पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे. मात्र, निर्यातीसाठीचे दर वाढल्याने आयातदार देशांतून मागणी मंदावली आहे. परिणामी देशातून हळद निर्यात ऑगस्ट महिन्यात ११ टक्क्यांनी घटली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये १३ हजार ८०० टन निर्यात झाली होती. तर यंदा १२ हजार २३० टन निर्यात झाल्याचे जाणकारांनी सांगितले.
जागतिक पातळीवर भारत हळद उत्पादनात अग्रेसर आहे. देशातून हळदीची निर्यात नियमित होतच असते. मात्र, देशांतर्गत बाजारात दर सुधारल्याचा परिणाम निर्यातीवर होत आहे. देशव्यापी लॉकडाउन, अनेक देशांमध्ये थांबलेली निर्यात आणि कंटनेरची कमतरता, भाडेवाढ या वाहतुकीतील अडथळ्यांमुळे निर्यात प्रभावित झाली होती. नंतरच्या काळात निर्यात सुरळीत झाली. मात्र, निर्यात कमी गतीने होत आहे.
देशातील हळद लागवड जवळजवळ संपत आली आहे. गेल्या काही दिवसांत हळदीला बऱ्यापैकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी लागवड काही प्रमाणात वाढविल्याचे जाणकारांनी सांगितले. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांत चांगली लागवड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, महाराष्ट्रात हळद उत्पादक भागांत झालेल्या पावसाने पिकाला फटका बसला आहे. इतर राज्यांत पीक सामान्य आणि चांगले आहे. बाजारांत नव्या हळदीची आवक पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होईल. तोपर्यंत असलेल्या साठ्यावर देशाला गरज भागवावी लागेल. त्यातच सणांचा कालावधी असल्याने दरही चांगले राहण्याची शक्यता आहे, असे जाणकारांनी सांगितले.
अशी झाली निर्यात देशातून ऑगस्ट महिन्यात झालेल्या एकूण निर्यातीपैकी संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) सर्वाधिक २ हजार ४७२ टन निर्यात झाली. त्यानंतर बांगलादेशात २ हजार १२ टन निर्यात झाली. अमेरिकेत ७४८ टन, जर्मनी ६०० टन, इराक ४४२ टन, सऊदी अरब ५१२ टन, मलेशिया ४७३ टन, इराण ४१६ टन आणि ट्युनिशिया देशात ३४७ टन हळदीची निर्यात झाली.
निर्यात मूल्य देशात हळदीचा वापर वाढल्याने दर बऱ्यापैकी टिकून आहेत. त्यामुळे निर्यातही महाग होत आहे. परिणामी आयात करणाऱ्या देशांतून मागणी प्रभावित होत असल्याचे जाणकारांनी सांगितले. निर्यातीसाठी युएईसाठी निर्यात ऑफर मूल्य ७५०० रुपये प्रतिक्विंटल होते. बांगलादेशसाठी ७३०० रुपये होते.
देशातील लागवड आणि परिस्थिती पाहता चांगले उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यातच सट्टेबाज आणि साठेबाज सक्रिय असल्याने दरही चांगले राहण्याची शक्यता आहे. - राहुल चौहान, शेतीमाल बाजार विश्लेषक, दिल्ली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.