Pune News : पावसामुळे ओल्या झालेल्या कापसाची खरेदी ३ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान होत आहे. हा कापूस शेतकरी साठवून ठेवू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सीसीआयने ओलाव्याची अट १२ टक्क्यांवरून १८ टक्के करून कापूस खरेदी करावा. शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही तर लागवड आणखी कमी होईल. त्यामुळे सीसीआयने (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ओला कापूस खरेदी करावा, अशी मागणी केंद्राकडे केल्याचे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीएआय) अध्यक्ष अतूल गणात्रा यांनी ‘अॅग्रोवन’ला सांगितले.
कॉटन असोसिएशनची ऑफ इंडिया, अर्थात सीएआयने केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरिराज सिंह यांना पत्र लिहून ही मागणी केली, असे गणात्रा यांनी सांगितले. श्री. गणात्रा म्हणाले, की जास्त ओलावा असलेला कापूस कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अर्थात सीसीआय खरेदी करत नाही, असे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाला सांगितले होते. त्यामुळे सीएआयने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांना पत्र लिहून सीसीआयच्या कापूस खरेदीची अट शिथिल करण्याची मागणी केली. सीसीआय १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असलेला कापूस खरेदी करत नाही. सीसीआयच्या खरेदीतील १२ टक्क्यांची अट शिथिल करून १८ टक्के करावी, अशी मागणी आम्ही मंत्र्यांना केली आहे.
‘मागील १५ दिवसांमध्ये देशातील कापूस उत्पादक भागात पाऊस झाला. यामुळे कापूस ओला झाला. ओला झालेला कापूस शेतकरी साठवून ठेवू शकत नाहीत. हा कापूस विकावाच लागतो. मात्र बाजारात या कापसाला ३ हजार ते ६ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर दुसरीकडे हमीभाव ७ हजार ५२१ रुपये आहे. कापूस ओला झाला यात शेतकऱ्यांची चुकी नाही. मात्र शेतकऱ्यांना फटका बसत आहे, असेही गणात्रा म्हणाले.
शेतकरी आधीच संकटात
देशात कापसाची उत्पादकता कमी झाल्याने शेतकरी आधीच संकटात आले आहेत. त्यातच शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. या दोन्ही कारणांनी देशातील कापूस लागवड कमी होत आहे. देशातील कापूस लागवड आधीच १३५ लाख हेक्टरून ११३ लाख हेक्टरपर्यंत कमी झाली. कापसाला चांगला भाव मिळाला नाही तर शेतकरी पुढच्या हंगामातही कमी लागवड करतील. असे झाले तर भारतही बांगलादेश आणि पाकिस्तानप्रमाणे एक आयातदार देश बनेल. याचा फटका देशातील उद्योगांनाही असेल, असेही अतुल गणात्रा यांनी स्पष्ट केले.
‘…तर शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता यईल’
काही दोष नसताना केवळ पाऊस पडल्याने कापूस ओला झाला. यात शेतकऱ्यांची चूक नाही. शेतकऱ्यांनी ४-६ महिने कष्ट करून पीक घेतले. हा कापूस सीसीआयने खरेदी केला तर शेतकऱ्यांनाही दिवाळी साजरी करता येईल. त्यामुळे कापूस खरेदी करताना ओलाव्याची अट शिथिल करा, अशी मागणी अतुल गणात्रा यांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.