संस्थात्मक अपयश

आयएलएफएस, डीएचएफएल, पंजाब ॲन्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बॅँक घोटाळ्यापासून ते एबीजी शिपयार्डपर्यंत भ्रष्टाचाराच्या सर्व प्रकरणांत फक्त एक दोन व्यक्तींची नावे घेतली गेली; सिस्टीम मात्र दोषी ठरवण्यात आली नाही.
Institutional failure
Institutional failure

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मधील कोलोकेशन आणि हिमालयीन योगी घोटाळ्यात चित्रा रामकृष्ण, रवी नारायण, आनंद सुब्रमण्यम जबाबदार; परंतु NSE चे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स / अपॉइंटमेंट सब कमिटी / नियामक मंडळ म्हणून सेबी या संस्थात्मक यंत्रणा कुचकामी ठरल्या, त्याबद्दल  मात्र  चकार शब्द काढला जात नाही. पंजाब नॅशनल बॅंंकेच्या (PNB) घोटाळ्यात निरव मोदी, मेहुल चोक्सी या भ्रष्ट व्यक्ती जबाबदार; परंतु वर्षानुवर्षे घोटाळा सुरु असताना PNB मधील इंटर्नल ऑडिट सिस्टीम / पीएनबीचे नियामक मंडळ / दर तीन महिन्यांनी रिपोर्ट मागवणारी रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडिया, बोर्डावर हांजी हांजी करणारे संचालक नेमणारे केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय या संस्थात्मक यंत्रणा किती पोकळ आहेत याबद्दल मात्र काहीच बोलले जात नाही. पेटीएम (Paytm) चा १ रुपये दर्शनी किमतीचा शेअर २१५० रुपयाला विकला जातो आणि काही दिवसांतच ८०० रुपयांवर येतो. त्यासाठी प्रवर्तक विजयशेखर शर्मा याला दोष दिला जातो; परंतु मुळात सतत तोट्यात असणाऱ्या कंपनीला शेअरला किती प्रीमियम आकारू द्यायचा, मर्चंट बॅंकर्सची जबाबदारी काय, त्यांना काय शिक्षा, पब्लिक इश्यूच्या वेळी काही शे पटींनी नफा कमावून कंपनीतून गुंतवणूक काढून घेणाऱ्या परकीय संस्थांना कोण परवानगी देते, या सगळ्यात सेबी तर याचा आपल्याशी काही संबंध नसल्याचा आव आणते या सगळ्या गोष्टींबद्दल मात्र हाताची घडी तोंडावर बोट. आयएलएफएस, डीएचएफएल, पंजाब ॲन्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बॅँक घोटाळ्यापासून ते एबीजी शिपयार्डपर्यंत भ्रष्टाचाराच्या सर्व प्रकरणांत फक्त एक दोन व्यक्तींची नावे घेतली गेली; सिस्टीम मात्र दोषी ठरवण्यात आली नाही. शेवटी अर्थव्यवस्थेचा प्रचंड अभ्यास असणाऱ्या अण्णांनी आपल्याला शिकवले आहे की; माणसे चांगली असतात किंवा वाईट, माणसे भ्रष्टाचारी असतात किंवा स्वच्छ चारित्र्याची, नैतिक असतात किंवा अनैतिक. सारखे सारखे माणसांची नावे घेऊन चिखल चिवडत बसायचे. त्यामुळे सिस्टीम वगैरे असे काही अस्तित्वात आहे, याचाच विसर पडतो. मेंदू गुडघ्यात ठेवला की उगाच अमूर्त सिस्टीम समजावून घ्यायला विचार करायचे कष्ट वाचतात. ----------- बहुराष्ट्रीय दांभिकता बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्याधिकारी रशिया-युक्रेन युद्धावर बोलू लागले आहेत. वास्तविक त्यांना हुकूमशाही, युद्धखोरी, सामान्य नागरिकांच्या मरणयातना याबद्दल काहीही सोयरसुतक नव्हते, भविष्यात देखील नसेल. पण आता त्यांच्या बुडाला धग लागायला लागल्यावर ते बोलू लागले आहेत. म्हणजे काय तर युद्ध कसेही करून बंद झाले पाहिजे म्हणून ट्विटरवर भूमिका मांडू लागले आहेत. फोर्ड, टोयोटो, ॲपल, गुगल, बोईंग, आयकिया अशा अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ बोलू लागले आहेत. युद्ध नको ही भूमिका बरोबर आहे. ती सर्वांची भूमिका आहे, त्यात काही गैर नाही. पण बहुराष्ट्रीय कंपन्यांना युद्ध का सुरु झाले, त्याला खतपाणी घालणाऱ्या शक्ती कोणत्या यात काडीचाही रस नाही. त्यांना युद्धखोर पुतीनचा भस्मासुर गेली २० वर्षे कसा मोठा झाला, पुतिनसकट रशियातील मूठभर व्यक्तीच्या हातात कशी अब्जावधीची संपत्ती गोळा झाली, त्यामुळे पुतिनचा एककल्ली कारभार आणि महत्वाकांक्षा कशा वाढत गेल्या आणि त्यात त्यांनी कसा हातभार लावला यात रस नाही. याचे कारण म्हणजे रशियातील मार्केट, रशियातील प्रचंड नैसर्गिक साधनसामुग्री (विशेषतः तेल आणि वायू) आणि रशियातील भांडवली गुंतवणुकी यात त्यांना रस होता आणि आहे. तसेच ‘नाटो'ने आपले प्रभावक्षेत्र वाढवण्याच्या महत्वाकांक्षेपोटी, आपली सदस्यसंख्या वाढविण्याच्या खेळात रशियातील पुतिनला उचकवले हे जाणून घेण्यात त्यांना रस नाही. कारण जगभरातील विशेषतः अमेरिकेतील संरक्षण साहित्य उद्योगाला सतत हमखास धंदा मिळत होता. एकाही बहुराष्ट्रीय कंपनीच्या सीईओने जगातील दरवर्षी वाढणाऱ्या अनुत्पादक संरक्षण खर्चावर नापंसती व्यक्त केल्याचे उदाहरण नाही. हे हि पहा : 

जागतिक कॉर्पोरेट आणि वित्त भांडवलाची ही खासियत राहिली आहे. देशात नावापुरती लोकशाही असो, राजेशाही असो, अतिशय खुनशी एकाधिकारशाही किंवा लष्करशाही असो की टोळ्यांचे राज्य असो, ते कोणाशीही धंदा करू शकतात. आपला स्वार्थ जोपर्यंत साधला जात आहे तोपर्यंत त्या त्या देशातील जनतेच्या लोकशाही हक्कांबद्दल, किमान राहणीमानाबद्दल, बालकामगार आणि स्त्रियांच्या स्थानाबद्दल किंवा पर्यावरणीय हानीबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक नसते. हे जागतिक कॉर्पोरेट/ वित्त भांडवलाचे वर्गचारित्र्य आहे आणि त्या भांडवलाचे प्रवक्तेपण करणाऱ्या व्यक्तींचे देखील.   येत्या काही दिवसात युद्ध थांबले तर हीच मंडळी आज ना उद्या आणि यांचे थिंक टँक्स पुतिनच्या रशियाबाबरोबर व्यापार, व्यवसाय करायला तयार होतील. या मंडळींना मिळणाऱ्या अब्जावधी डॉलर्स पॅकेजचा एक लक्षांश भागाने त्यांचा बौद्धिक प्रामाणिकपणा, न जन्मलेल्या पिढ्यांबद्दल विचार, पृथ्वीच्या पर्यावरणाबद्दल आणि मानवी आयुष्यबद्दल सहवेदना तयार झाली तरी जगात बेरच बदल संभवतील

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com