Banana Market Jalgaon : खानदेशात केळीची आवक सध्या प्रतिदिन सरासरी १९५ ट्रकपर्यंत (एक ट्रक १६ टन क्षमता) आहे. आवक सुमारे १० ते ११ ट्रकने वाढली आहे. दरही दबावातच आहेत.
बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात केळीला कमाल १९६० व किमान ८५० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. तर जळगाव जिल्ह्यात कमाल १३५० व किमान ८५० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.
हे दर बाजार समित्या जाहीर करीत आहेत, परंतु या दरांबाबत अंमलबाजवणी जळगाव, चोपडा, रावेर, यावल, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा व अक्कलकुवा येथे होत नसल्याची स्थिती आहे.
बाजार समित्या उलट थेट शिवार खरेदीवरही शुल्क वसुली करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. खरेदीदार ५००, ६००, ९००, १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर देऊन लूट करीत आहेत. जळगाव व इतर बाजार समित्यांनी यावर कुठलीही कारवाई केलेली नाही.
खानदेशात केळीचे दर मागील महिनाभरापासून कमीच आहेत. उष्णता वाढली, पण केळी दरात वाढ झालेली नाही. मागील पंधरड्यात केळीची आवक खानदेशात मिळून प्रतिदिन सरासरी १९० ट्रक एवढी होती.
त्यात मागील पाच ते सहा दिवसांत वाढ झाली आहे. सर्वाधिक आवक रावेर, मुक्ताईनगर भागात आहे. तर धुळे व नंदुरबारमध्ये मिळून ३५ ते ४५ ट्रक केळीची आवक होत आहे.
केळीची आवक वाढतच आहे. मार्चच्या सुरुवातीला ही आवक प्रतिदिन सरासरी १५० ट्रक होती. त्या वेळेस केळीचे दरही टिकून होते. थेट खरेदीत किमान २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. तर दर्जेदार, निर्यीतीच्या केळीचे दर ३००० रुपये प्रतिक्विंटल असे होते. पण एप्रिलच्या मध्यात दरात घसरण सुरू झाली.
ती घसरण थांबलेलीच नाही. खानदेशातून सध्या उत्तर भारतात पंजाब, काश्मीर, दिल्ली, हरियाना येथे केळीची पाठवणूक सुरू आहे. तेथील मॉलमध्ये केळीला मागणी आहे. परंतु गुजरात, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातही केळीची आवक वाढली आहे.
तेथील केळीही उत्तर भारतात पाठविली जात आहे. यामुळे खानदेशातील केळीसाठी हवी तशी पोकळी उत्तरेकडील बाजारात तयार होत नसल्याचे दिसत आहे.
बऱ्हाणपूर येथील बाजारातही सध्या प्रतिदिन १७० ट्रक केळीची आवक होत आहे. तेथे काही दिवस केळीचे लिलाव रखडले होते. अनेक वाहने लिलावाविना पडून राहायची. यामुळे मध्यंतरी केळी दरांवर मोठा दबाव वाढला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.