
दशेरी आणि इतर प्रकारच्या आंबा (Mango) प्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी आहे. प्रतिकूल हवामानामुळे यंदा उत्तर प्रदेशातील आंबा उत्पादनात ७० टक्क्यांची घट झाली आहे. आंबा उत्पादकांनी ही माहिती दिली आहे. वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
उत्पादन घटल्यामुळे आंब्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात दरवर्षी सरासरी ३५ ते ४५ लाख टन आंब्याचे उत्पादन होते. प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्यामुळे यंदा राज्यातील आंब्याचे उत्पादन १० ते १२ लाख टनांवर सीमित झाले आहे. त्यामुळे बाजारात आंबा (Mango) चढ्या दराने विकल्या जात आहे.
आंबा प्रेमींना आंब्यासाठी जास्त आर्थिक झळ सोसावी लागत असल्याचे मँगो ग्रोव्हर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष इन्साराम अली यांनी म्हटले. फेब्रुवारी आणि मार्च या मोहोर येण्याच्या मोसमातील उच्चतम तापमानामुळे आंबा उत्पादनात (Mango Production)घट झाल्याचे अली यांचे म्हणणे आहे. या मोसमात ३० ते ३५ अंश सेल्सियस तापमानची आवश्यकता असते. प्रत्यक्षात या मोसमात पारा ४० अंश सेल्सियसवर गेल्यामुळे आंब्याचे नुकसान झाल्याचे अली म्हणालेत.
लखनौमधील मलिहाबाद हे आंबा उत्पादनासाठी (Mango Production)प्रसिद्ध असून इथला दशेरी आंबा त्याच्या विशिष्ट चवीमुळे जगभरात ओळखल्या जातो. आजवर आपण आंब्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कधीच अनुभवले नव्हते. यावर्षी हजारो आंबा उत्पादकांना प्रतिकूल हवामानाचा फटका बसला असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे मलिहाबादचे आंबा उत्पादक मोहम्मद नसीम यांनी सांगितले.
हवामानतज्ज्ञांच्या मते यावर्षीचा मार्च महिना हा गेल्या १२२ वर्षातील सर्वाधिक उष्ण मार्च ठरला आहे तर यंदाच्या एप्रिल महिन्यातील तापमानही ५० वर्षातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.
दरवर्षी उत्तर प्रदेशातले आंबा उत्पादक आपला आंबा (Mango)सौदी अरेबिया, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आदी देशांत निर्यात करत असतात. यावर्षी उत्तर प्रदेशातील मागणीही पूर्ण करू शकत नसल्याचे इन्साराम आली यांनी सांगितले.
मागच्या दोन वर्षांत कोविडच्या प्रादुर्भावामुळे आंबा (Mango) उत्पादकांना निर्यात करता आली नव्हती. त्यामुळे त्यांना यावर्षी आंबा निर्यातीतून नुकसान भरून काढण्याचे वेध लागले होते. मात्र यंदा प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्याने त्यांचे नुकसान झाल्याचे अली यांनी नमूद केले.
भारत जगभरात प्रमुख आंबा उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. जगातील एकूण आंबा उत्पादनाच्या निम्मे उत्पादन भारतात होते. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, गुजरात,महाराष्ट्र आदी राज्यांत आंब्याचे उत्पादन होते. त्यातही लखनौच्या दशेरीला विशेष मागणी असते. लखनौ, प्रतापगड, हरदोई, सहारणपूर, बाराबंकी आणि सीतापूरचा परिसर आंबा उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जातो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.