Jeera Rate: सुसाट तेजीत असलेले जिरे वर्षभरात दामदुप्पट

गुजरातमध्ये जिऱ्याच्या पेरणीक्षेत्रात घट होण्यामध्ये मुख्य कारण आहे हवामानातील बदल. जिरे पेरणी आणि वाढीला ठरावीक थंडीची गरज असते. तापमानाच्या बाबतीत हे अत्यंत संवेदनशील पीक आहे.
Jeera Rate
Jeera RateAgrowon

२०२२ हे वर्ष सरले आहे. कमोडिटी बाजारातील (Commodity Market) गुंतवणूकदारांच्या दृष्टीने वार्षिक लेखाजोखा घेतला असता हे संपूर्ण वर्ष भावातील चढ-उतार आणि अनिश्‍चितता यांनी भरलेले राहिले. सामान्य माणसं आणि शेतकरीही सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक (Gold Investment) करत असतात.

वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात सोने आणि चांदी या परंपरागत गुंतवणूकयोग्य कमोडिटीजमध्ये अनुक्रमे १४ आणि ११ टक्के एवढा परतावा मिळाला. परंतु कृषी कमोडिटीजमध्ये (Agriculture Commodity) सालाबादप्रमाणेच जिरे हे मसाला पीक (Spices Crop) सुपर हीरो ठरले आहे.

Jeera Rate
Tur Market : तूर यंदा शेतकऱ्यांना आधार देणार

जिरे (Cumin Seed) हा मसाला पदार्थ भारतातच नव्हे, तर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. अन्नपदार्थांमध्ये त्याचा उपयोग होतो. तसेच त्याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. भारतातून दरवर्षी सुमारे दीड लाख टन जिरे निर्यात होते. देशातील एकूण जिरे उत्पादनाशी तुलना करता हे प्रमाण २५-३० टक्के भरते.

अशा या कमोडिटीने २०२२ मध्ये सर्वांत जास्त परतावा दिला आहे, याची फारच थोड्या जणांना माहिती असेल. याचे कारण म्हणजे जिरे ही वस्तू दररोजच्या जेवणात वापरात असली, तरी ती वारंवार खरेदी केली जात नाही.

तसेच खरेदीचे प्रमाणही तुलनेने थोडके असते. त्यामुळे खाद्यतेल किंवा अन्नधान्याच्या किमतीप्रमाणे जिऱ्याच्या किमती ग्राहकांच्या लक्षात राहत नाहीत. तर असे ही जिरे वर्षअखेरीस घाऊक बाजारामध्ये ३५,००० रु. प्रति क्विंटल या विक्रमी भावपातळीवर पोहोचले आहे.

परताव्याच्या बाबतीत बोलायचे, तर जिरे वार्षिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर राहिले असून, त्यात ९६ टक्के एवढा परतावा मिळाला आहे.

अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत एरंडी बी आणि गवार. परंतु तांत्रिकदृष्ट्या या कमोडिटीजमध्ये वार्षिक स्तरावर तुलनेने खूपच कमी म्हणजे १८ टक्के आणि १७ टक्के एवढीच कमाई झाली असे म्हणता येईल.

त्यामुळेच कृषिमाल बाजारपेठ आणि वायदे बाजारामध्ये जिरे ही सध्या सर्वात जास्त बोलबाला होत असलेली कमोडिटी नसती तरच नवल. मागील हंगामात कमी उत्पादनामुळे तेजीत राहणार हे माहीत असूनसुद्धा आलेली तेजी अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे. त्यामागच्या

Jeera Rate
Soybean Market : पुढील आठवड्यात सोयाबीनचे दर वाढण्याचा अंदाज

कारणांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.

तसे पाहता मागील हंगामातील उत्पादनामध्ये मोठी घट हे एक कारण आहेच. परंतु यापूर्वी अभावानेच उद्‍भवलेली परिस्थिती या वेळी निर्माण झाली. ती म्हणजे चांगला भाव मिळूनसुद्धा सतत दुसऱ्या वर्षी गुजरातमध्ये जिरे पेरणीमध्ये घट झाली आहे. राजस्थान जिरे उत्पादनात देशात आघाडीवर आहे.

तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही राज्य सरकारांच्या पेरणी अहवालानुसार राजस्थानमध्ये या रब्बी हंगामात क्षेत्र ९ टक्के वाढून ते ५ लाख ८० हजार हेक्टरवर गेले आहे. परंतु तीन वर्षांच्या सरासरी क्षेत्रांपेक्षा ते ९ टक्के कमीच आहे.

गुजरातमध्ये तर परिस्थिती याहूनही बिकट आहे. या वर्षी पेरणी ८ टक्के कमी असून, मागील वर्षात २९ टक्के क्षेत्र घटले होते. त्यामुळे तीन वर्षांतील सरासरी क्षेत्र ३५ टक्क्यांनी घटले आहे.

गुजरातमध्ये जिऱ्याच्या पेरणीक्षेत्रात घट होण्यामध्ये मुख्य कारण आहे हवामानातील बदल. जिरे पेरणी आणि वाढीला ठरावीक थंडीची गरज असते.

तापमानाच्या बाबतीत हे अत्यंत संवेदनशील पीक आहे. या वर्षी गुजरातमध्ये थंडीचे प्रमाण कमीच राहिले. त्यामुळे पेरणीवर परिणाम झालाच, परंतु पेरणी झालेल्या पिकाचे देखील चांगलेच नुकसान झाले असल्याची माहिती आहे.

हवामानाबरोबरच पेरणी क्षेत्र घटण्यास हंगामातील इतर पिकांमधील स्पर्धात्मक किमती देखील कारणीभूत आहेत.

एकतर चांगल्या किमतीमुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कापसाचे पीक अधिक वेचण्या करण्यासाठी तसेच ठेवल्याने पारंपरिक जिरे क्षेत्राची उपलब्धता कमी झाली. तर ज्यांच्याकडे क्षेत्र होते त्यांनी त्यातील काही भाग मोहरीकडे वळवला.

प्रामुख्याने या दोन गोष्टींमुळे गुजरातमध्ये क्षेत्रघट झाल्याचे बोलले जात आहे. जसजसा या गोष्टींचा अंदाज येऊ लागला तसतसा सतत दुसऱ्या वर्षी उत्पादनातील संभाव्य तुटीकडे पाहून किमती वाढू लागल्या.

केवळ डिसेंबरमध्ये जिरे ११ टक्क्यांहून अधिक वाढले आहे. पारंपरिक ट्रेन्डनुसार चांगला भाव मिळाल्यानंतर बंपर क्षेत्रवाढ होते.

जिऱ्याच्या बाबतीतही तसेच होईल, या अपेक्षेने जिरे व्यापारी किमती कमी होण्याची वाट पाहू लागले. परंतु त्यांची अनुमाने चुकल्याने पूर्वी केलेले सौदे निभावून नेण्यासाठी त्यांच्यावर मिळेल त्या किमतीने माल घेण्याची वेळ आली. त्यामुळे देखील जिरे भाववाढ वेगात झाली असावी.

मार्चमध्ये सुरू झालेल्या मागील पणन हंगामातील पहिल्या दहा महिन्यांत बाजार समित्यांमधील जिरे आवक ३८ टक्क्यांनी घटली. आवक १ लाख ९८ हजार ३४३ टनांवर आल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. पुढील हंगामदेखील टाइट राहणार असल्याचे सरकारी आकड्यांप्रमाणे जवळपास नक्की दिसत आहे.

पुरवठ्याबाबत अशी परिस्थिती असताना मागणीचे चित्र काय आहे, ते पाहूया. जिरे महाग झाल्यामुळे मोठे ग्राहक आणि व्यापारी या दोहोंकडून जेवढी गरज जेमतेम तेवढीच खरेदी केली जात आहे. तर नव्याने स्टॉकिस्ट त्यात उतरण्याची शक्यता नाही.

देशांतर्गत मागणीतच घट झाली असे नव्हे तर निर्यातीवर देखील विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

मसाला बोर्डाच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये जिरे निर्यात मागील वर्षाच्या १ लाख ५० हजार ४७९ टनांवरून १९ टक्के घटून ती १ लाख २२ हजार १५ टनांवर आली आहे.

अर्थात निर्यातीतून मिळणारी कमाई मात्र १६ टक्के वाढून २६०० कोटी रुपयांवर गेली आहे. त्यादृष्टीने नोव्हेंबर ते मार्च या उरलेल्या पाच महिन्यांत देखील निर्यात नरमच राहील, असे व्यापारी सूत्रांकडून समजते.

त्यामुळे जिरे अजून काही आठवडे चर्चेत राहणार हे नक्की. गुजरातमधील उंझा हे जिरे व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे तर राजस्थानमध्ये जोधपूर एनसीडीईएक्स या कमोडिटी एक्स्चेंजवर जिरे वायदे काँट्रॅक्ट उपलब्ध आहे.

एकंदरीत पाहता मार्चमध्ये सुरू होणाऱ्या पुढील पणन हंगामातील पहिल्या दोन-चार महिन्यांत जिऱ्यात थोडी मंदी दिसणे साहजिकच आहे.

परंतु सलग दुसऱ्या वर्षी उत्पादनात घट आल्यामुळे हंगामातील शेवटच्या चार-सहा महिन्यांत किमती परत ४०,००० रुपये किंवा त्याहून अधिक पातळीवर जातील का, याकडे कमोडिटी गुंतवणूकदार आणि व्यापारी लक्ष ठेवून आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com