Soybean Update : देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. काही ठिकाणी दरात १०० रुपयांपर्यंत चढ उतार दिसतात. पण भावपातळी मागील दोन महिन्यांपासून स्थिर दिसते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि खाद्यतेलाचे भाव घसरले आहेत. परिणामी देशात खाद्यतेल आयात वाढली. याचा दबाव सोयाबीन बाजारावर दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. विशेष म्हणजे सध्या सोयाबीनपेक्षा सूर्यफुल तेलाचे भाव कमी झाले. त्यातच ब्राझीलचे सोयाबीन बाजारात येत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे भाव कमी झाले.
एक महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे भाव ४०० डाॅलरपेक्षा कमी आहेत. याचा दबाव आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन दरावर येत आहे. परिणामी सोयाबीनचे वायदे सतत १४ डाॅलर प्रतिबुशेल्सपेक्षा कमी आहेत. मागील एक महिन्यांपासून सोयाबीनचे वायदे १३ ते १४ डाॅलरच्या दरम्यान आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयातेल तसेच सोयापेंडचे दर दबावात असल्याचा परिणाम देशातही जाणवत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल स्वस्त झाल्याने देशात आयात वाढली. आयात साठे वाढल्याने देशात तयार झालेल्या खाद्यतेलाला कमी उठाव मिळाला.
परिणामी दरावर दबाव वाढत गेला. सध्या पामतेल आणि सूर्यफुल तेल सोयाबीन तेलापेक्षा स्वस्त झाले. एरवी सूर्यफुल तेलाचे भाव सोयाबीन तेलापेक्षा जास्त पाहायला मिळायचे. पण सध्या सूर्यफुल तेल स्वस्त झाले. त्यामुळे सोयाबीन तेलाला फटका बसत आहे.
भारतातून आतापर्यंत जवळपास १४ लाख टन सोयापेंड निर्यात झाली. ही निर्यात गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट आहे. आताही देशातून निर्यात होत आहे. यापुढील काळातही निर्यात सुरु राहील. पण निर्यातीची गती कमी राहण्याचा अंदाज आहे. तरीही चालू हंगामात म्हणजेच ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या काळात देशातून २० लाख टनांच्या दरम्यान सोयापेंड निर्यात होण्याचा अंदाज आहे.
यापुढील काळात सोयापेंडची भीस्त देशातील बाजारावरच जास्त राहील. देशातही सोयापेंडला मागणी चांगली आहे. त्यामुळे सोयाबीन बाजाराला आधार दिसतो. सध्या सोयाबीन ४ हजार ८०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत.
यापुढील काळात सोयाबीनच्या भावात २०० ते ३०० रुपयांचे चढ उतार दिसू शकतात. सध्या सोयाबीन भावात मोठी तेजी दिसत नाही, असे जाणकारांनी सांगितले. पण माॅन्सून काळात पाऊस कमी राहीला किंवा पेरणीवर परिणाम झाल्यास दराला चांगला आधार मिळेल, असेही जाणकारांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.