Cotton Market : शेतकऱ्यांकडे अजून ४५ टक्के कापूस? देशातील दर नेमके कधी वाढणार?

कापूस हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरु झाला. मात्र पहिल्या चार महिन्यांमध्ये शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केली. सरासरीपेक्षा बाजारातील आवक निम्मी होती. पण फेब्रुवारीपासून बाजारातील कापूस आवक वाढत गेली.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Cotton bhav : आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात (Cotton Rate) आजही सुधारणा पाहायला मिळाली. तर देशात काही बाजारांमध्ये चढ उतार होते. पण सरासरी दरपातळी कायम होती. बाजारातील आवक (Cotton Market Arrival) जास्त असल्यानं दरवाढीवर मर्यादा येत आहेत. बाजारातील आवकही कमी जास्त होत आहे.

पण देशपातळीवरील आवक मार्च महिन्यात टिकून आहे. देशातील बाजारात १९६ लाख गाठी कापूस आल्याचे भारतीय कापूस महामंडळाने सांगितले.

कापूस हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरु झाला. मात्र पहिल्या चार महिन्यांमध्ये शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केली. सरासरीपेक्षा बाजारातील आवक निम्मी होती. पण फेब्रुवारीपासून बाजारातील कापूस आवक वाढत गेली.

मार्च महिन्यातील आवक तर सरासरीपेक्षा दुप्पट झाली. याचा दबाव बाजारावर आहे. असं असतानाही शेतकऱ्यांकडं अजून ४० ते ४५ टक्के कापूस शिल्लक असल्याचं सांगितलं जातं.

Cotton Market
Cotton Processing Business : कापूस प्रक्रिया व्यवसाय झाला हायटेक

भारतीय कापूस महामंडळ अर्थात सीसीआयच्या मते, देशातील बाजारात २९ मार्चपर्यंत १९६ लाख गाठी कापूस आला. युएसडीए आणि काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्च महिन्यातील अंदाजानुसार, देशात यंदा ३१३ लाख गाठी कापूस उत्पादन होईल.

उत्पादनाचे अंदाज पुढील काळात बदलूही शकतात. पण तात्पुरतं आपण हा अंदाज गृहीत धरू. शेतकऱ्यांनी १९६ लाख गाठी कापूस विकला. म्हणजेच ६३ टक्के कापूस बाजारात आला. तर ३७ टक्के कापूस शिल्लक आहे. म्हणजेच अजून ११७ लाख गाठी कापूस अजून शिल्लक आहे.

शेतकऱ्यांकडे किती कापूस?

खरा प्रश्न आहे, की शेतकऱ्यांकडे किती कापूस आहे? याबाबत वेगवेगळी मत आहेत. तरीही शेतकऱ्यांकडं ४० किंवा ४५ टक्के कापूस नाही हे स्पष्ट झालं. त्यातच बाजारात न आलेला पूर्ण ३७ टक्के कापूस शेतकऱ्यांकडं असण्याची शक्यताही कमीच आहे.

खेडा खरेदीवाले, व्यापारी आणि प्रक्रिया न झालेला जिनिंगमधला कापूसही यात येतो. त्यामुळं शेतकऱ्यांकडं २५ टक्क्यांपेक्षा जास्त कापूस शिल्लक असण्याची शक्यता कमीच आहे. पण राज्यनिहाय, जिल्हानिहाय शिल्लक कापसाचं प्रमाण कमीजास्त असू शकतं.

दरावर कशाचा दबाव

एप्रिलमध्ये काही दिवस आवकेचा दबाव राहू शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव सुधारत असतानाही देशातील त्याप्रमाणात दर वाढले नाहीत. काही बाजारांमध्ये मागील तीन दिवसांमध्ये सुधारणा दिसली.

पण ही सुधारणा सरसकट दिसली नाही. बाजारातील आवक जास्त आहे तोपर्यंत दर दबावातच राहतील. शेतकरी सध्या कापूस विकतायेत म्हटल्यावर दर वाढवले जाणार नाहीत, असं जाणकार सांगत आहेत.

Cotton Market
Cotton Market : जगभरातील अस्थिरतेने कापसाला फटका शक्य

वायद्यांमधील दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सायंकाळी ५ वाजेपर्यंत कापसाचे वायदे १ टक्क्यांनी वाढले होते. वायद्यांनी आज ८३.३५ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला.

क्विंटलमध्ये हा भाव १५ हजार १०० रुपये होतो. देशातील वायद्यांमध्ये कापूस ६२ हजार ४०० रुपये प्रतिखंडीवर होता. क्विंटलमध्ये हा भाव १७ हजार ५०० रुपये होतो.

देशातील दरपातळी

देशातील बाजारात आज कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार ४०० रुपये भाव मिळाला. हा भाव सरासरी आहे. किमान भाव यापेक्षा कमी असतो. जास्तीत जास्त कापसाला मिळालेल्या भावाची आपण चर्चा करत असतो. किमान किंवा कमाल भाव जास्त शेतकऱ्यांना मिळत नाही.

एप्रिलमध्ये स्थिती काय राहील?

एप्रिलमध्येही काही दिवस कापसाची आवक जास्त राहण्याचा अंदाज आहे. आवक सरासरीपेक्षा जास्त राहिल्यास दरवाढीवर दबाव राहू शकतो. आवक मर्यादीत झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते. तसचं एप्रिल दुसऱ्या आठड्यात युएसडीए आणि त्यानंतर सीएआयचा अंदाज येईल.

या अंदाजात उत्पादन कमी केल्यास दरवाढ लगेच दिसू शकते. कापूस उत्पादनाचे आकडे पुढील काळात कमी होऊ शकतात, अशी बाजारात चर्चा आहे. त्यामुळं कापूस दर जास्त दिवस दबावात राहणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचाही आधार मिळेल.

पण शेतकऱ्यांनी कापूस विकताना केवळ ऐकीव माहितीवरून निर्णय घेऊ नये. आपण कापूस विकत असलेल्या बाजारातील दराची माहिती घ्यावी. फंडामेंटल्स बदलले की दर बदलतात. त्यामुळं कापूस दरावर लक्ष ठेवावं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com