Bedana Production : यंदा ५७ हजार टनांनी बेदाणा उत्पादन घटल्याचा अंदाज

Bedana Market : यंदाचा राज्यातील बेदाणा निर्मितीचा हंगाम आटोपला आहे. द्राक्षावर आलेल्या नैसर्गिक संकटाचा फटका बेदाणा उत्पादनाला बसला आहे.
Bedana
Bedana Agrowon

Sangli News : यंदाचा राज्यातील बेदाणा निर्मितीचा हंगाम आटोपला आहे. द्राक्षावर आलेल्या नैसर्गिक संकटाचा फटका बेदाणा उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन ५७ हजार १०० टनांनी घटल्याचा प्राथमिक अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

बेदाण्याला प्रतिकिलो १०५ पासून २३० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून असून तीन महिन्यांत अंदाजे ३६ हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे.

डिसेंबरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने द्राक्षाचे नुकसान झाले. त्यानंतर द्राक्षाला अपेक्षित दर नव्हते. त्यातच द्राक्ष काढणीच्या वेळी रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. त्यामुळे शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळाले. वास्तविक, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होतो. यंदाचा हंगाम एक महिना लवकर सुरू झाला.

Bedana
Bedana Market : अपेक्षित दराअभावी केवळ ३० टक्के बेदाण्याचा उठाव

हंगामाच्या सुरुवातीला बेदाणा निर्मितीस पोषक वातावरण नसल्याने बेदाणा तयार होण्यास विलंब होत होता. त्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार होण्यास अडथळे येत होते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून हंगामाला गती आली. बेदाण निर्मितीस पोषक वातावरण असल्याने बेदाणा १२ ते १३ दिवसांत तयार झाला.

मात्र, बेदाणानिर्मिती सुरू होण्यापूर्वीच अवकाळी पाऊस आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे द्राक्षाचे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या बेदाण्याच्या हंगामात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता.

या नैसर्गिक आपत्तीमुळे बेदाण्याच्या उत्पादनात ३० टक्के घट होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात शेतकरी बेदाणा तयार करण्यासाठी पुढे आले. गत हंगामात राज्यात बेदाण्याचे २ लाख ७२ हजार टन उत्पादन झाले. परंतु यंदा २ लाख १५ हजार टन उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तलुनेत यंदा ५७ हजार १०० टनांनी उत्पादन घटले आहे.

Bedana
Bedana Market : बेदाण्याचे दर टिकून; दोन हजार टन आवक

बाजारात मागणीमुळे उठावही

या वर्षीचा नवीन बेदाणा फेब्रुवारीपासून विक्रीसाठी दाखल झाला. तासगाव, सांगली, पंढरपूर, सोलापूर, विजापूर या बाजार समित्यांत आठवड्याला सुमारे १२ हजार टन बेदाणा विक्रीला येत असून ७५०० टन बेदाण्याची विक्री होत आहे. बाजारात बेदाण्याला मागणी असल्याने उठावही आहे. गेल्या दीड महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. त्यामुळे तीन महिन्यांत ३६ हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे.

नव्वद टक्के शीतगृहे भरली

राज्यातील तासगाव, सांगली, सोलापूर, पंढरपूर आणि नाशिक-पिंपळगाव या १२२ तर विजापूरमध्ये १८ अशी एकूण १४० शीतगृहे आहेत. या शीतगृहांची साठवण क्षमता २ लाख ७२ हजार टन आहे. या भागांतील शीतगृहे ९० टक्के भरली आहेत.

बेदाणा उत्पादन दृष्टीक्षेप

वर्ष....उत्पादन (टनांत)

२०१९-२०... १ लाख ८० हजार

२०२०-२१... १ लाख ९५ हजार

२०२१-२२... २ लाख ५७ हजार ९००

२०२२-२३... २ लाख ७२ हजार १००

२०२३-२४... २ लाख १५ हजार (अंदाजे)

यंदाच्या हंगामात बेदाण्याला चांगली मागणी असून उठावही आहे. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून आहेत. बेदाण्याच्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता नसून येत्या काळात बेदाण्याचे दर वाढलील, अशी आशा आहे.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com