गव्हाच्या संशोधित वाणामुळे बेकरी उत्पादकांना दिलासा?

बेकरी उत्पादन क्षेत्रासाठी आवश्यक प्रकारचा गहू भारतात उपलब्ध नसल्याने या क्षेत्राकडून गहू आयात करण्यात येतो. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात भारताने ४२२६ रुपये प्रति क्विंटल दराने ३१०८ टन गहू आयात केला होता.
Pusa Soft Wheat
Pusa Soft WheatAgrowon

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (IARI) पुसा सॉफ्ट व्हीट १ (एचडी ३४४३) वाण विकसित केल्यामुळे बेकरी उद्योग क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. बेकरी उत्पादनांसाठी या क्षेत्राकडून दुप्पट पैसे मोजून बाहेरच्या देशातून विशिष्ट प्रकारचा गहू आयात करण्यात येतो. कृषी संशोधकांनी बेकरी उत्पादकांना लागणाऱ्या गव्हाचे वाण विकसित केल्यामुळे त्यांना गहू आयात करण्याची गरज भासणार नाही.

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या संशोधकांनी विकसित केलेल्या पुसा सॉफ्ट व्हीट १ (एचडी ३४४३) या वाणाचा वापर देशातील सर्वच गहू उत्पादक राज्यांत करता येणार असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. बिझनेस लाईनने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

पुसा सॉफ्ट व्हीट १ (एचडी ३४४३) या वाणाची प्रोटेक्शन फॉर प्लॅन्ट व्हरायटी अँड फार्मर्स राईट्स ॲथॉरिटीकडे नोंदणी करण्यात आलेली आहे. त्याच्या पुढचे संशोधनही प्रत्यक्ष वापरासाठी तयार असल्याचे भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या प्रमुख शास्त्रज्ञ व जेनेटिक्स विभागाच्या ग्रेन क्वालिटी लॅब्रॉटरीजच्या प्रमुख अंजु महेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.

सिंग यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या गटाने हे वाण विकसित केले आहे. त्यासाठी तब्बल १० वर्षांहून अधिक काळ संशोधन सुरु होते. बेकरी उत्पादन क्षेत्रासाठी आवश्यक प्रकारचा गहू भारतात उपलब्ध नसल्याने या क्षेत्राकडून गहू आयात करण्यात येतो. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात भारताने ४२२६ रुपये प्रति क्विंटल दराने ३१०८ टन गहू आयात केला होता. २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात भारताने ३७९७ रुपये प्रति क्विंटल दराने २१४७ टन गहू आयात केला होता.

पुसा सॉफ्ट व्हीट १ (एचडी ३४४३) या वाणाच्या माध्यमातून शेतकऱ्याला हेक्टरी ५ टन गव्हाचे उत्पादन घेता येते. या गव्हात प्रोटीनचे प्रमाण ११.५ टक्के असते. तर ग्लुटेनचा स्तर ८.९ टक्के असल्याचे सिंग म्हणाल्या आहेत. या गव्हातील ग्लुटेनची क्षमता स्थानिक हवामानानुसार बदलते.

या प्रकारच्या वाणात उत्पादकता कमी असते. त्यामुळे बेकरी उद्योग क्षेत्रासाठी म्हणून तसे वाण विकसित करणे शास्त्रज्ञांसाठी आव्हान होते. ऑस्ट्रेलियातील सॉफ्ट व्हीटच्या वाणापासून हेक्टरी १. ५ टन उत्पादन घेता येते. अमेरिकेत हे प्रमाण हेक्टरी ४.५ टन आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत पीक ९ महिन्यांनी हातात येते. याउलट भारतात पीक १२५ दिवसांत परिपक्व होते. यापूर्वी २००८-२००९ मध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेले एचएस ४९० हे वाण प्रत्यक्ष उपयोगात आता आले नाही कारण या वाणाची उत्पादकता अत्यल्प होती.

या वाणाच्या गव्हाला दळण्यासाठी फार जोर द्यावा लागत नाही. इतर गव्हाच्या तूलनेत त्याचे पीठ खूप बारीक असते. त्याला मळण्यासाठी कमी पाणी लागते. या गव्हाच्या पिठापासून केवळ केक, बिस्किट्स, नुडल्स अशी उत्पादने करण्यात येतात.

भारतीय कृषी संशोधन संस्थेने २०१२ पासून या प्रकल्पावर काम केले. भारत-ऑस्ट्रेलिया सहकार्य उपक्रमांतर्गत हे संशोधन करण्यात आले. हे वाण विकसित करताना इंटरनॅशनल मेझ अँड व्हीट इम्प्रूव्हमेन्ट सेन्टरची (CIMMYT) मदत घेण्यात आली आहे. मऊपणा आणि ग्लूटेनसाठी मॉलिक्युलर मार्कर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचेही सिंग यांनी नमूद केले आहे. भारताप्रमाणेच मध्य पूर्वेकडील देशही बेकरी उत्पादनांसाठी ऑस्ट्रेलियाकडून गहू आयात करत असतात. त्यामुळे भारताला त्या देशांनाही पुसा सॉफ्ट व्हीट १ (एचडी ३४४३) या वाणाचा गहू निर्यात करता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com