Wheat Market Rate : एखाद्या पिकाला चांगला भाव मिळाला की, पुढच्या हंगामात शेतकरी त्याची बंपर लागवड (Wheat Cultivation) करत असतात. मध्य प्रदेशचे शेतकऱ्यांनी मात्र ते काही प्रमाणात खोटं ठरवलंय.
गव्हाला विक्रमी भाव (Wheat Rate) मिळत असूनही मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाचा पेरा (Rabi Wheat Sowing) वाढवलेला नाही. याचं कारण आहे मोहरी. मोहरीतून शेतकऱ्यांना गव्हापेक्षा जास्त परतावा मिळाला. त्यामुळे त्यांनी यंदा गव्हाऐवजी मोहरीला (Mustard Sowing) जास्त पसंती दिली आहे.
देशातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरलेलं वर्ष मोठ्या चढ-उतारांचं राहिलं. गेल्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं.
त्यामुळे गहू उत्पादनात इतकी घट आली की गडबडून गेलेल्या केंद्र सरकारने रातोरात गव्हावर निर्यातबंदीची कुऱ्हाड चालवली. त्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी गोची झाली.
सरकारच्या निर्णयाचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारातही उमटले. रशिया-युक्रेन युध्दामुळे आधीच गव्हाच्या जागतिक पुरवठा साखळीचे तीनतेरा वाजलेले होते. त्यात भारताने निर्यातबंदी लादल्याने जागतिक बाजारात गव्हाचा पुरवठा रोडावला. त्यामुळे गव्हाचे दर जास्तच भडकले.
आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हात तेजीचे वारे वाहू लागले आहेत. देशांतर्गत बाजारातही दर चढेच आहेत. गव्हाचे भाव जानेवारी महिन्यात विक्रमी ३२५० रूपये क्विंटलवर गेले. केंद्र सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत (हमीभाव) त्यापेक्षा खूप कमी म्हणजे २१२५ रूपये आहे.
हमीभावाच्या तुलनेत बाजारात मजबुत दर मिळत असल्याने शेतकरी गव्हाचा पेरा वाढवतील, अशी केंद्र सरकारची आणि उद्योगक्षेत्राची अपेक्षा होती. परंतु शेतकऱ्यांनी गव्हाऐवजी मोहरीला पसंती देऊन या अपेक्षा फोल ठरवल्या आहेत.
मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याने देशातील एकूण गहू उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता मावळली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यंदाच्या रब्बी हंगामात सुमारे ३४३ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा झालेला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत तो फक्त ०.४ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी गव्हाचे क्षेत्र जवळपास ३४२ लाख हेक्टर होते. म्हणजे यंदा गव्हाचे क्षेत्र थोड्या-फार फरकाने गेल्या वर्षीच्या पातळीवर स्थिर राहिले आहे.
गव्हामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले. परंतु मोहरीने त्यापेक्षा जास्त परतावा दिला. त्याचा परिणाम लगेच मोहरीच्या लागवडीवर दिसून आला.
मोहरी हे रब्बी हंगामातील मुख्य तेलबिया पीक आहे. मोहरीची लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.४ टक्के वाढली आहे. यंदा विक्रमी ९८ लाख हेक्टरवर मोहरीची लागवड झालेली आहे.
यंदा मोहरीसह एकूण रब्बी पिकांची लागवड वाढली आहे. गेल्या वर्षी ६९८ लाख हेक्टरवर रब्बी लागवड झाली होती. यंदा मात्र विक्रमी ७२० लाख हेक्टरवर रब्बी पिकांचा पेरा झाला आहे.
भाताची लागवड ३२ टक्क्यांनी वाढली आहे. यंदा परतीचा पाऊस रेंगाळला. ऑक्टोबरपर्यंत पाऊस होत राहिल्याने जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण जास्त राहिले. त्याचा फायदा रब्बी पिकांना झाला आहे.
दरम्यान, यंदा मोहरीची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे खाद्यतेलाच्या आयातीत घट होऊ शकते. भारत खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्ण नाही.
जगातील सर्वाधिक खाद्यतेल आयात करणारा देश म्हणून भारताला ओळखले जाते. पण यंदा मोहरीचे उत्पादन वाढणार असल्याने पामतेल, सोयातेल आणि सूर्यफुल तेलाच्या आयातीत काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.