Soybean, Tur Rate : खरिपातील सोयाबीन आणि रब्बी हंगामातील हरभरा यांच्या उलाढालीच्या माध्यमातून दर्यापूर (जि.अमरावती) बाजार समितीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील ९४० हून अधिक गावे खारपाणपट्ट्यात मोडतात.
या भागातील शेतीमालाला विशिष्ट चव असल्याने दिल्लीहून तसेच हरभऱ्याला दिल्लीसह दक्षिण भारतातून मोठी मागणी राहते. खारपाणपट्ट्यात उत्पादित हरभऱ्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न होत आहेत.
बाजार समितीविषयी
सन १९७१ पासून कामकाजास सुरुवात झालेल्या बाजार समितीचे कार्यक्षेत्र दर्यापूर शहर व तालुक्यांतील १३२ गावे आहेत. बाजार समितीची ११.३५ हेक्टर जमीन स्वमालकीची आहे. पैकी ४.८६ हेक्टरवर धान्य खरेदीचे व्यवहार होतात. सुमारे एक हेक्टर जमीन वखार मंडळास भाडेतत्वावर दिली आहे. येवदा येथे २.२५ हेक्टर, तर खल्लार येथे सुमारे दोन हेक्टर क्षेत्रात उपबाजार आहे.
उत्पन्नवाढीसाठी दर्यापूर येथे मुख्य बाजार परिसरात पेट्रोल पंप उभारला आहे. खल्लार येथे तो मंजूर झाला आहे. सभापतीपदी सुनील गावंडे (पाटील), उपसभापतिपदी श्रीकृष्ण कराळे तर सचिवपदी हिं. म. मातकर जबाबदारी सांभाळत आहेत.
परवानाधारक
व्यवहार पारदर्शी असावे यासाठी व्यापारी, अडते यांना परवाने देण्यात आले आहेत. त्यानुसार कापूस व धान्य व्यापाऱ्यांची संख्या ९८ आहे. अडते १५६, प्रक्रियादार १, खरेदी मदतनीस २, अडत मदतनीस २, मापारी ११३, हमाल ४३१ याप्रमाणे परवानाधारक आहेत.
व्यापारी व अडत्यांकडून परवाना शुल्कापोटी २०० रुपये आकारले जातात. येथे खरेदी झाल्यानंतर व्यापाऱ्यांकडून उत्तर भारत व अन्यत्र मालाचे वितरण केले जाते.
लिलाव पद्धती
शेतकऱ्यांनी शेतीमाल आणल्यानंतर आवारात खाली करून त्याचा ढीग लावला जातो. त्यानंतर बोली लावण्याची पद्धती येथे आहे. याला खुला लिलाव असे म्हटले जाते. ठिय्या पद्धतीनुसार मालाचा लिलाव करून त्याच ठिकाणी मोजमाप केले जाते.
लिलावापूर्वी शेतकऱ्यांच्या मालाचे वजन वाहनासह करून देण्याची सुविधा अवघ्या दहा रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी ६० टनांचा भुईकाटा बसविण्यात आला आहे. शेतकरी वगळता व्यापाऱ्यांसाठी वाहन प्रकारानुसार दर आकारले जातात.
शेतीमाल तारण योजना
बाजार समितीच्या वतीने स्वनिधीतून तारण योजना राबविण्यात येते. सन २०२१-२२ मध्ये ६६ शेतकऱ्यांचा माल तारण ठेवण्यात आला. २३८०.३४ क्विंटल तारण असलेल्या या मालाच्या माध्यमातून ९५ लाख ४२ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.
याद्वारे एक लाख २५ हजार ७२३ रुपयांचे व्याज प्राप्त झाले. बाजारभाव आणि हमीभाव यातील सरासरीच्या आधारे तारण शेतीमालाचा दर निश्चित करून शेतकऱ्यांना ७५ टक्के रक्कम दिली जाते. बाजार समितीकडे स्वतःचे गोदाम असले, तरी या ठिकाणी तारण शेतीमाल साठविला जात नाही.
महाराष्ट्र राज्य वखार मंडळाच्या गोदामात शेतकऱ्यांनी आपला माल तारण ठेवावा. त्याची पावती आणल्यानंतर त्यावर पैसे देण्याची सोय आहे. शेतकऱ्याला माल सोडवायचा असल्यास त्याने व्याजासह तारणापोटी घेतलेली रक्कम परत करावी. त्याआधारे बाजार समितीकडून लेखी घेतल्यानंतर तारणमाल सोडवीण्यात येतो, अशी पद्धती आहे.
सन २०२२-२३ मध्ये ४९ शेतकऱ्यांना ७२ लाख ८९ हजार रुपयांचे वाटप करणात आले. कृषी विभाग व तत्सम यंत्रणांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांसाठी शेतकरी भवन सभागृहाची सुविधा नाममात्र शुल्कात उपलब्ध केली जाते.
दर्यापूर बाजार समिती- प्रातिनिधिक आकडेवारी (सन २०२२-२३)
शेतीमाल आवक (क्विंटल) किंमत रु. (सुमारे)
सोयाबीन- २,७०,०७३ -- १ अब्ज, ४२ कोटी ७२ लाख ७८ हजार
तूर- १,६६,२३४ -- १ अब्ज, १० कोटी ७५ लाख ४६ हजार
उडीद १७८८ - ७४ लाख, ३९ हजार ३९३
मूग- ४,६९१ - २ कोटी १९ लाख ४४ हजार
हरभरा १,७२,२८३ - ७८ कोटी ९४ लाख ९९ हजार ६१० रु.
तीळ- २ क्विं. ८९ किलो - ३२ हजार ३१५
राई (मोहरी) १२ क्विंटल ८३ किलो- ६२ हजार ६७४
मिळालेले दर रु. प्रति क्विंटल (वर्ष २०२२- २३)
शेतमाल सरासरी कमाल
सोयाबीन- ५२८५ ८४००
तूर- ६६६३ ९१००
मूग- ४६७८ ७७१०
उडीद- ४१५९ ६५७५
हरभरा ४५८६ ५८५०
बाजार समितीचे एकूण उत्पन्न
२०१९-२० : दोन कोटी चार लाख ४५ हजार ४५४ रु.
२०२०-२१ : चार कोटी १६ लाख ४० हजार ६१२ रु.
२०२१-२२ : तीन कोटी ६५ लाख ६३ हजार १८८ रु.
हिं. म. मातकर, ९६५७२४०३९१
सचिव, दर्यापूर बाजार समिती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.