पाच हजार कोटींच्या प्रोटीन बाजारपेठत 'अमूल'चा दबदबा

देशातील सगळ्यात मोठा सहकारी दूध संघ असलेल्या अमूलने प्रोटीन लस्सी आणि प्रोटीन ताक ही उत्पादनं अलीकडेच बाजारात आणली आहेत.
Amul Protein Product
Amul Protein ProductAgrowon
Amul Protein Product
जनावरांच्या सडातून दूध गळती का होते? त्यावरील उपाय | Teat Leaking of Cow and Buffalo

देशातील सगळ्यात मोठा सहकारी दूध संघ असलेल्या अमूलने प्रोटीन लस्सी (Amul Protein Lassi) आणि प्रोटीन ताक (Protein Buttermilk) ही उत्पादनं अलीकडेच बाजारात आणली आहेत. दुधावर प्रक्रिया (Processing On Milk) करून मूल्यवर्धित उत्पादनं तयार केली जातात. त्या क्षेत्रात अमूलने मोठी आघाडी घेतली आहे. अमूलच्या यशाचा आलेख चढता आहे. अमूलच्या बातम्या माध्यमात आल्या की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की, अमूलला जे जमतं ते आपल्याकडच्या दूध संघांना का जमत नाही? त्यांच्यात आणि अमूलमध्ये नेमका फरक काय आहे?

Amul Protein Product
महाराष्ट्रातील दुधाची राणी कोण?

हा तसा मोठा आणि गुंतागुंतीचा विषय आहे. पण त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आपण आज पाहूया. महाराष्ट्रातले बहुतेक सगळे सहकारी दूध संघ पिशवीबंद लिक्विड दूध (Packing Milk) विकण्यावर भर देतात. बोटावर मोजण्याइतके चार-दोन संघ सोडले तर मूल्यवर्धित उत्पादनांच्या बाबतीत आपली कामगिरी फारच किरकोळ आहे. खरं तर पिशवीबंद लिक्विड दूध आणि भुकटी (Milk Powder) यांत सगळ्यात कमी मार्जिन मिळतं. पण आपल्याकडच्या बहुतांश सहकारी आणि खासगी दूध संघांचा त्यावरच भर आहे. परदेशात लिक्विड दूध केवळ १०-१५ टक्के विकलं जातं. तिथे प्रक्रियायुक्त पदार्थांचीच बाजारपेठ (Market Of Process Food) मोठी. भारतात मात्र पिशवीबंद दुधाचा बाजारपेठेतील वाटा ४५ टक्के आहे. कारण पायाभूत सुविधा नसल्यामुळे २० टक्क्यांहून कमी दुधावर प्रक्रिया होते.

इथंच नेमकं अमूलचं वेगळेपण उठून दिसतं. मूल्यवर्धनात अमूलची कामगिरी तोंडात बोटं घालायला लावणारी आहे. दोन वर्षांत ४० ते ६० नवीन मूल्यवर्धित उत्पादनं बाजारात आणण्याचा धडाका अमूलने लावला आहे. अमूलच्या एकूण उलाढालीमध्ये पिशवीबंद दुध विक्रीचा वाटा केवळ ५० टक्के आहे. उरलेला निम्मा वाटा प्रक्रियायुक्त मूल्यवर्धित उत्पादनांचा आहे.

भारतात लिक्विड दुधविक्री किफायतशीर ठरणार नाही, परंतु मूल्यवर्धित उत्पादनांना वाढती मागणी आहे; त्यामुळे ही उत्पादनं घेणाऱ्या कंपन्या मात्र चांगली कामगिरी करतील, असा रेटिंग एजन्सी `क्रिसिल`चा अहवाल आहे. मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांना डोळ्यासमोर ठेऊन देशातील डेअरी क्षेत्रात २०२३ पर्यंत १३० ते १४० अब्ज रूपयांची गुंतवणूक होईल असा `क्रिसिल`चा अंदाज आहे.

अमूलने ही संधी बरोबर ओळखली आहे. त्यामुळेच दरवर्षी नव-नवीन उत्पादनं बाजारात आणण्याचा सपाटा अमूलने लावला आहे. चीज, बटर, पनीर असो की पेढा, नानकटाई, उंटाच्या दुधापासून बनवलेलं चॉकलेट असो; अमूल सगळीकडेच आहे. अमूलने २०१६-२० या चार वर्षांत १०० उत्पादनं बाजारात आणलीत. कोरोना महामारीनंतर जगभरात आरोग्याबद्दल जागरुकता वाढली आहे. हाच धागा पकडत अमूल आता प्रथिनयुक्त पदार्थांच्या उत्पादनात उतरलं आहे. दुधापासून चीज बनवताना ही उपउत्पादनं (बायप्रोडक्ट) तयार केली जातात. 'अमूल प्रोटीन लस्सी' आणि 'अमूल प्रोटीन बटरमिल्क (ताक)' ही उत्पादनं त्याचाच एक भाग आहेत.

'' व्यापक संशोधनानंतर आम्ही प्रथिनयुक्त उत्पादनांची संपूर्ण श्रेणी विकसित करण्यात सक्षम झालो आहोत. अमूलची ही नवी उत्पादनं तरूण, वृ्द्ध, गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलं या सर्वांसाठी उपयुक्त आहेत,'' असे गुजरात को-ऑपरेटीव्ह मिल्क फेडरेशनचे (Gujarat Cooperative Federation )(अमूल) मुख्य कार्यपालन अधिकारी जयेन मेहता (Jayen Mehta) यांनी म्हटलं आहे.

अमूल हा देशातला सगळ्यात मोठा चीज उत्पादक आहे. अमूलकडे दररोज २५ लाख लिटर ‘लिक्वीड व्हे' तयार होते. व्यायाम, फिटनेसबद्दल जागरूक असणाऱ्या लोकांमध्ये व्हे प्रोटीन पावडरची क्रेझ आहे. प्रोटीन सप्लिमेंटचा तो लोकप्रिय प्रकार आहे. पण भारतात पुरेसं उत्पादन होत नसल्यामुळे त्याची आयात करावी लागते. ही पावडर खूप महाग असते. त्याऐवजी प्रोटीन लस्सी किंवा ताक पिलं तर प्रथिनांची गरज स्वस्तात भागते.

येत्या दोन-तीन महिन्यांत प्रोटीन शेक, वॉटर, योगर्ट, कुकीज, आईस्क्रीम आणि चॉकलेट अशी निरनिराळी उत्पादनं बाजारात आणण्याचा अमूलचा विचार आहे. ‘इंडिया ॲक्टिव्ह डेटा'च्या आकडेवारीनुसार भारतातील व्हे प्रोटीनची बाजारपेठ तब्बल पाच हजार कोटी रूपयांच्या घरात आहे. या बाजारपेठेत आपल्याला जास्तीत वाटा मिळावा यासाठी अमूलची धडपड सुरू आहे.

महाराष्ट्रातील दूध संघ यापासून काही धडा घेतील का?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com