Dragon Fruit: 'ड्रॅगन फ्रुट'च्या शेतीचा एवढा बोलबाला का?

महाराष्ट्रातही (Maharashtra) अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) शेती करत आहेत. हे फळ खूपच चर्चेत आलंय. पण या फळात असं नेमक काय आहे की या विदेशी फळाचा आपल्या मार्केटमध्ये बोलबाला झालाय.
Dragon Fruit
Dragon Fruit Agrowon

गुजरात (Gujrat Government) सरकारने जानेवारी २०२१ मध्ये ड्रॅगन फळाचे (Dragon Fruit) नाव 'कमलम' (Kamlam) असे ठेवलंय. हे फळ कमळासारखं दिसतंय म्हणून त्याचं हे बारसं केलंय. गुजरातमधील कच्छ आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तशी मागणी केली होती.

या जिल्ह्यांत ड्रॅगन फळाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जातेय. तिथला अनुभव बघून गुजरात सरकारने ड्रॅगन फ्रुटची शेती करण्यासाठी भरघोस मदत देऊ केलीय.

महाराष्ट्रातही अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत. हे फळ खूपच चर्चेत आलंय. पण या फळात असं नेमक काय आहे की या विदेशी फळाचा आपल्या मार्केटमध्ये बोलबाला झालाय. त्याचं मुख्य कारण म्हणजे या फळात असणारे पोषक तत्व. ड्रॅगन फ्रूट म्हणजे आरोग्याचा खजिना असल्याचे दावे केले जातात.

ड्रॅगन फ्रूटची साल अतिशय पातळ व गर लाल व पांढऱ्या रंगाचा असून हे फळ चवीला गोड असतं. या फळात अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि भरपूर फायबर आढळतात. हे फळ मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या आजारांशी लढण्यास मदत करत अस म्हंटल जातं.

यामध्ये भरपूर लोह आढळते, त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. काही वर्षांपूर्वी डेंग्युची साथ आली होती, तेव्हा ड्रॅगनफ्रुटची मागणी एकदम वाढली होती. रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी या फळाचं सेवन फायदेशीर ठरत असल्याचा दावा केला जातो.या अशा दाव्यांमुळे देशी मार्केट मध्येही या फळाला मागणी वाढली.

आता मागणी वाढली म्हणल्यावर याचं पीक घेणंही आलंच. आपल्या देशातही या फळाची शेती सुरू झाली. हे फळ खरं तर देशी नाहीच. परदेशातून ते आपल्याकडं आलंय. उष्ण कटिबंधात आढळणार हे फळ आहे. घायपातासारख्या निवडुंगावर उगवणाऱ्या या फळाचं मूळ सापडतं अमेरिकेत.

काही शतकांपूर्वी मध्य अमेरिकेत या फळाचा शोध लागला. त्यानंतर हे फळ ऑस्ट्रेलिया, मध्य पूर्व आणि आशियाच्या काही भागातून जगभर पसरलं. या फळाची पहिली लागवड व्हिएतनामच्या राजाने केल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर हे फळ श्रीमंत लोकांसाठी असलेलं फळ म्हणून नावारूपाला आलं.

या फळाच वैशिष्ट्य काय असेल तर, पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी, याची रोपं जळून जात नाहीत. फळांचा आकार कमी होईल; मात्र झाड जिवंत राहतील. या पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. थोडक्यात पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.

ड्रॅगन फ्रुटच्या वाढीकरिता पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थंचं प्रमाण जास्त असलेली, वालुकामय तसेच मध्यम हलकी जमीन योग्य ठरते. फळांच्या वाढीकरिता साधारणत २५ ते ३५ अंश सेंटिग्रेट तापमान मानवतं. त्याचप्रमाणे वार्षिक पर्जन्यमान ५०० ते १००० मि.मी. आणि उष्ण व थोड्या प्रमाणात दमट हवामान आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांत नवीन पीकपद्धती म्हणून ड्रॅगन फ्रूटची देशभरात लागवड वाढली आहे. या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होतोय. ड्रॅगन फळाचे उत्पादन गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटांवर घेतलं जातं.

ड्रॅगन फ्रुटची लागवड करु इच्छिनाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ड्रॅगन फळबाग क्षेत्र वाढविण्यासाठी गुजरात सरकारने एक विशेष कार्यक्रम जाहीर केलाय. त्यासाठी एकूण १० कोटी रुपयांची तरतूद केलीय. ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी तीन ते साडे चार लाख रूपयांपर्यंत मदत केली जाणार आहे.

सध्या ड्रॅगन फळ गुजरातमध्ये शहरांतील किरकोळ बाजारात प्रति नग १०० ते १५० रुपयांना विकलं जात आहे.

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्राक्षे, केळी, ड्रॅगन फ्रूट व इतर काही विदेशी फळांच्या जातींची लागवड करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा नुकताच घेण्यात आलाय. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्ट्रॉबेरी व ड्रॅगन फळासाठी ९० टक्‍के अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मात्र या फळाला आपल्या देशात म्हणावं तस मार्केट अजूनही मिळालेलं नाही. कारण बऱ्याच लोकांना या फळाची ओळख झालेली नसून फळातील पोषक तत्व आणि औषधी गुणधर्माविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. इतर देशामध्ये ड्रॅगन फळाला मागणी असल्यामुळे या फळाच्या निर्यातीमध्ये चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ड्रॅगन फ्रुटच्या फळबागा उभ्या राहिल्यात. हे फळ खूप महागडं असल्यामुळे यातून खूप पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु अनेक ठिकाणी खरेदीची हमी, विक्री व्यवस्था, बाजाराशी थेट कनेक्ट नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे बाजाराचा नीट अभ्यास करूनच शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटसारख्या फळांचा प्रयोग करावा, असा जाणकारांचा सल्ला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com