सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काजू हंगामाला (Cashew Season) प्रारंभ झाला असून, या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला काजू बी (Cashew Nut) प्रतिकिलो १२५ रुपयांनी (Cashew Rate) व्यापारी खरेदी करीत आहेत. त्यामुळे हंगामाची सुरुवातच निराशाजनक राहिल्याने काजू बागायतदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
बदलत्या वातावरणाचा सामना करीत या वर्षीच्या आंबा हंगामाला प्रारंभ झाला आहे. दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला या भागांत काजू परिपक्व होऊ लागली आहे.
याशिवाय जिल्ह्याच्या इतर भागांत देखील काही प्रमाणात काजू बी तयार होऊ लागली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काजू खरेदी करण्यास देखील सुरुवात केली आहे.
दरम्यान, हंगामाच्या सुरुवातीला काजू बीला प्रतिकिलो १२५ रुपये दर मिळत असल्यामुळे काजू बागायतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
काजू बी कमीत कमी १४० ते १५० रुपये दर मिळणे अपेक्षित होते. परंतु कमी दरामुळे बागायतदारांचा अपेक्षाभंग झाला आहे.
व्यापाऱ्यांकडून कमी दराने काजू खरेदी जात असल्यामुळे आता फळबागायतदार संघाच्या भूमिकेकडे सर्व बागायतदारांचे लक्ष लागून राहीले आहे.
गेल्या वर्षी फळबागायतदार संघाने पाच रुपये अधिक दर देऊन काजू बी खरेदी केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी देखील काजू बीच्या दरात वाढ केली होती.
दरम्यान, गेल्या वर्षीदेखील काजू हंगामाच्या सुरुवातीला १२० ते १२२ रुपये दर होता. त्यानंतर त्यात वाढ होऊन हा दर १२७, १३०, १३५ असा वाढत जाऊन अखेरीला १४५ रुपयांपर्यंत दर पोहोचला होता.
काजू बीला प्रतिकिलो १२५ ते १२८ रुपये उत्पादन खर्च येतो. त्यामुळे बागायतदाराला कमीत कमी १४० रुपये मिळाला तरच बागायतदाराला परवडतो. सध्या व्यापाऱ्यांकडून १२५ दर दिला जात आहे. यामध्ये बागायतदारांचे नुकसान होत आहे.
- संदेश देसाई, काजू बागायतदार, दोडामार्ग
गेल्या वर्षी फळबागायतदार संघाच्या माध्यमातून आम्ही काजू बी खरेदी केली होती. त्याचा निश्चितच बागायतदारांना फायदा झाला होता. या वर्षी देखील १५ फेब्रुवारीपासून काजू बी खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काजू बागायतदाराचे हित लक्षात घेऊन दर निश्चित केला जाईल.
- विलास सावंत, अध्यक्ष, फळ बागायतदार संघ, दोडामार्ग, सावंतवाडी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.