
उद्दिष्ट्ये - पुरेसे भांडवल उपलब्ध नसलेल्या व्यक्तींना त्यांचा उद्योग, व्यवसायाच्या उभारणीसाठी किंवा विकासासाठी कर्जपुरवठा (Loan For Development) करणे.
ग्रामीण व शहरी छोटे व्यावसायिक, प्रोप्रायटर किंवा भागीदारी किंवा उत्पादक फर्म, लहान दुकानदार, भाजी विक्रेते, ट्रकचालक, खाद्य पदार्थ सेवा देणारे, विविध वस्तूंची दुरुस्ती करणारे, यंत्रचालक, लघू उद्योग, बलुतेदार, अन्न व खाद्यपदार्थ बनविणारे कृषिपूरक व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, मधमाशीपालन, कुक्कुटपालन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, ॲग्रो क्लिनिक ॲग्री बिझनेस सेंटर (Agro clinic Agri Business), अन्न व कृषी प्रक्रिया (Food And Agri Process), वितरक, किरकोळ व्यापारी, वाहतूकचालक, विविध कंपन्यांना छोट्या मोठ्या सेवा पुरवणारे अशा विविध प्रकारच्या व्यावसायिकांना त्यांच्या नवीन व्यवसाय उभारणीसाठी किंवा चालू असलेल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी कर्जपुरवठा () केला जातो.
कशा प्रकारे व किती कर्ज मिळू शकते?
मुदत कर्ज आणि/ किंवा खेळते भांडवल कमाल रु. १० लाख.
कर्जाचे तीन प्रकार -
शिशू : रु. ५०,००० पर्यंत
किशोर : रु. ५०,००० पेक्षा जास्त व रु. ५ लाख पर्यंत
तरुण : रु. ५ लाखांपेक्षा जास्त व रु. १० लाखांपर्यंत.
कर्जदाराची स्वत:ची रक्कम किंवा भांडवल -
शिशू : काही नाही
किशोर : १५%,
तरुण : १५%
परतफेड कालावधी -
अल्प मुदतीसाठी (Demand Loan) : कमाल ३६ महिने.
मुदतीचे कर्ज (Term Loan) : कमाल ८४ महिने.
तारण : कर्जातून निर्माण झालेले घटक (Assets) बँकेकडे तारण राहतात. त्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही अतिरिक्त तारण (Collateral Security) लागत नाही.
व्याज दर :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया / बँक यांच्या नियमानुसार.
एकाच गावातील दोन तरुण राम आणि श्याम. दोघांचेही शिक्षण कसबसे दहावी बारावीच्या भोज्जाला शिवलेले. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला बसलेच नाहीत असे. गेल्या तीन, चार वर्षांपासून पूर्णवेळ शेतीमध्ये काम करणाऱ्या दोघांनाही आता एखादा व्यवसाय करावा असे वाटू लागले होते. श्यामने शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करायचे मनावर घेतले. कुक्कुटपालनातील मांसासाठी व अंड्यासाठी अशा दोन्ही प्रकाराचे प्रशिक्षणही कृषी विभागाच्या मदतीने घेतले. थोडी शास्त्रीय माहिती व काही शेतकऱ्यांच्या संपर्कामुळे त्याला आत्मविश्वास आला. बँकेत चौकशी केली. त्यांनी ब्रॉयलरसाठी त्रिपक्षीय करार असल्यास बँक प्राधान्य देईल, असे सांगितले. त्यांनी सुचविल्याप्रमाणे एका कंपनीशी एक दिवसाची पिले, खाद्य, औषधे तसेच तयार पक्ष्यांच्या विक्रीसंबंधी करार केला. त्यानुसार ६००० पक्ष्यांचा प्रकल्प अहवाल तयार केला.
राम शेतीसोबतच घरातील चार संकरित गायींचे पालन करत होता. त्यामुळे तो व्यवसाय वाढवितानाच देशी गाईही त्याला खुणावत होत्या. देशी गाईंच्या दुधाला चांगला दर मिळू शकेल, असे वाटत होते. मग त्याने देशी गायी संगोपनाचे प्रशिक्षण एका संस्थेमार्फत घेतले. त्यावर आधारित ६ देशी गाई खरेदी व व्यवसायासाठी कर्ज घेण्याचे ठरवले. दोघेही त्यासाठीच बॅंकेत आले होते. तेव्हा बॅंकेत शाखाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या दोघांचीही प्रकरणे आम्ही ‘मुद्रा’ योजनेअंतर्गत मंजूर केली आहेत. या शाखेला मुद्रा योजनेअंतर्गत उद्दिष्ट दिले असून, त्यात शेतीसंलग्न प्रकल्पही समाविष्ट आहेत.’’ दोघांनाही हे मुद्रा म्हणजे काय प्रकरण हे कळलेच नाही. धाडस करून श्यामने विचारले, ‘‘ मुद्रा योजनेत आमचा काय फायदा?’’ तेव्हा त्यांना बॅंकेच्या कृषी अधिकाऱ्यांनी समजून सांगितले. मुद्रामध्ये अन्य कोणत्याही तारणाशिवाय, पाच लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यातील स्वतःचा वाटाही १५ टक्के इतका लागतो. अन्य कर्जांसाठी तो २५ टक्क्यांपर्यंत असू शकतो. तुमचे कर्ज पाच लाखांपर्यंत आहे, म्हणजे मुद्रा योजनेच्या तरुण प्रकारामध्ये बसते. काही काळजी करू नका. व्यवस्थित परतफेड करा म्हणजे झाले.”
थोड्याच दिवसांनी बॅंक व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमांमध्ये विविध सरकारी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कर्जप्रकरणांचे मंजुरी पत्र किंवा वाटप पत्र देण्यात आले. मुद्रा योजनेमुळे दोघांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. या कार्यक्रमात झालेल्या भाषणांमुळे आपल्यावरील कर्जफेडीच्या जबाबदारीची जाणीवही झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.