अखेर कृषी विभाग करणार रोपवाटिकांची तपासणी

विदर्भात सर्वाधिक १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. एकूण राज्याचा विचार करता संत्रा लागवडीखालील सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात एक लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे.
Orange Seedling
Orange SeedlingAgrowon

अमरावती : संत्रा रोपवाटिकांवर आपल्या स्टाइलने कारवाईचा इशारा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या कृषी विभागाने कृषी विभाग व कृषी विद्यापीठ तज्ज्ञांचा समावेश असलेल्या पथकांची स्थापना करून रोपवाटिका तपासणीचा निर्णय घेतला आहे. विदर्भात सर्वाधिक १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे.

एकूण राज्याचा विचार करता संत्रा लागवडीखालील सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात एक लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. परिणामी, वरुड आणि मोर्शी हे दोन तालुके विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जातात. याच वरुड तालुक्यात असलेल्या शेंदुर्जना घाट परिसरात तीनशेपेक्षा अधिक रोपवाटिका आहेत.

या रोपवाटिकांमधून देशभरात नागपुरी संत्रा रोपांचा पुरवठा होतो. दरवर्षी सुमारे दीड ते दोन कोटी रोपे विकल्या जातात. मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्रीय तत्त्वानुसार रोपांचे दर निश्‍चित होतात. गेल्या हंगामात मोसंबी रोपांना अधिक मागणी होती. त्यामुळे या भागातील रोपवाटिकाधारकांनी चांगलेच पैसे कमावले असे सांगितले जाते. मात्र या परिसरातील रोपवाटिकाधारकांकडून नर्सरी संदर्भाने असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष होते.

त्याचा फटका संत्रा बागायतदारांना दरवर्षी बसतो. निकृष्ट दर्जाच्या खुंटावर कलमे बांधली जात असल्याने अशी कलमे पुढे कीड रोगांना बळी पडतात. त्यामुळे बाग अल्पावधीतच काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. कृषी विभागाकडून दरवर्षी मे महिन्यात रोपवाटिकाची तपासणी केली जाते. या तपासणीच्या माध्यमातून आजवर एकाही रोपवाटिकाधारकांवर कारवाई झाली नाही. त्यावरून ही तपासणी कशाप्रकारे होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

उलट वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्यानंतर कृषी विभागाकडून नियमित मागणी होत असलेल्या पैशाच्या तुलनेत अधिक पैसे मागितले जातात. एवढाच काय तो फरक पडतो असे रोपवाटिकाधारक खासगीत सांगतात. या साऱ्या प्रकाराचा फटका मात्र संत्रा बागायतदारांना सोसावा लागत असल्याने त्याची दखल मंत्री कडू यांनी घेतली आहे.

कृषी विभागाने तडकाफडकी कृषी विभागाचे अधिकारी व कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ यांच्या माध्यमातून पथकाची स्थापना केली. विदर्भातील अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत असलेल्या रोपवाटिकांची पाहणी हे पथक करणार आहे. या समितीची पहिली बैठक शुक्रवारी (ता. ६) ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या बैठकीत रोपवाटिकांची तपासणी करण्यासंदर्भाने विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे.

रोपवाटिकाधारकांनी शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन करीत त्यांना उत्तम प्रतीच्या कलमा दिल्या पाहिजे. सध्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे नोंदणीकृत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत १७५ रोपवाटिका आहेत. त्यातील ८० टक्के रोपवाटिका या एकट्या वरुड तालुक्यात आहेत. मे महिन्यात या रोपवाटिकांची नियमित तपासणी केली जाते. प्राथमिक टप्प्यातील मातृवृक्ष तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्या आधारे देखील काही प्रमाणात रोपवाटिकांच्या दर्जाबाबत अंदाज घेता येणार आहे.

किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचा सदस्य असताना २००९-१० मध्ये मी संत्रा बागांच्या ऱ्हासाची कारणे लक्षात घेऊन रोपवाटिकांची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले होते. शेतकरी म्हणून मी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर डीएनए चाचणी करण्यात आली, त्या आधारे काही रोपवाटिकांवर तात्पुरती कारवाई देखील झाली. परंतु अशा प्रकारची तपासणी एकदा झाली. त्या वेळी मोठा वाद निर्माण झाला होता. पोलिस तक्रारी झाल्या. पुढे कोणीही अशा प्रकारची कारवाई करण्याचे धाडस दाखविले नाही. परिणामी, रोपवाटिकांमधील गैरप्रकार तसेच सुरू आहेत. रोपवाटिकाधारकांची लॉबी मोठी आहे. ही लॉबी राजकीय दबावातून काहीही साध्य करू शकते. त्याचा फटका आम्हाला निवडणुकीत बसला.

हर्षवर्धन देशमुख, माजी कृषिमंत्री

गलगल नावाचे खुंट हिमाचलमधून आणून त्याचा वापर केला जातो. अशा खुंटावरील झाड पूर्ण ताकदीने फळे देत नाही. पाने वाळतात, त्यामुळे झाड कीड-रोगांना लवकर बळी पडते. कृषी विभागाने त्या पार्श्‍वभूमीवर तपासणीसाठी घेतलेला पुढाकार निश्‍चितच दिलासादायक आहे.

- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com