Commodity Market Update : कापूस, हळदीच्या किमतींत घट

Cotton Market News : देशातील कापूस, टोमॅटो व सोयाबीन यांची आवक आता लक्षणीय वाढू लागली आहे. खरिपातील उत्पादनाचे चित्र पुढील एक, दोन सप्ताहांत स्पष्ट होईल.
Turmeric Cotton
Turmeric Cotton Agrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमती ः सप्ताह १४ ते २० ऑक्टोबर २०२३

सेबीने २० डिसेंबर २०२१ रोजी सात महत्त्वाच्या शेती वस्तूंच्या (गहू, बिगर-बासमती धान, मूग, हरभरा, सोयाबीन व त्याची उत्पादने, मोहोरी व त्याची उत्पादने आणि पाम तेल व त्याची उत्पादने) फ्यूचर्स ट्रेडिंग वर बंदी घातली.

दोन वर्षे झाली तरी अजूनही ही बंदी कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह इतर घटकांना हेजिंग किंवा ऑप्शन ट्रेडिंगसारखी साधने वापरुन स्वतःचे संरक्षण करता येत नाही. त्याशिवाय फ्यूचर्स किमतींचा जो उपयोग फॉरवर्ड करार करताना जगभर केला जातो तोही आपणास करता येत नाही.

सर्व जागतिक बाजारात शेतमालाच्या भविष्यातील किमती आधी ठरतात; त्याआधारे स्पॉट किमती ठरतात. यासाठी सर्व प्रगत देशात भविष्यातील किमती स्पर्धात्मक वातावरणात (व तरीही शासन-नियंत्रित संस्थेच्या देखरेखीखाली) ठरविण्यासाठी बाजार व्यवस्था (फ्यूचर्स मार्केट) उभारली गेली आहे.

तिला १५० वर्षांचा इतिहास आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अशी व्यवस्था प्रथम शेतीमालासाठी केली गेली व नंतर इतर वस्तूंसाठी (सोने, चांदी, लोखंड वगैरे) तिचा वापर केला गेला. आज शेतीमालासाठी प्रसिद्ध फ्यूचर्स मार्केट्स साहजिकच अमेरिका, युरोप व ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात आहेत; पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे इथेसुद्धा चीनने उशिरा शिरकाव केला व आघाडी घेतली आहे.

Turmeric Cotton
Soybean Market : बाजारात सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात

अशा बाजारांचा प्रक्रिया व निर्यात उद्योग, शासनाचे खरेदी-विक्री व्यवहार यांनासुद्धा कसा उपयोग करून घेतो व संपूर्ण मूल्यसाखळी त्यामुळे कशी प्रगत होऊ शकते यांचा या देशांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. भारतासारख्या देशात शेतकी मालासाठी फ्यूचर्स मार्केट्स चालविण्यात अनेक अडचणी आहेत हे जरी मान्य केले तरी काल्पनिक भीतीमुळे धोरणच अनिश्‍चित ठेवायचे हे योग्य नाही. त्यामुळे व्यापारी, ग्राहक, शेतकरी या घटकांचा प्रचलित बाजार व्यवस्थेवर विश्‍वास उरणार नाही.

सध्याची बंदी पुढील एक-दोन महिन्यांत उठेल, अशी अजूनही आशा आहे. NCDEX, MCX सारख्या एक्स्चेंजेसमध्ये आणखी काही शेतीमाल येतील आणि अगदी टोमॅटोसारख्या नाशवंत वस्तूंसाठीसुद्धा काही विचार-प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देशातील कापूस, टोमॅटो व सोयाबीन यांची आवक आता लक्षणीय वाढू लागली आहे. खरिपातील उत्पादनाचे चित्र पुढील एक, दोन सप्ताहांत स्पष्ट होईल. मात्र गेल्या दोन महिन्यांत कापूस, हळद व मका यांच्या किमती कमी होण्याचा कल दाखवत आहेत. कांद्याची आवक वाढत्या पातळीवर आहे; पण किमतीसुद्धा वाढत आहेत.

कापूस व हळद वगळता इतर वस्तूंच्या किमती गेल्या सप्ताहाच्या तुलनेत वाढल्या. मुगाच्या किमती स्थिर राहिल्या. २० ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे राहिले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Turmeric Cotton
Cotton Market : मार्केट यार्डमध्येच आता कापसाचे लिलाव

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव या सप्ताहात १ टक्का घसरून रु. ५७,७८० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव १.७ टक्क्याने घसरून रु. ५८,१०० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. ५९,४०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा २.८ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ०.१ टक्क्याने घसरून रु. १,४४९ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५२३ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत.

Turmeric Cotton
Maize Cultivation : रब्बी मका लागवडीचे तंत्र

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात रु. २,००० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,०५० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (नोव्हेंबर डिलिव्हरी) किमती रु. २,०५३ वर आल्या आहेत. जानेवारी फ्यूचर्स किमती रु. २,०७७ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १३,७०६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. १३,५६७ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. १३,७४४ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. १५,१६६ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या ११.८ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात ०.४ टक्क्याने वाढून रु. ६,१२५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) रु. ८,७०० वर स्थिर आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) रु. ४,६९८ वर आली होती. या सप्ताहात ती ५.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,९४९ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) ३.६ टक्क्यांनी वाढून रु. १०,४५० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. गेल्या दोन महिन्यांत तुरीच्या किंमती वाढत आहेत.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com