

Soybean Season : गेल्या हंगामात सोयाबीनला ७ ते ८ हजार रुपये भाव पाहिल्यानंतर यंदाही दरात अशीच वाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मागील हंगामात मार्च महिन्यानंतर सोयाबीन भावात सुधारणा झाली होती. मार्चपर्यंत भावपातळी ५ हजार रुपयांच्या दरम्यान होती. मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास ८० टक्के सोयाबीन विकले होते.
सहाजिकच तेजीचा फायदा अगदी बोटांवर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनाच मिळाला. मागील हंगामात कमी भावात सोयाबीन विकल्यानंतर दरात तेजी आल्याचे पाहून, यंदा शेतकऱ्यांनी मार्चनंतर सोयाबीन विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये सोयाबीन आवक अपेक्षेपेक्षा कमीच राहिली.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये एक तृतीयांश म्हणजेच ५० लाख टनांची आवक झाली. मागील हंगामात याच काळातील आवक ४० लाख टन होती. सहाजिकच यंदाची आवक जास्त दिसत होती. पण गेल्या हंगामात उत्पादन आणि आधीचा शिल्लक साठा मिळून १२६ लाख टनांचा पुरवठा होता.
पण चालू हंगामात गेल्या वर्षीपेक्षा तब्बल २८ लाख टनांनी जास्त पुरवठा राहिला. उत्पादन १२४ लाख टन आणि मागील हंगामातील शिल्लक २५ लाख टन, असे एकूण १५४ लाख टनांचा पुरवठा झाला. मागील हंगामातील शिल्लक सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीलाच बाजारात येईल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातील सोयाबीन आवक कमीच होती.
पण यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीन उत्पादनात वाढ झाली. अर्जेंटिनात उत्पादन घटले, पण ब्राझीलने मोठी झेप घेतली. ब्राझीलमध्ये यंदा १ हजार ५०० लाख टन उत्पादन झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आलेली तेजी ब्राझीलचे सोयाबीन बाजारात आल्यानंतर गायब झाली.
ब्राझील सोयाबीनचे गाळप खूपच कमी करतो. ब्राझील थेट सोयाबीन निर्यातीला जास्त प्राधान्य देत असतो. ब्राझीलच्या सोयाबीनचा मुख्य ग्राहक आहे चीन. यंदा चीनने ९०० लाख टनांपेक्षा अधिक आयातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी जास्तीत जास्त सोयाबीन ब्राझीलमधून आयात केले जाणार आहे.
ब्राझीलचे सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात आल्यानंतर सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव पडले. १५ डॉलरच्यावर असलेले सोयाबीन १४ डॉलरपेक्षा कमीच राहिले. मागील दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव १३ ते १४ डॉलर प्रति बुशेल्सच्या दरम्यानच फिरत आहेत.
तर ५०० डॉलरचा टप्पा गाठलेल्या सोयापेंडने मागील दोन महिन्यांत क्वचितच ४०० डॉलरचा टप्पा गाठला. सोयापेंडीचे भाव ३०० ते ४०० डॉलरच्या दरम्यान आहेत. सहाजिक आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाईचा देशातील बाजारावर दबाव आला.
दुसरीकडे उत्पादन वाढून मागणी थंड असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेल, सोयातेल आणि सूर्यफूल तेलाचे दर पडले. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने तेलाचे साठे पडून होते. पण निर्यातीबाबत तोडगा निघाल्यानंतर दोन्ही देशांनी कमी भावात सूर्यफूल तेलाचा साठा बाजारात आणला.
नव्या हंगामातील उत्पादनासाठी साठे खाली करण्याचेही उद्दिष्ट होते. दुसरीकडे मागील दोन वर्षे देशात खाद्यतेलाचे भाव वाढले होते. त्यामुळे भारत सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात मोठी कपात केली. दोन वर्षांत ४० लाख टन कच्चे सोयाबीन आणि कच्चे सूर्यफूल तेलाची शुल्कमुक्त आयात करण्यासही परवानगी दिली होती.
त्या निर्णयात आता बदल करण्यात आला. पण देशात खाद्यतेल आयातीचा लोंढा आला. सर्वच खाद्यतेलाचे भाव जवळपास ४० टक्क्यांपर्यंत कमी झाले. सूर्यफूल तेलाची आयात वाढल्याने पहिल्यांदाच सोयाबीन तेल सूर्यफूल तेलापेक्षा महाग झाले. सहाजिकच सूर्यफूल तेलाला मागणी वाढली. याचा परिणाम सोयाबीन बाजारावर होत होता.
देशात वाढले खाद्यतेलाचे साठे
देशात खाद्यतेल आयात वाढून साठे वाढले. देशातील तेल विपणन वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे असते. चालू तेल वर्षात यंदा खाद्यतेल आयात २० टक्क्यांनी वाढली. यंदा पहिल्या सात महिन्यांमध्ये ९० लाख ५५ हजार टन आयात झाली.
गेल्या हंगामात याच काळात ७५ लाख ४८ हजार टनांची आयात झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाल्यानंतर आयात वाढत गेली. त्यामुळे देशातील खाद्यतेलाचा स्टॉकही गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. १ जून रोजी देशात २९ लाख ४१ हजार टनांचा स्टॉक होता.
तर १ जून २०२२ रोजी हाच स्टॉक २२ लाख ४६ हजार टनांवर होता. मागील काही महिन्यांची आयातीची गती काहीशी मंदावली, त्यामुळे स्टॉक कमी झाला. नाहीतर एप्रिलमधील स्टॉक जवळपास ३५ लाख टनांच्या दरम्यान होता.
मे महिन्यात वाढली सोयाबीन, सूर्यफूल तेल आयात
मे महिन्याचा विचार करता पाम तेलाची आयात कमी झाली तर सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात वाढली आहे. पाम तेलाची आयात एप्रिलच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी होऊन मे महिन्यात ४ लाख ३९ हजार टनांवर आली. तर सोयाबीन तेलाची आयात २१ टक्क्यांनी वाढली. मे महिन्यात भारतात ३ लाख १९ हजार टनांची आयात झाली. तसेच सूर्यफूल तेलाचीही आयात १८ टक्क्यांनी वाढून २ लाख ९५ हजार टनांवर पोहोचली आहे.
रिफाइंड तेलाचे शुल्क कमी का केले?
साठे वाढल्याने तेल कमी दरात मिळूनही आयात कमी होत होती. त्यामुळे सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करावी, अशी मागणी केली जात होती. शेतकरी, व्यापारी, प्रक्रियादारांनी आयात शुल्काची मागणी केली. देशात खाद्यतेल स्वस्त झाल्याने सरकार आयात शुल्कात वाढ करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण बुधवारी सरकारने सर्वांनाच धक्का दिला.
सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि रिफाइंड सूर्यफूल तेल आयात शुल्कात ५ टक्क्यांची कपात केली. १७.५० टक्क्यांवरून आयात शुल्क १२.५० टक्क्यांपर्यंत कमी केले. आता १३.७५ टक्के आयातशुल्क लागणार आहे. देशात सध्या रिफाइंड तेलाची आयात जास्त होताना दिसत नाही. तसेच आयातशुल्क कमी केले तरी आयात परवडणारी नाही.
कारण कच्च्या तेलाचे भाव खूपच कमी झाले आहेत. असे आयातदारांच्या वतीने सांगण्यात आले. पण सध्या कच्च्या तेलाचे भाव पडले आहेत. त्यामुळे आयातशुल्कात कपात केली, तरी रिफाइंड तेलाची आयात वाढण्याची शक्यता कमीच आहे. तसेच याचा खाद्यतेल बाजारावर परिणाम होण्याची शक्यता नाही. काही काळ मानसिक परिणाम दिसू शकतो. पण दीर्घकाळ रिफाइंड खाद्यतेल आयातशुल्क कपातीने दर कमी होणार नाहीत, असे जाणकारांनी सांगितले.
रिफाइंड तेलाची आयात
चालू हंगामात पहिल्या सात महिन्यांमध्ये देशात ११.८६ लाख टन रिफाइंड तेलाची आयात झाली. एकूण आयातीत रिफाइंड तेलाचा वाटा १३ टक्के होता. तर गेल्या हंगामात हाच वाटा १४ टक्के होता. पण डिसेंबर २०२२ नंतर कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यानंतर देशात रिफाइंड तेलाची आयात कमी होत गेली. एप्रिल आणि मे महिन्यांतील आयात सर्वांत कमी झाली.
मे महिन्यात तर नीचांकी ८५ हजार टनांची आयात झाली. रिफाइंड तेलाची आयात कमी होत असल्यामुळेच सरकारने रिफाइंड तेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्याचे जाणकारांनी सांगितले.
महिनानिहाय रिफाइंड तेलाची आयात (लाख टन)
महिना…आयात
नोव्हेंबर…२.०२
डिसेंबर…२.५६
जानेवारी…१.७३
फेब्रुवारी…१.८७
मार्च…१.६९
एप्रिल…१.१२
मे…०.८५
सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर
देशात खाद्यतेलाची आयात गेल्या वर्षीपेक्षा २० टक्क्यांनी वाढली. खाद्यतेलाचे भावही कमी झाले. यामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. खाद्यतेलाचे दर कमी झाल्यानंतर सोयाबीनच्या दरातही क्विंटलमागे ५०० रुपयांची नरमाई आली.
सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आजही शेतकऱ्यांकडे सोयाबीन मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी भाववाढीची वाट पाहत आहेत. सोयापेंडीचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारामुळे दबावात आहे. तसेच देशातही यंदा सोयाबीन पुरवठा जास्त होता.
त्यामुळे सोयापेंड उत्पादन जास्त राहणार आहे. परिणामी, सोयापेंडीकडून सोयाबीन दराला यापुढे मिळणारा आधार कमीच राहिला. यामुळे सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती. पण सरकारने उलटे आयात शुल्कात कपात केली.
अमेरिकेतील स्थिती काय?
अमेरिकेच्या सोयाबीनचा भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर तुलनेत जास्त परिणाम होत असतो. कारण अमेरिकेतील सोयाबीन सप्टेंबरमध्ये बाजारात येते. तर भारताचे सोयाबीन ऑक्टोबरपासून बाजारात यायला सुरुवात होते. अनेक अभ्यासक आणि संस्था दोन्ही देशांचा हंगाम एकाच काळात पकडतात.
त्यामुळे अमेरिकेत उत्पादन वाढले किंवा घटल्याचा काहीसा परिणाम लगेच देशात जाणवू लागतात. कारण भारताच्या सोयाबीनचे दर प्रामुख्याने सोयापेंड निर्यातीवर अवलंबून असतात. सोयापेंड बाजारावर अमेरिकेचा जास्त परिणाम होत असतो.
आतापर्यंत अमेरिकेतील सोयाबीन पेरणी जवळपास पूर्ण झाली. अमेरिकेत यंदा पेरा वाढण्याची शक्यता होती, पण तसे झाले नाही. गेल्या वर्षी ऐवढेच क्षेत्र अमेरिकेत सोयाबीन खाली आले. पण अमेरिकेतील मध्य पूर्वेतील भागात सध्या उष्ण वातावरण आहे.
मागील काही दिवसांमध्ये या भागात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा अमेरिकेत सोयाबीन उत्पादन ६४ लाख टनांनी वाढून १ हजार २२७ लाख टनांवर पोहोचेल, असा अंदाज ‘यूएसडीए‘ने व्यक्त केला. पण सोयाबीन उत्पादन शेवटी पाऊसमान कसे राहते यावर अवलंबून राहील. अर्जेंटिनात यंदा उत्पादनवाढीची शक्यता आहे.
सोयाबीन बाजाराचे मॉन्सूनकडे लक्ष
यंदा देशात ‘एल निनो’ची स्थिती आहे. यामुळे यंदा देशात पाऊसमान कमी राहण्याची शक्यता आहे. मॉन्सूनची वाटचालही अडखळतच सुरू आहे. आतापर्यंत देशात पेरणीयोग्य पाऊसच झाला नाही. त्यामुळे १६ जूनपर्यंत खरिपाच्या पेरण्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी पिछाडीवर आहेत. सोयाबीनची पेरणी ७० टक्क्यांनी कमी झाली.
पुढील काळात चांगला पाऊस झाल्यास पेरण्या वेग घेतील. पण यंदा महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पाऊसमान गेल्या वर्षीपेक्षा कमीच राहणार आहे. या दोन्ही राज्यांतील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. विदर्भ आणि मराठवड्यातील अनेक भागांमध्ये पाऊस यंदा दगा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीन उत्पादन किती राहील, याविषयीचा अंदाज वर्तविणे शक्य नाही.
मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पाऊस कमी राहील, असा अंदाज आहे. याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे बाजाराचे लक्ष मॉन्सूनचा पाऊस, सोयाबीन लागवड आणि पिकाला पोषक वातावरणाकडे आहे. यापैकी एकही घटक अनुकूल नसला, तरी सोयाबीन उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. असे झाल्यास सोयाबीन बाजाराला आधार मिळेल.
देशात सध्या ५९ लाख टन सोयाबीन गाळपाविना आहे. यापैकी काही सोयाबीन लगेच बाजारात येईल. पावसाने जास्त ओढ दिली किंवा पेरण्या वेळेवर झाल्या नाहीतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.