प्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी नसावे आणि पंधरापेक्षा जास्त नसावे. संचालक मंडळाने विपणन समिती, संपादन समिती, लेखा समितीची निर्मिती करून प्रत्येक समितीला कामकाजाचे वाटप करणे अपेक्षित आहे.
शेतकरी कंपनीसाठी संचालक मंडळातील संचालक निवड अत्यंत महत्त्वाची असते. अन्यथा, वेळ व पैसा या गोष्टी वाया जाऊन विनाकारण मनस्ताप होऊ शकतो. बऱ्याच वेळेला असे निदर्शनास आले आहे, की सुरुवातीला एक शेतकरी कंपनी नोंदणी झाल्यानंतर त्यात एक किंवा दोन संचालक चांगल्या पद्धतीने कामकाज करतात. परंतु एक वेळ अशी येते की इतर संचालकांच्या नाकर्तेपणामुळे काम करणारे संचालक कंपनीतून बाहेर पडतात व दुसरी शेतकरी कंपनी स्थापन करून कामकाज सुरू करतात. पुन्हा पहिल्या कंपनीतून काही संचालक बाहेर पडून नवीन कंपनी नोंदणी करून कामकाज सुरू करतात. यामुळे हातात काही न येता पैशांचे व वेळेचे नुकसान होऊन कोणालाही काहीही प्राप्त होत नाही.
शेतकरी कंपनी दोन प्रकारे तयार करता येते. पहिला पर्याय म्हणजे कृषी विभागातील आत्मा यंत्रणेअंतर्गत स्थापित शेतकरी गटांचे एकत्रीकरण करून कंपनी नोंदणी करणे. राज्यात शेतकऱ्यांचे सुमारे १,२५,००० शेतकरी गट असून, महिला गटांची संख्यासुद्धा सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त असू शकेल. महिला गटांचे फेडरेशन अस्तित्वात असून, ते व्यवसाय उभारणीच्या दिशेने कार्यरत आहेत. परंतु पुरुष शेतकरी गटांचे अद्याप फेडरेशन हवे त्या प्रमाणात अस्तित्वात आले नाहीत. दुसरा पर्याय म्हणजे १० शेतकरी एकत्रित येऊन शेतकरी कंपनी नोंदणी करणे. यानंतर आवश्यक भागधारक शेतकरी कंपनीत समाविष्ट करणे. या दोन्ही प्रकारांत शेतकरी कंपनी यशस्वितेची विचार केला तर यामध्ये संचालक मंडळाची कामकाजाची पद्धत, चिकाटी, आर्थिक व्यवस्थापन, जोखीम स्वीकारण्याची पद्धती कारणीभूत असते. याचा विचार केला तर पहिला प्रकार यशस्वितेच्या दृष्टीने योग्य आहे, असे दिसून आले आहे. परंतु सद्यःस्थितीत विचार केला तर दुसऱ्या प्रकारावर जास्त भर दिला जात आहे. परंतु या प्रकारातील काही शेतकरी कंपन्या संचालक मंडळाच्या कामगिरीमुळे यशस्वी होत आहेत. प्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी नसावे आणि पंधरापेक्षा जास्त नसावे. संचालक मंडळ हे केवळ सर्वसाधारण मंडळासाठी (General Body) राखीव नसलेल्या भागात कार्य करू शकते. संचालक मंडळाने सुरुवातीच्या काळात अधिकारी/ कर्मचारी नेमणूक करण्यापेक्षा सर्व संचालकांच्या विषय समित्या निर्माण करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने विपणन समिती, संपादन समिती, लेखा समिती यांसारख्या समित्यांची निर्मिती करून प्रत्येक समितीला कामकाजाचे वाटप केल्याने कामकाजास गती मिळते. एफपीओच्या संदर्भात संचालक मंडळ हे कामगिरीचे निरीक्षण, देखरेख आणि संनियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. देय लाभांश निश्चित करणे. लाभांश शिफारस करणे व सर्वसाधारण सभेत मंजुरी घेणे. नवीन सदस्यांचे प्रवेश निश्चित करणे. संस्थात्मक धोरण, उद्दिष्टे यांचा पाठपुरावा करणे, अल्प व दीर्घ मुदतीचे उद्देश आणि वार्षिक उद्दिष्टे निश्चित करणे. कॉर्पोरेट धोरणे आणि आर्थिक योजना मंजूर करणे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकारी यांची नेमणूक करणे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्यावरील नियंत्रण ठेवणे व त्यांना पुढील नियोजनासाठी दिशा देणे. व्यवसाय आराखड्याशी संबंधित कोणतेही कर्ज किंवा अग्रिम मंजूर करणे. कंपनीच्या फंडांची त्याच्या व्यवसायाच्या सामान्य काळात गुंतवणूक. कंपनीच्या सामान्य व्यवसायात मालमत्ता संपादन किंवा विल्हेवाट या बाबत निर्णय घेणे. लेखा पुस्तकांची तपासणी करणे. कंपनीची खाती वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे लेखापरीक्षकाच्या अहवालासह ठेवली असल्याची खात्री करून घेणे. - प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (कृषी व्यवसाय व पणन तज्ज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे)