बहुतांश पिकांच्या किमतींत घसरण

वेळेवर पाऊस येण्याची शक्यता, सोयातेल व सूर्यफूल तेलाच्या आयातीला दिलेले मोकळे रान आणि शासनाचे किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी एकूण धोरणात्मक उपाययोजना यांचा हा परिणाम आहे.
Agricultural Produce
Agricultural ProduceAgrowon

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह - २१ ते २७ मे २०२२

२७ मे रोजी संपलेल्या सप्ताहात हळद, कांदा व टोमॅटो वगळता इतर सर्व पिकांच्या किमती उतरल्या. वेळेवर पाऊस येण्याची शक्यता, सोयातेल व सूर्यफूल तेलाच्या आयातीला दिलेले मोकळे रान आणि शासनाचे किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी एकूण धोरणात्मक उपाययोजना यांचा हा परिणाम आहे. गेल्या काही सप्ताहांत किमती फार घसरल्यामुळे कांद्याची आवक कमी झाली. त्याचा परिणाम म्हणून या सप्ताहात किमती काहीशा वाढून रु. ८०० ते रु. ९०० दरम्यान आल्या आहेत. सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) एप्रिल महिन्यात वाढत होते. याही महिन्यात ते वाढत आहेत. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ३.७ टक्क्यांनी वाढून रु. ५०,०८० वर आले होते. या सप्ताहात मात्र ते २.५ टक्क्यांनी घसरून रु. ४८,८५० वर आले आहेत. जून डिलिव्हरी भाव ४.१ टक्क्यांनी घसरून रु. ४६,२३० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भावसुद्धा ०.४ टक्क्याने घसरून रु २,४२७ वर आले आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या महिन्यात मात्र त्या वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या १.७ टक्क्याने वाढून रु. २,३०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.५ टक्क्यांनी घसरून रु. २,२४२ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जून डिलिव्हरी) किमती रु. २,२४९ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. २,००८ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,८७० आहे. मक्याची मागणी वाढती राहणार आहे. मक्याचा इथेनॉलसाठी वाढता वापर, युक्रेन युद्ध व खतांच्या वाढत्या किमती यामुळे मक्याच्या जागतिक किमतीसुद्धा वाढत आहेत.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या महिन्यात सुद्धा त्या घसरत आहेत. या सप्ताहात मात्र त्या १.४ टक्क्याने वाढून रु. ८,३८२ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. ८,००२ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती एप्रिलमध्ये उतरत होत्या. याही महिन्यात त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,६९७ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,२३० आहे. सध्या आवक (साप्ताहिक) ६०,००० ते ८०,००० टन दरम्यान आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ६,७०० होती; या सप्ताहात ती ६,६०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,२७५ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (इंदूर) एप्रिल महिन्यात उतरत होती. याही महिन्यात ती घसरत आहे. या सप्ताहात ती ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ७,०३० वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ३,९५० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) एप्रिल महिन्यात कमी होत होती. गेल्या सप्ताहात ती रु. ५,९४० वर आली होती. या सप्ताहात ती १ टक्क्याने घसरून रु. ५,८८३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,३०० आहे. तुरीची आवक घटली आहे.

कांदा

कांद्याची स्पॉट किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. ६८२ होती; या सप्ताहात ती रु. ८४९ वर आली आहे.

टोमॅटो

टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) ३० एप्रिल रोजी रु. २,८३३ होती; या सप्ताहाच्या शेवटी ती रु. ३,६६७ पर्यंत आली आहे. टोमॅटोची आवक आता कमी होऊ लागली आहे. किमती वाढू लागल्या आहेत.

पीक उत्पादनाचे सुधारित अंदाज

देशातील २०२१-२२ वर्षातील पीक उत्पादनाचे नवीन सुधारित अंदाज केंद्र शासनातर्फे १९ मे २०२२ रोजी प्रसिद्ध झाले. या अंदाजानुसार, गेल्या वर्षातील (२०२०-२१) उत्पादनाच्या तुलनेने देशात या वर्षी तांदूळ (४.३ टक्के), मका (४.८ टक्के), तूर (०.७ टक्के), हरभरा (१७.४ टक्के) व सोयाबीन (१.७ टक्के) यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. गहू (२.९ टक्के), मूग (७.८ टक्के) व कापूस (१०.५ टक्के) यांच्या उत्पादनात मात्र घट झाली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com