Maize Rate Update : खरिपातील मक्याला यंदा चांगला भाव मिळाला. रशिया, युक्रेन युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याची टंचाई निर्माण होऊन मागणी वाढली होती. परिणामी दरही तेजीत आले होते.
त्यामुळं भाराततून चांगली निर्यात होऊन दरही तेजीत होते. आता देशातील रब्बी मका बाजारात दाखल होतोय. पण दरात नरमाई दिसून येत आहे.
रब्बीतील मका आवकेच्या तोंडावर दरात नरमाई आली. मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये मक्याच्या भावात जवळपास ३० टक्क्यांपर्यंत घट झाली. तर रब्बी हंगामातील मका बाजारात दाखल होताच दोन आठवड्यांमध्ये मका १० ते १५ टक्क्यांनी नरमला.
दरात सतत नरमाई आल्यानं निर्यातदार दर स्थिर होण्याची वाट पाहत आहेत. देशातील बाजारात सध्या मक्याला सरासरी १ हजार ८५० ते २ हजार रुपये भाव मिळतोय.
बाजारात रब्बी मक्याची आवक आता वाढत आहे. पण सुरु असलेल्या पावसामुळं शेतकरी काढणी झाल्याबरोबर बाजारात विक्री करताना दिसत आहेत. पावसामुळं मका वाळवण्यात अडचणी आहेत. परिणामी बाजारात येणाऱ्या मक्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण जास्त आहे. या मक्याचा भावही कमी दिसतो. तसचं हा मका निर्यातीसाठी चालत नाही. यामुळंही निर्यातीसाठी मक्याची टंचाई दिसते.
देशात मक्याचे भाव नरमल्याने निर्यातीचे दरही ५ ते १० डाॅलरनं कमी झाले. त्यामुळं भारताचा मका आता आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक होतोय. सध्या निर्यातदार २८५ डाॅलर प्रतिटनानं मका देऊ करत आहेत. भारतीय मक्याला पाकिस्तानच्या मक्याची स्पर्धा होती.
पण आता भारतातही दर कमी झाल्यानं निर्यात चांगली होण्याची आशा व्यक्त केली जातेय. पुढील काही दिवसांमध्ये दराची पातळी स्पष्ट होईल. त्यानंतर निर्यातीचे सौदेही होतील, असं निर्यातदारांनी सांगितलं.
आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याची टंचाई आहे. त्यामुळं मक्याला मागणीही आहे. पण ब्राझील आणि अर्जेंटीनातील मका पुढील काही महिन्यांमध्ये बाजारात येईल. परिणामी भारताला मका निर्यातीसाठी काही महीने संधी असेल. भारातीय मक्यालाही आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आहे. निर्यातही सुरु झाली. पण बाजारभाव कसे राहतात यावर निर्यातीचं चित्र अवलंबून असेल, असही जाणकारांनी सांगितलं.
जागतिक बाजारात सध्या कमी पुरवठा आणि इथेनाॅलसाठी चांगल्या मागणीमुळं मका सुधारला. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मक्याचे दर दोन महिन्यांतीन उच्चांकी पातळीवर आहेत. पण मागील काही दिवसांमध्ये वाहतुक भाडं कमी झालं. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील आणि अर्जेंटीनाचा मका स्वस्त पडतोय. हे देश २९४ डाॅलर प्रतिटनाने देत आहेत. तर अमेरिकेचा मका ३०३ डाॅलरने मिळतोय.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असल्यानं भारतातून येणाऱ्या काळातही निर्यात वाढू शकते. पण यंदा देशातील गहू उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. तर तुकडा तांदळाचाही तुटवडा दिसतो. त्यामुळं पशुखाद्यासाठी मक्याला मागणी वाढणार आहे. पशुखाद्याबरोबरच स्टार्च आणि इथेनाॅलसाठी मक्याचा उठाव वाढेल. त्यामुळं पुढील काही काळात दरात सुधारणा होईल, असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदारांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.