‘फुले विक्रम’ हरभरा खरेदीला खाद्य महामंडळाचा कोलदांडा

हिरवा रंग असल्याने खरेदीस नकार
Chana Procurement
Chana ProcurementAgrowon

उस्मानाबाद ः ‘फुले विक्रम' जातीचा (Phule Vikram Verity) हरभरा हिरव्या रंगाचा असून तो अपरिपक्व आहे, असे कारण पुढे करीत भारतीय खाद्य महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीस (Chana Procurement) टाळाटाळ केली जात आहे. परंतू हिरवा रंग म्हणजे अपरिपक्वता नाही, असे स्पष्टता राहुरी कृषी विद्यापीठातील (Rahuri Agriculture university) तज्ज्ञांनी केली आहे. मात्र या परस्पर विरोधी दाव्यामुळे उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा हरभरा गोदामावरून (Warehouse) परत पाठविला जात असल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यासह राज्यात यंदा मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर अपेक्षेपेक्षा उतरले आहेत. सध्या हा दर चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आला आहे. दुसरीकडे शासनाकडून हमीभावाच्या माध्यमातून पाच हजार २३० रुपयांचा दर देत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी केला जात आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली हरभऱ्याची ‘फुले विक्रम’ ही जात चांगल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या जातीला पसंती दिली आहे. या जातीचे जेव्हा उत्पादन हाती येते, तेव्हा त्यामध्ये काही अंशी हिरव्या रंगाचे हरभऱ्याचे दाणे दिसून येतात. ग्राहकांकडून हा हरभरा खरेदी केला जातो. मात्र दुसऱ्या बाजूला हे दाणे परिपक्व असतानाही केवळ हिरव्या रंग आहे म्हणून शासनाच्या हमीभाव केंद्रावर या जातीच्या हरभरा खरेदीला टाळाटाळ केल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत.

यंदाच्या वर्षात भारतीय खाद्य महामंडळ हरभऱ्याची उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात खरेदी करीत आहे. येथील कर्मचाऱ्यांना पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्याने हरभरा खरेदी करत असताना हिरवा रंग आहे, म्हणून फुले विक्रम या जातीची खरेदी भारतीय खाद्य महामंडळाकडून केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे कट्टे माघारी पाठवले जात आहेत. सध्या बाजारात हरभऱ्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे.

शेतकऱ्यांची अपेक्षा

फुले विक्रम या जातीमध्ये सुमारे ५ ते १० टक्के हरभरा हा हिरव्या रंगाचा रहातो. त्याचा आकार हा सर्वसाधारण हरभऱ्याएवढाच असतो. हरभऱ्यापासून दाळ तयार केली जाते. हिरव्या रंगाच्या हरभऱ्यामध्ये पिवळ्या रंगाची दाळ दिसून येत आहे. तरीही भारतीय खाद्य महामंडळ या जातीच्या हरभऱ्यास अपरिपक्व समजत आहेत. ज्याचा आकार लहान असतो, तो अपरिपक्व ठरविला जातो. मात्र आकार मोठा असूनही केवळ रंग हिरवा म्हणून हा हरभरा अपरिपक्व समजला जात असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.

याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून भारतीय खाद्य महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तोंडी खुलासा करण्यात आलेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तरीही भारतीय खाद्य महामंडळाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत शासन स्तरावर योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बियाण्यावरच भारतीय खाद्य महामंडळाचे अधिकारी शंका घेत असल्याने आम्ही येत्या काळात कोणते बियाणे पेरावे, असाही प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.

मोठ्या प्रमाणावर हिरव्या रंगाचा हरभरा येत असल्यामुळे असा हरभरा खरेदी करू नये, अशा सूचना दिलेल्या आहेत. अशा रंगाचा हरभरा अपरिपक्व आहे.
रवी वाले, भारतीय खाद्य महामंडळ, औरंगाबाद
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘फुले विक्रम’ या जातीच्या पेरणीसाठी ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीची शिफारस केली आहे. परंतु शिफारशीत कालावधीच्या पुढे उशिरा पेरणी केलेल्या क्षेत्रामध्ये फुलोरा आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअसच्या पुढे असल्यास तसेच पाणी कमी पडल्यामुळे वरच्या भागातील फुले तसेच घाटे भरण्याच्या अवस्थेत पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे हे घाटे हिरवे राहतात. हे प्रमाण केवळ ५ ते १० टक्यांपर्यंत आढळते. परंतु हे घाटे काढणीपर्यंत पक्व झालेले असल्याने खरेदीबाबत अडवणूक चुकीची आहे.
डॉ. एन. एस. कुटे, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com