
रशिया आणि युक्रेनच्या गव्हाचा (Wheat) आयातदार असलेल्या इजिप्तने अखेर भारताकडून गहू खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे.
रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे जागतिक बाजारात गव्हाची कमतरता निर्माण झाली. हे दोन्ही देश गव्हाचे प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहेत. युद्धामुळे या देशातील गहू पूरवठ्यावर विसंबून असलेल्या देशांनी पर्यायी बाजारपेठ शोधायला सुरुवात केली.
२०२० साली इजिप्तने रशियाकडून १.८ अब्ज डॉलर्सचा गहू खरेदी केला होता. ६१० दशलक्ष डॉलर्सचा गहू युक्रेनमधून खरेदी केला होता. इजिप्त हा गव्हाचा मोठा खरेदीदार देश असून इजिप्तने भारताला गहू निर्यातदार म्हणून मान्यता दिली असल्याचे गोयल म्हणाले आहेत. इजिप्त या वर्षभरात भारताकडून ३० लाख टन गहू खरेदी करणार आहे.
इजिप्तने नुकताच फ्रान्सकडून ४३० डॉलर्स प्रति टन दराने गहू खरेदी केला आहे. भारत इजिप्तला गव्हासाठी कदाचित ४०० ते ४१५ डॉलर्स प्रति टन दर लावण्याची शक्यता यावेळी अपेडाचे अध्यक्ष एम. अंगमुथू यांनी व्यक्त केली आहे.
फ्रान्सच्या तुलनेत आपल्या गव्हातील प्रथिनांचे प्रमाण आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे भारताकडून इजिप्तला दरात किंचित सवलत दिली जाणार आहे. गहू पुरवठादार देशांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताकडून दरांमध्ये लवचिक धोरण राबवले जाईल, असेही अंगमुथू म्हणाले आहेत.
फ्रान्सच्या गव्हात प्रथिनांचे प्रमाण १२. ५ टक्के आहे. भारतीय गव्हात ते ११.५ ते १२. १५ टक्क्यांदरम्यान आहे. फ्रान्सच्या गव्हासाठी इजिप्तला वाहतूक खर्च म्हणून प्रति टनामागे ४० डॉलर्स मोजावे लागतात. भारतीय गहू सुएझ कालव्याला वळसा घालून जात असल्याने इजिप्तला प्रति टनामागे ७० डॉलर्स मोजावे लागणार आहेत.
२०२१-२०२२ (एप्रिल ते जानेवारी) दरम्यान भारताने १. ७४ अब्ज डॉलर्सचा गहू निर्यात केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत भारताची गहू निर्यात ३४० दशलक्ष डॉलर्सवर होती. भारताकडून यापूर्वी शेजारील देशांना गहू निर्यात करण्यात येत होता.त्यातही बांगलादेश हा भारतीय गव्हाचा प्रमुख खरेदीदार देश मानला जातो. मात्र आता बदलत्या परिस्थितीमुळे येमेन, अफगाणिस्थान, कतार,इंडोनेशिया, फिलिपिन्स, ओमान, मलेशिया,श्रीलंका, सौदी अरब अमिराती अशा अनेक ठिकाणी भारतीय गव्हाला मागणी आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.