दबावात राहतात. त्यामुळेच स्थानिक पोल्ट्री व्यवसायिकांना अपेक्षित दर मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
५०० ते ५१० रुपये १०० नग याप्रमाणे अंडी दर मिळत होता. मार्गशीष असल्याने पुरवठा कमी आणि त्यातही हिवाळा असताना घाऊक दर कमी असल्याची माहिती देण्यात आली. मार्गशीष महिन्यानंतर गुरुवारी (ता. २२) अंड्यांना १०० नगासाठी ५४५ रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यामुळे येत्या काळात अंड्यांच्या दरात सुधारणा होईल, अशी आशा पोल्ट्री व्यवसायिकांना आहे.
मार्गशीष महिन्यामुळे हिवाळ्यातही अंड्याची मागणी प्रभावीत झाली होती. पोषक आहार म्हणून अंड्यांना हिवाळ्यात सर्वाधिक मागणी राहते. हाच नफा कमविण्याचा काळ पोल्ट्री व्यवसायिकांसाठी असतो. यंदा मात्र मार्गशीष महिन्यामुळे दर कमी झाले. यापुढील काळात बाजार तेजीत राहील, अशी अपेक्षा आहे.
-श्याम भगत, समन्वयक, नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.