Cotton Market News : कापूस मागणी-पुरवठ्याचे गणित शेतकऱ्यांच्या बाजूने

Cotton Procurement Update : या वर्षी देशातील कापूस उत्पादन आणि वस्त्रोद्योगाची मागणी यामध्ये मोठी दरी राहण्याची शक्यता आहे. मागणीतील घटीपेक्षा पुरवठ्यातील घट बाजारावर अधिक्य गाजविण्याची शक्यता खूपच जास्त आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Cotton Market Update : या खरीप हंगामात या स्तंभात आपण प्रथमच कापूस पिकाबद्दल चर्चा करणार आहोत. राज्यातील लवकर पेरणी झालेल्या काही भागांत कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे बाजारात किमती घसरल्याचे अनेक मेसेज समाज माध्यमांमध्ये फिरू लागले आहेत.

बाजारात अनिश्‍चितता आणि गोंधळ निर्माण करून व्यापारी आपले ईप्सित साध्य करून घेण्यात यशस्वी होतात, असा नेहमीचा अनुभव आहे. आणि शेतकरीदेखील बी-बियाणे, कीटकनाशके, मजुरी इत्यादी गोष्टींसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपला माल विकण्यास उत्सुक असल्याने ते या हंगामाच्या सुरुवातीला निर्माण केलेल्या सापळ्यात सहज अडकतात. अशीच परिस्थिती सोयाबीनमध्येही निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी कळवले आहे.

कापसाच्या बाबतीत बोलायचे तर पुढील महिन्या-दोन महिन्यांत अनेक परिषदा भरवल्या जातील. त्यामधून देशातील विविध भागांतील कापसाच्या पुरवठ्याबाबत अंदाज येईल. सध्या उपलब्ध असलेले अंदाज हे प्रामुख्याने संख्याशास्त्राच्या अनुषंगाने बनवलेले आणि ढोबळ स्वरूपाचे आहेत. अशीच एक परिषद नुकतीच गोव्यामध्ये पार पडली.

या परिषदेतून मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी देशातील कापूस उत्पादन आणि वस्त्रोद्योगाची मागणी यामध्ये मोठी दरी राहणार आहे. प्राथमिक कापूस उत्पादन अंदाज ३१० ते ३३० लाख गाठी राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र मागील दोन वर्षांत देशातील सूत गिरण्यांनी आपली क्षमता २५ लाख रिळे एवढी वाढविली आहे.

तसेच अजून १२-१५ लाख रिळे एवढी क्षमता येत्या काळात वाढणार आहे. जर हा उद्योग पूर्ण क्षमतेने चालू राहिला, तर मागणी ४०० लाख गाठींपर्यंत वाढू शकते. जरी ९० टक्के क्षमता वापरात आली तरी ३५० ते ३६० लाख गाठी लागतील. अर्थात, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक बाजारात सुताला तेवढी मागणी असणे देखील गरजेचे आहे.

Cotton Market
Color Cotton Variety : घातखेडा ‘केव्हीके’ देणार रंगीत कापूस वाणाचा पर्याय

एकंदर या परिषदेत उमटलेला सूर हा देशातील उत्पादन कमी राहील असा आहे. कापूस उत्पादन वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न करणे गरजेचे असून, त्यासाठी या उद्योगातील सर्वांना एकत्र येण्याची निकडीची गरज निर्माण झाली आहे, अशी मते या वेळी व्यक्त करण्यात आली आहेत.

यानिमित्ताने केंद्र सरकारला नवीन जीएम तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वीच्या मोन्सॅन्टो कंपनीचे सहकार्य घेण्यास विनंती करण्यात आली आहे. यातून एक गोष्ट ठळकपणे लक्षात येत आहे, की उद्योगाला कापूस मिळण्याची चिंता कायम राहिली आहे. या परिषदेत असेही म्हटले गेले आहे ही सुमारे १५ लाखांहून अधिक शेतकरी बाजारभावाची माहिती घेण्यासाठी थेटपणे समाज माध्यमांचा उपयोग करीत आहेत.

त्यामुळे आपला माल बाजारात केव्हा न्यायचा आणि पुरवठा कसा आणि केव्हा रोखून ठेवायचा याबाबत जाणीवजागृती होत आहे. एकंदरीत ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी जमेची आहे. मागील वर्षात कापसाची सरासरी किंमत हमीभावापेक्षा २० टक्के अधिक राहिली आहे. या वर्षी तोच कल जरी राहिला, तरी सरासरी किंमत ८४०० ते ८५०० रुपये राहण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

Cotton Market
Cotton Production : कमी पावसाने कापूस उत्पादनाला फटका बसणार

या परिषदेत जागतिक बाजारकलाविषयी माहिती देताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सूत आणि कापूस या दोघांचीही आर्थिक मंदीमुळे घटलेली मागणी या विषयावर चिंता व्यक्त करण्यात आली. तर दुसरीकडे भारतीय शेतकरी आपला माल रोखून धरण्यात सक्षम झाल्यामुळे कमी मागणीमध्ये देखील किमती तुलनेने चढ्याच राहत असल्याचे नमूद केले आहे.

वरील माहिती पाहता असे दिसून येत आहे, की कापूस पुरवठा पाहिल्यापेक्षा अधिक ‘‘टाइट’’ राहणार आहे. मागणीतील घटीपेक्षा पुरवठ्यातील घट बाजारावर अधिक्य गाजवण्याची शक्यता खूपच जास्त आहे. कच्चे तेल महागले आहे. याचा थेट परिणाम कापसावर होत असतो. याबाबत फारसे बोलले जात नसले तरी बाजारात या गोष्टीला खूप महत्त्व आहे.

जगातील इतर प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्येही कापूस उत्पादन घटणार आहे. याबाबत अमेरिकी कृषी खात्याचा (यूएसडीए) ऑक्टोबर महिन्याचा अहवाल लवकरच प्रसारित होईल. बाजाराच्या दृष्टीने तो महत्त्वाचा असणार आहे. आपल्या देशात देखील खरीप प्रथम अग्रिम अनुमान लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

एकंदरीत कापसात तेजी-मंदी याबाबत बोलणे सध्या कठीण असले, तरी मागणी- पुरवठा समीकरण उत्पादकांच्या बाजूने आहे यात वाद नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी हंगामाच्या पहिल्या चार-सहा आठवड्यात गरज नसल्यास कापूस विक्रीसाठी बाजाराकडे न फिरकणे योग्य राहील.

Cotton Market
Cotton Procurement : पणन महासंघाच्या कापूस खरेदीबाबत अनिश्‍चितता

हळद बाजारातील घडामोडी

मुंबईमध्ये २७ सप्टेंबर रोजी देशातील पहिलीच आंतरराष्ट्रीय हळद परिषद पार पडली. या परिषदेत हिंगोली जिल्ह्यातील हळद संशोधन केंद्राने (हरिद्रा) एनसीडीईएक्स या कमोडिटी एक्स्चेंजशी करार केला. या परिषदेपाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील एका कार्यक्रमात हळद मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारने हळदीची निर्यात वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

दरम्यान, हळदीचे बाजारभाव तीन महिन्यांत ६,५०० रुपयांवरून ऑगस्ट मध्ये १८,००० रुपयांवर गेल्यामुळे उत्पादकांमध्ये चैतन्य आले आहे. परंतु बाजारातील नियमांनुसार त्यानंतर बाजारात करेक्शन आणि कंसॉलिडेशन चालू आहे. म्हणजेच वायदे बाजारात हळद १२,८०० रुपयांवर घसरली आणि आता ती परत १४,६०० रुपये झाली आहे.

सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पीक परिस्थितीत सुधारणा होण्याच्या शक्यतेमुळे बाजारभाव एक विशिष्ट कक्षेत राहिले आहेत. टेक्निकल चार्टवर या स्थितीचे वर्णन करताना यातील तज्ज्ञ अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार अजून काही दिवस १३,००० ते १५,५०० या कक्षेतच बाजार फिरत राहील.

नवीन तेजी येण्यासाठी बाजारभाव १५,५०० रुपयांवर बंद होणे गरजेचे आहे. असे झाल्यास परत १७,८०० रुपयांची पातळी गाठणे सुलभ होईल. तसेच त्यानंतर बाजार परत १५,००० ते १८,००० या नवीन कक्षेत राहतील आणि जानेवारी महिन्यात २०,००० ते २१,००० रुपयांचे अंतिम लक्ष्य गाठण्यास सिद्ध होतील. इंटेलिट्रेडचे टेक्निकल चार्ट तज्ज्ञ दिनेश सोमाणी यांनी हळद २३,००० रुपयांवर जाणे शक्य असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com