Agriculture Loan: यवतमाळ जिल्हा पीककर्ज वाटपात अग्रेसर

यवतमाळ जिल्ह्याने मागील पाच वर्षांच्या तुलनेत प्रथमच ८५ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे. तसेच, गेल्या वर्षी आठ जुलै २०२१ पेक्षा या वर्षी आठ जुलै २०२२ रोजी ३४७ कोटी पीककर्ज (Crop Loan) जादा वाटप केले.
Crop Loan
Crop LoanAgrowon

यवतमाळ : खरीप हंगामात आतापर्यंत १,६३२ कोटी रुपये पीककर्ज (Crop Loan) वाटप करून यवतमाळ जिल्ह्याने मागील पाच वर्षांच्या तुलनेत प्रथमच ८५ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे. तसेच, गेल्या वर्षी आठ जुलै २०२१ पेक्षा या वर्षी आठ जुलै २०२२ रोजी ३४७ कोटी पीककर्ज (Crop Loan) जादा वाटप केले. येत्या दोन आठवड्यात अजून तीनशे कोटी रुपये पीककर्जाचे वाटप करून शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकांना केले आहे.

बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे घेण्यात आली. याप्रसंगी रिझर्व्ह बँक नागपूरचे अग्रणी बँक प्रबंधक उमेश भन्साळी, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे प्रामुख्याने उपस्थित होते.

पीककर्जासोबतच (Crop Loan) इतर गैरकृषी क्षेत्र तसेच पशुसंवर्धन विभागाच्या योजना व महामंडळाचे कर्ज प्रकरणात एक महिन्याच्या आत निर्णय घेऊन प्रस्ताव मार्गी लावण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आजच्या तांत्रिक युगात लाभार्थ्यांना चकरा मारायला लावण्यापेक्षा जास्तीत जास्त कामे मोबाईलवरून करून घेण्याचे त्यांनी सांगितले.

महामंडळाकडील कर्ज प्रकरणांचा आढावा घेताना वर्षभरातील नगण्य कामकाजाबाबत जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त करून पुढील तीन महिन्यांत कामकाजात सुधारणा न केल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी येडगे यांनी या वेळी मुद्रा लोन, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, स्वयंरोजगार प्रशिक्षण व विविध शासकीय योजनांतर्गत कर्ज पुरवठ्याचा आढावा घेतला.

जिल्ह्याला २०२२-२३ या वर्षात १,९१९ कोटी रुपये खरीप पीककर्ज (Crop Loan) वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत १,७१,१३० खातेदारांना १,६३२ कोटी ५२ लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले असून, ते उद्दिष्टाच्या ८५ टक्के आहे.

तर मागील वर्षी आजच्या तारखेत १,४९,६९१ खातेदारांना १,२७३ कोटी (५७.७६ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले होते. मागील पाच वर्षातील खरीप पीककर्ज वाटपाची एकूण टक्केवारी दिलेल्या उद्दिष्टाच्या अनुक्रमे ५८ टक्के, ६१ टक्के, ७१ टक्के, ७८ टक्के व ८३ टक्के होती, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभिये यांनी दिली.

मध्यवर्तीकडून ६८९ कोटींचे वाटप

सर्वाधिक पीककर्ज वाटपांमध्ये (Crop Loan) यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६८९ कोटी १४ लाख वाटप केले. भारतीय स्टेट बँक ३४७ कोटी ६८ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँक १४२ कोटी ५१ लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १०९ कोटी ३८ लाख, बँक ऑफ महाराष्ट्र ९५ कोटी ९३ लाख वाटपाचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com