कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २० टक्क्यांनी घटला 

मास्कचा सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा नवा उद्योग जगात उभा राहिला आहे. यातच अमेरिका, भारत, चीनमधील कापूस उत्पादनात मोठी घट आल्याने जागतिक पुरवठ्यात २० टक्क्यांनी घट आल्याने दरात तेजी आहे.
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २० टक्क्यांनी घटला
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २० टक्क्यांनी घटला
Published on
Updated on

जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे. कापड उद्योग कोविडची समस्या काहीशी कमी झाल्यानंतर उभारीत आहे. मास्कचा सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा नवा उद्योग जगात उभा राहिला आहे. यातच अमेरिका, भारत, चीनमधील कापूस उत्पादनात मोठी घट आल्याने जागतिक पुरवठ्यात २० टक्क्यांनी घट आल्याने दरात तेजी आहे. 

आंतरराष्ट्रीयस्तरावर भारतीय व अमेरिकन कापसाचे दर सारखेच आहेत. कापसाच्या वायदा बाजारात दर ११४ सेंटवर स्थिर आहेत. सरकीची मोठी मागणी खाद्यतेलासह पशुखाद्यासाठी आहे. यामुळे देशात सरकीचे दर ३५०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. सरकीचे उत्पादनदेखील कापसाप्रमाणे जगात घटणार आहे. जगात सुमारे २५ दशलक्ष टन कापसाचे उत्पादन होईल. यातील १०० टक्के कापसाचा वापर वस्त्रोद्योगातील देशांमध्ये होईल. यामुळे दर सुरवातीपासून वधारत आहेत. भारत, चीन, व्हिएतनाम, बांगलादेश, पाकिस्तान या प्रमुख देशांमधील वस्त्रोद्योगात सतत कापसाची मागणी आहे. 

दुसरीकडे भारत, अमेरिका या प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये कापसाचा पुरवठा गेल्या हंगामाच्या तुलनेत २० टक्क्यांनी घटल्याचे दिसत आहे. अमेरिकेत सुमारे २२५ लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन हाती येईल. तर भारतात मध्यंतरी ३६० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता, पण गुजरात, महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन अनुक्रमे ८०-७५ लाख गाठी एवढेच येईल, असे दिसत आहे. गुजरातेत लागवड गेले दोन वर्षे घटली असून, तेथे २२ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. गुजरात दरवर्षी ९० ते १०० लाख गाठींचे उत्पादन करायचा, पण यंदा तेथे ८० लाख गाठींचे उत्पादन येईल, असा अंदाज आहे. 

चीनमध्ये जेवढ्या कापसाची लागवड झाली आहे, तेवढ्या कापसाचा वापर होईल. त्यात चीन आणखी आयात करीत आहे, चीनला किमान ५५० लाख गाठींची आवश्यकता आहे. अमेरिकेतून व्हिएतनाम, इंडोनेशिया, चीनमध्येही कापूस निर्यात सुरू आहे. तर भारतात देशांतर्गत गिरण्यांमध्येच कापसाचा मोठा उठाव आहे. देशात सध्या रोज दीड लाख गाठींची आवक होत असून, यातील १०० टक्के गाठींची विक्री, उठावही होत आहे. शिलकी साठा जगात संपला आहे. या हंगामात फारसा साठा शिल्लक राहणार नाही, असेही दिसत आहे. गेल्या हंगामात १८ दशलक्ष टन कापसाचा साठा शिल्लक होता. यंदा साठा शिल्लक राहणार नाही, कारण वस्त्रोद्योग अधिकाधिक गतीने सुरू आहे. सर्वच नामांकित कंपन्यांचे काम सुरू आहे. व्हिएतनाममध्ये व्हीनटेक्स या आघाडीच्या वस्त्रोद्योग कंपनीमध्ये १०० टक्के क्षमतेने काम सुरू असून, तेथे भारतातून सुताची चांगली मागणी आहे. 

भारतातील नुकसानीने दर टिकून  अमेरिका, चीनमधील नव्या हंगामातील कापूस वेचणी पूर्ण झाली आहे. भारतातही उत्तर भारतात कापूस हंगाम संपला आहे. उत्तर भारतासह मध्य भारतात कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला आहे. यापूर्वी महाराष्ट्र, गुजरातेत अतिपावसाने कापूस पिकाची मोठी हानी झाली. यामुळे कापसाचे उत्पादन देशात ३३५ ते ३४० लाख गाठी एवढेच येवू शकते, असाही अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. 

बांगलादेशकडून मागणी  बांगलादेश भारतीय कापसाचा मोठा खरेदीदार राहिला आहे. कोविड काळातही बऱ्यापैकी मागणी येथून होती. यंदा बांगलादेशात वस्त्रोद्योग पाकिस्तानपेक्षा अधिक गतीने सुरू असून, तेथे किमान १२५ लाख गाठींची आवश्यकता भासणार आहे. या देशात कापूस लागवड अपवाद वगळता होत नाही. अर्थातच आयातीवरच बांगलादेशची भिस्त आहे. भारताकडून रस्ते, समुद्रमार्गे आयात बांगलादेशला सुकर असून, ती परवडणारीदेखील आहे. यामुळे यंदाही किमान २५ ते २७ लाख गाठींची निर्यात बांगलादेशात भारतातून होईल. सुमारे ६० हजार गाठींची निर्यात गेल्या महिन्यात तेथे झाली आहे, अशी माहिती मिळाली. 

प्रतिक्रिया... कापसाची मोठी मागणी देशातील बाजारात आहे. यामुळे परदेशात निर्यात कमी होत आहे. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापूस विक्री करायला हवी. कारण यातून बाजारातील पुरवठा सुरळीत राहील. देशात उत्पादन बऱ्यापैकी हाती आले आहे, पण बाजारातील पुरवठा कमी आहे. पुढे एकाच वेळी आवक वाढण्याचीही स्थिती तयार होवू शकते. जगभरात कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा कमी असल्याने दर तेजीत किंवा टिकून आहेत.  - महेश सारडा, अध्यक्ष, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com