कमोडिटी इंडेक्स ऑप्शन्सचा बिगुल

महाराष्ट्राशी निगडित सोयाबीन, हरभरा यासारख्या महत्त्वाच्या पिकांच्या वायद्यांवर बंदी आली आहे. निवडणुकांचा हंगाम संपल्यामुळे ही वायदे बंदी लवकरच उठण्याच्या चर्चा जोरात आहेत.
commodity-index
commodity-index
Published on
Updated on

या स्तंभामधून सातत्याने वायदे बाजार आणि इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग, त्याचा जोखीम व्यवस्थापनासाठी वापर आणि एकूणच या प्रणालीचा शेतकऱ्यांनाच नव्हे तर प्रक्रियाधारक, साठवणूक व्यापारी अथवा स्टॉकिस्ट, निर्यातदार यांना फायदा कसा करून घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले जाते. मागील दीड-दोन वर्षात वायदे बाजार किंवा फ्युचर्स ट्रेडिंग आणि पुट ऑप्शन्सद्वारे हेजिंगबद्दल आणि बाजार कलविषयी अनेक वेळा लिहिले आहे. परंतु वायदे बाजारातील सात कमोडिटीजवर बंदी आल्यानंतर एकंदरीतच या क्षेत्रात मरगळ आली आहे. महाराष्ट्राशी निगडित सोयाबीन, हरभरा यासारख्या महत्त्वाच्या पिकांच्या वायद्यांवर बंदी आली आहे. निवडणुकांचा हंगाम संपल्यामुळे ही वायदे बंदी लवकरच उठण्याच्या चर्चा जोरात आहेत. परंतु डिसेंबरमध्ये ही बंदी नक्की उठेल आणि परत एकदा या बाजारात मोठी उलाढाल सुरु होईल, अशी अपेक्षा आहे. त्यातच युक्रेन-रशियाच्या(Ukraine-Russia) लांबत चाललेल्या युद्धामुळे कमोडिटी बाजारातील गणिते वेगाने बदलत आहेत. शेतीमाल बाजारपेठेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नवा अध्याय लिहिण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे शेतीमाल वायद्यांमध्ये देखील पुढील काळात मोठे बदल होण्याची अपेक्षा बाळगायला हरकत नाही. फ्युचर्स, ऑप्शन्स आणि इंडेक्स (निर्देशांक) ही तिन्ही प्रकारची साधने कमोडिटी बाजारात (commodity market)यापूर्वीच आणली गेली आहेत. त्यातील शेतीमालातील ऑप्शन्स आणि निर्देशांक यामध्ये अजूनही फारशी उलाढाल झालेली नाही. माहितीचा अभाव आणि तांत्रिक बाबींविषयी अज्ञान यामुळेही सहभागीदार या दोन साधनांपासून अजूनही दूरच आहेत. या पार्श्वभूमीवर बाजार नियंत्रक सेबीने (SEBI)नुकतेच निर्देशांकावर ऑप्शन्स ट्रेडिंगला मान्यता दिली आहे. मरगळलेल्या कमोडिटी वायदे बाजारामध्ये त्यामुळे थोडीशी उत्साहाची भावना जागृत झाली आहे हे नक्की.  सेबीच्या या निर्णयामुळे येत्या काळात कमोडिटी इंडेक्स वर आधारित ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग सुरु होईलच. इंडेक्स ऑप्शन म्हणजे नक्की काय? त्याचा फायदा कुणाला आणि कसा करून घेता येईल? याबाबतची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू. इंडेक्स फ्युचर्स म्हणजे काय? इंडेक्स फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टवर ऑप्शन सुरु होणार असल्यामुळे इंडेक्स फ्युचर्सबाबत थोडी उजळणी करू. शेअर बाजारामध्ये निफ्टी, बँक निफ्टी सारखे निर्देशांक असतात. त्यामध्ये फ्युचर्स व ऑप्शन्सचे व्यवहार होतात तेव्हा आपण त्या इंडेक्समध्ये येणारे सर्व शेअर त्यांच्या वेटेजप्रमाणे खरेदी किंवा विक्री करत असतो. उदाहरणार्थ, एक निफ्टी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट खरेदी केले म्हणजे निफ्टीमधील ५० शेअर्स ठरावीक प्रमाणात खरेदी केल्यासारखे असते. अगदी त्याच प्रमाणे कमोडिटीजमध्ये सोयडेक्स, गुआरेक्स किंवा ॲग्रीडेक्स सारख्या निर्देशांकामध्ये खरेदी केल्यास त्या त्या निर्देशांकामधील कमोडिटीज विशिष्ट प्रमाणात खरेदी केल्यासारखे असते. परंतु निर्देशांक फ्युचर्स आणि ऑप्शन्स हा नेहमीच रोखीने सेटल केला जातो. त्यामध्ये डिलिव्हरी नसते. म्हणून केवळ वित्तीय नफा कमावण्याच्या हेतूने बाजारात येणाऱ्या प्रत्येकाला निर्देशांक ट्रेडिंग आकर्षक वाटते. अगदी त्याच धर्तीवर कमोडिटी इंडेक्समध्ये देखील डिलिव्हरीची कटकट नसते. त्यामुळे संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदाराला कमोडिटी बाजारात आकर्षित करण्यासाठी निर्देशांक वायदे उपयोगी पडतात.  

हे हि पहा :  ऑप्शन्स काँट्रॅक्टस याच निर्देशांकावर आधारित ऑप्शन्स काँट्रॅक्टस तर त्याहून आकर्षक असतात. याची तीन कारणे आहेत. एक म्हणजे निर्देशांक ऑप्शन्स मध्ये सुरवातीला फ्युचर्समध्ये द्यावे लागणारे मार्जिन नसते. त्याऐवजी त्याच्या साधारण एक तृतीयांश प्रिमियम, तो देखील एकदाच भरावा लागतो. म्हणजेच सुरवातीचे भांडवल खूपच कमी लागते. दुसरा फायदा म्हणजे फ्युचर्स व्यवहारांमध्ये बाजारभावाचा कल आपल्या अपेक्षेच्या उलट गेला तर द्यावे लागणारे मार्क-टू-मार्केट हे अधिकचे मार्जिन ऑप्शन्स व्यवहारांमध्ये द्यावे लागत नाही. तिसरा फायदा म्हणजे डिलिव्हरीचा प्रश्नच नसल्यामुळे ऑप्शन्स व्यवहारामध्ये कॉन्ट्रॅक्ट समाप्तीपूर्वी चार दिवस द्यावे लागणारे डिलिव्हरी मार्जिन आणि एक्सपायरी-पूर्व मार्जिन देखील द्यावे लागत नाही. ऑप्शन्स व्यवहारांमध्ये अधिकच्या भांडवलाची बचत होते.   निर्देशांकावरील ऑप्शन्समुळे शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना होणारे फायदे म्हणजे सुरवातीचे मार्जिन आणि मार्क-टू-मार्केट, तसेच डिलिव्हरी मार्जिन यातून सुटका मिळाल्यामुळे कमीत कमी भांडवलामध्ये जोखीम व्यवस्थापनाची संधी देखील मिळते. तसेच सोयाबीन किंवा हरभरा यासारख्या प्रत्यक्ष कमोडिटीवरील पुट-ऑप्शन समाप्तीपूर्वी द्यावे लागणारे मार्जिन देखील त्यांचा समावेश असलेल्या निर्देशांकासाठी द्यावे लागत नाही.  तसेच मागील काळात फ्युचर्सद्वारे हेजिंग करताना अनेकदा शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट समाप्तीला डिलिव्हरीसाठी एकाच दर्जाच्या मालाची जमवाजमव करताना, त्याची वाहतूक, पॅकिंग व टेस्टिंग आणि डिलिव्हरी-पूर्व मार्जिन यावर करावा लागणार खर्च वाचतो. त्यामुळे बाकीच्या समस्यांपासूनही सुटका होते. केवळ उत्पादकालाच नव्हे तर प्रक्रियाधारकांना देखील फ्युचर्सद्वारे आपला माल आगाऊ खरेदी करताना सुरवातीचे मार्जिन, मार्क-टू-मार्केट, डिलिव्हरी घेतल्यास आपल्या गोडाऊन मध्ये माल आणण्यासाठी आणि स्टोरेज यासाठी होणारा खर्च यातून सुटका करण्याचा स्वस्तात स्वस्त मार्ग म्हणजे हेच  पुट-ऑप्शन्स विकणे. फ्युचर्सच्या तुलनेत कमी असलेले सुरवातीचे मार्जिन, तसेच एक्सपायरी-पूर्व आणि डिलिव्हरी मार्जिन भरण्याची आवश्यकता नसल्यामुळे या प्रक्रियाधारकांना देखील कमी खर्चात जोखीम व्यवस्थापन कार्याचे साधन उपलब्ध होत असते. थोडक्यात सांगायचे तर कमोडिटी शी संबंधित परंतु प्रत्यक्ष कमोडिटीची देवाण-घेवाण नसलेले एक प्रकारचे वित्तीय साधन म्हणून निर्देशांक ऑप्शन कडे पाहिल्यास त्यातील फायदे लक्षात येतील. समजायला थोडे किचकट वाटले तरी थोडी मेहनत घेतल्यास मोठा फायदा यातून करून घेण्याची संधी मिळेल. आज शेअर बाजारात दरदिवशी होणाऱ्या दहा लाख कोटी रुपयांच्या सरासरी उलाढालीमधील प्रमुख वाटा हा निफ्टी आणि बँक निफ्टी निर्देशांकाचा असून त्यातही मोलाचा वाटा हा या निर्देशांकावरील ऑप्शन्सचा आहे. निर्देशांकात सामील असलेल्या शेअर मधील फ्युचर्स आणि ऑप्शनचा वाटा त्यामानाने खूपच कमी असतो आणि त्यात डिलिव्हरी ची कटकट आणि लागू शकणारे मोठे भांडवल यामुळे देखील गुंतवणूकदार निर्देशांक फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांना अधिक पसंती देतात. अगदी अशीच नसली तरी त्याच प्रकारची संधी कमोडिटी बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. सध्या बाजारात शेतीमाल क्षेत्रात गुआरेक्स हा एकच निर्देशांक एनसीडीईएक्स या एक्सचेंजवर उपलब्ध असला तरी वायदे बंदी उठल्यावर ॲग्रीडेक्स आणि सोयडेक्समध्ये व्यवहार चालू होतील. तर एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्या-चांदी वरील बुलडेक्स, खनिज तेलावरील एनर्जीडेक्स, धातुंवर आधारित मेटलडेक्स सारखे निर्देशांक उपलब्ध आहेत. भारतासारख्या अवाढव्य देशात वायदे बाजारात शेकडो डिलिव्हरी सेन्टर्स नसल्यामुळे डिलिव्हरी प्रक्रिया अधिकच खर्चिक होत असते. या पार्श्वभूमीवर निर्देशांक ऑप्शन्स सारख्या डिलिव्हरी-मुक्त साधनांचा प्रसार वेगाने होण्यास वाव आहे. अर्थात, निर्देशांकाशी निगडित कोणत्याही कॉन्ट्रॅक्टसाठी मागील काही काळाचा डेटा गोळा करून त्याच्या चाचण्या आणि चाचपण्या कराव्या लागतात. ही गोष्ट थोडी वेळखाऊ असल्यामुळे निर्देशांकावरील ऑप्शन्ससाठी थोडी जास्त प्रतीक्षा करावी लागेल. परंतु दिवाळी दरम्यान तरी वायदे बंदी उठून निर्देशांकावरील ऑप्शन हे साधन उपलब्ध होईल अशी आशा करूया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com