
Cotton Market Update Yavatmal : कापसाचे दर आठ हजार दोनशेवर गेले होते. आगामी काळात दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र काही दिवसांतच दर खाली आले आहेत. सद्यःस्थितीत कापसाला सात हजार आठशे ते सात हजार नऊशे रुपये दर मिळत आहे.
संततधार पाऊस व अतिवृष्टीने कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे कापसाची मागणी चांगली राहील, बाजारात कापसाला दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र स्थिती उलटी झाली. कापसाचे दर साडेआठ हजारांच्या पुढे सरकारला तयार नाहीत. बाजारात कापसाला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबविली आहे.
शेतकऱ्यांनी घरातच कापसाची साठवणूक केली आहे. कापसाचे दर हंगामाच्या सुरुवातीला आठ हजार आठशे रुपयांपर्यंत गेले होते. त्यामुळे कापूस दहा हजार रुपयांचा आकडा पार करेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, काही दिवसांत वाढलेले दर आठ हजारांवर आले होते. तेव्हापासून दोनशे ते चारशे रुपयांपर्यंत दरात चढ-उतार होत आहेत. अजूनही तशीच स्थिती आहे.
गेल्या आठवड्यात कापसाचे दर आठ हजार दोनशे रुपयांवर गेले होते. आता पुन्हा दर आठ हजारांच्या खाली आले आहेत. सद्यःस्थिती सात हजार सातशे ते सात हजार नऊशे रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे कापसाची आवक पुन्हा मंदावली आहे.
दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. कापूस उत्पादनात झालेला तोटा भाव वाढल्यास भरून निघेल, या आशेवर शेतकरी आहेत. कापसाचाही भाव नक्कीच वाढेल, अशी आशा अजूनही शेतकऱ्यांना आहे.
कापसाने गाठली नाही नऊ हजारी
गेल्यावर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते. यंदाही तशीच स्थिती राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र यंदा कापूस काढणीला सुरुवात झाली, त्या वेळी आठ हजार नऊशे रुपयांपर्यंत कापसाचे दर होते. यंदाच्या हंगामातील जिल्ह्यातील हा सर्वाधिक दर ठरला. त्यानंतर कापसाचे दर आठ हजार चारशे व त्यानंतर आता सात हजार नऊशे रुपयांपर्यंतच राहिले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.