
या महिन्यापासून खरीप पिकांची आवक (Kharif Crop Arrival) सुरू होईल. पाऊस आतापर्यंत चांगला पडत असल्याने या महिन्यात मागील उत्पादनातील साठा विक्रीस येण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे किमती कमी होण्याची शक्यता आहे. नवीन पिकाची आवक (New Crop Arrival) जशी वाढेल तसा किमतीतही उतरता कल दिसून येईल. मात्र पुढील महिन्यात सणांमुळे मागणीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शासनातर्फे या वर्षी अधिक खरेदी करण्याची योजना आहे. जर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिरिक्त पाऊस पडला तर किमतीत वाढते चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
२ सप्टेंबर रोजी संपणाऱ्या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने देशात सर्वच पिकांच्या आवकेत घट झाली. फक्त टोमॅटोची आवक वाढली. या सप्ताहात मूग, कांदा व टोमॅटो वगळता सर्वच पिकांच्या किमती घसरल्या. कापूस व सोयाबीन यांच्यात ही घट अधिक होती.
या सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) ऑगस्ट महिन्यात वाढत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ४.७ टक्क्यांनी घसरून रु. ४४,८५० वर आले होते; त्या सप्ताहात ते पुन्हा ५.७ टक्क्यांनी घसरून ४२,२८० वर आले आहेत. ऑक्टोबर डिलिव्हरी भाव २.७ टक्क्यांनी घसरून रु. ३६,९९० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ४.५ टक्क्यांनी घसरून रु २,१४३ वर आले आहेत. नवीन वर्षासाठी कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. हेजिंगसाठी अनुकूल वेळ आहे.
मका
मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती ऑगस्ट महिन्यात वाढत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,५०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (ऑक्टोबर डिलिव्हरी) किमती ०.१ टक्क्याने घसरून रु. २,५१६ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. २,५४० वर आल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. १,९६२ जाहीर झाला आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. मक्याला मागणी चांगली आहे.
हळद
हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या ०.४ टक्क्याने घसरून रु. ७,४३९ वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या ०.९ टक्क्याने घसरून रु. ७,३७३ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती २.४ टक्क्यांनी घसरून रु. ७,०९४ वर आल्या आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्याने घसरून रु. ४,६०४ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,२३० आहे.
मूग
मुगाच्या किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात ३ टक्क्यांनी वाढून रु. ६,५०० वर आली आहे. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ७,७५५ जाहीर झाला आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत. नवीन मुगाची आवक आता बाजारात होऊ लागली आहे. यात कर्नाटक राज्याचा हिस्सा ६५ टक्क्यांहून अधिक आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश (२० टक्के) आहे. महाराष्ट्रातील आवकसुद्धा वाढत आहे.
सोयाबीन
सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) ऑगस्ट महिन्यात उतरत होती. गेल्या सप्ताहात ती ४.१ टक्क्यांनी घसरून रु. ५,३५३ वर आली होती; या सप्ताहात ती पुन्हा २.९ टक्क्यांनी घसरून रु. ५,१९६ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० जाहीर झाला आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) ऑगस्ट महिन्यात घसरत होती. या सप्ताहात ती ०.२ टक्क्यानी घसरून रु. ७,०८६ वर आली आहे. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ६,६०० जाहीर झाला आहे.
कांदा
कांद्याच्या किमती ऑगस्ट महिन्यात रु. १,२५० च्या आसपास चढ-उतार अनुभवत होत्या. कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,१९४ होती; या सप्ताहात ती रु. १,२२५ वर आली आहे.
टोमॅटो
टोमॅटोच्या किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. या महिन्यात त्या वाढू लागल्या आहेत. या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) गेल्या सप्ताहाच्या तुलनेने २६.९ टक्क्यांनी वाढून रु. १,३१३ पर्यंत आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.