कृषी कर्ज अन् जामीनदार

कृषी कर्ज घेताना शेतकऱ्यांना विविध प्रश्न पडतात. जसे की, कृषी कर्जास जामीनदार आवश्यक असतो का? जामीनदार व्हावे का?
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

कृषी कर्ज घेताना शेतकऱ्यांना विविध प्रश्न पडतात. जसे की, कृषी कर्जास जामीनदार आवश्यक असतो का? जामीनदार व्हावे का? जामीनदाराची काय कर्तव्ये आहेत? जामीनदार होण्याचे फायदे, तोटे काय? जामीनदार कसा मिळवायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात पाहूयात.

रिझर्व बँकेने दिलेल्या निर्देशानुसार कृषीकर्जासाठीचे नियम ः

अ) कर्ज रक्कम १,६०,००० रुपये असेल तेव्हा ः

- ज्या कारणासाठी कर्ज घेतले फक्त तेच तारण. अन्य कोणतेही तारण नाही.

ब) कर्ज रक्कम १,६०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तेव्हा ः

- ज्या कारणासाठी कर्ज घेतले तेच तारण आणि सोबत जमिनीचे गहाणखत.

म्हणजेच कृषी कर्जासाठी जामिनदाराची आवश्यकता नाही. परंतु, ज्याठिकाणी काही कारणास्तव जमिनीचे गहाण खत होऊ शकत नाही, अशावेळी बँक अर्ज रक्कमेच्या योग्यतेचा जामीनदार (Third Party Guarantee) घेते.

जामिनदारासाठी बँकेस सादर करावयाची कागदपत्रे ः

१) केवायसी (KYC) कागदपत्रे आणि सीबील रिपोर्ट.

२) जामीनदाराच्या स्थावर किंवा जंगम मालमत्तेचे विवरण ( Asset and Liability Statement). म्हणजे जामीनदाराची आर्थिक क्षमता तपासणी पत्रक.

बॅंक यासर्व कागदपत्रांची छाननी करून जामीनदार हा कर्ज रक्कमेस योग्य आहे का, हे तपासून पाहते. त्यानंतरच बँक त्याचा जामीन ग्राह्य धरते.

जामीनदाराची कर्तव्ये ः

- कर्जास जामीन राहण्यापूर्वी कर्ज कोणत्या कारणासाठी, किती रक्कमेचे, परतफेड कशी करणार, तारण काय इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती घेऊन त्यानंतरच सदर कर्जास जामीन राहणे योग्य आहे हे ठरवावे.

- कर्ज आणि कर्ज प्रकल्प यांची पूर्ण माहिती जामीनदाराने सुरवातीसच घेणे आवश्यक आहे.

- कर्जदार हा बँकेने दिलेले परतफेडीचे वेळापत्रक पाळतो का ? याकडे लक्ष ठेवणे. याचाच अर्थ बँकेने ठरवून दिलेल्या परतफेड कालावधीत कर्जदार वेळेवर परतफेड करतो का यावर लक्ष ठेवणे गरजचे आहे.

- बँकेने ज्यासाठी कर्ज दिले आहे तो व्यवसाय किंवा मालमत्ता जी कर्जातून निर्माण झाली आहे, तिची स्थिती काय आहे याची नियमित पाहणी जामीनदाराने करणे आवश्यक आहे.

- जामीनदाराने वरचेवर बँकेत जाऊन कर्ज खात्याची चौकशी केली पाहिजे. कर्ज खाते नियमित आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.

- जामीनदाराने स्वत:चा सीबील रिपोर्ट खराब होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे ‘पाच’ मुद्दे ः

- जामीनदार हा कर्जदाराइतकाच कर्जास जबाबदार असतो.

- कर्जदार थकबाकीदार झाल्यास जामीनदाराचा सीबील रिपोर्ट ही खराब होतो. याची जाणीव जामीनदारास असणे गरजेचे आहे.

- जामीनदारास ज्या वेळी कर्जाची आवश्यकता असते, त्या वेळी बँकेस जामीनदार व्यक्ती जामीन असलेल्या कर्जाची माहिती बँकेस देणे आवश्यक आहे.

- कर्ज रक्कम १,६०,००० रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जास कोणतेही तारण म्हणजे जमिनीचे गहाणखत किंवा जामीनदार लागत नाही.

- कर्ज रक्कम १,६०,००० रुपयांपेक्षा जास्त कृषी कर्जास जमिनीचे गहाणखत किंवा जामीनदार आवश्यक आहे.

प्रसंग १ ः

संपतराव यांनी बँकेत ट्रॅक्टर कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेने त्यांचा सीबील रिपोर्ट काढला. त्या वेळी त्यांचा सीबील स्कोअर फारच कमी आला. त्यामुळे बँकेने संपतरावांना कर्ज मिळणार नाही असे सांगण्यात आले. हे ऐकून संपतरावांना धक्का बसला. संपतरावांनी बँकेतील अधिकाऱ्यांना कर्ज का मिळणार नाही, अशी विचारणा केली. त्या वेळी संपतराव हे एका कर्जासाठी जामीनदार होते आणि ते कर्ज थकीत होते असे सांगण्यात आले.

बँक अधिकारी म्हणाले, ‘‘तुम्ही ज्या कर्जास जामीन आहात त्या कर्जाची तुम्ही कधी माहिती घेतली नाही. सदर कर्जाची थकबाकी भरून खाते नियमित करा. त्यानंतर बँक आपल्या कर्जाचा विचार करेल.’’

संपतरावांनी कर्जाची थकबाकी रक्कम पाहिली. त्यांनी त्वरित संबंधित कर्जदाराला संपर्क साधून थकबाकी भरण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. पुढे २ ते ३ दिवसांत संबंधित कर्जदाराने संपूर्ण थकबाकी भरून खाते नियमित केले. तेव्हा संपतरावांची अडचण दूर झाली. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले, की आपण ज्या कर्जास जामीन होतो, त्या कर्जाची परतफेड होते का नाही याची पाहणी करायला पाहिजे होती. बँक शाखाधिकारी यांनी परत सांगितले, की जामीनदाराने आपण ज्या कर्जास जामीन आहोत, त्याची नियमित माहिती करून घेणे आवश्यक आहे.

प्रसंग २ ः

सोपानराव आज रागातच बँकेत आले. बँकेतील शाखाधिकाऱ्यांना हातातील पत्र दाखवून म्हणाले, ‘‘मला ही नोटीस का पाठवली? मी काही या कर्जास जामीन नाही. माझा या कर्जासोबत काही संबंध नाही.’’ त्यावर शाखाधिकारी म्हणाले, ‘‘तुम्ही बसा, आपण चर्चा करूयात.’’ शाखाधिकाऱ्यांनी सदर कर्जाची सर्व कागदपत्रे मागवून घेतली आणि सोपानरावांना दाखविली.

सदर कर्जाच्या कागदपत्रांवर सोपानरावांनी जामीनदार या नात्याने केलेल्या सह्या, त्यांचा फोटो व इतर कागदपत्रे दाखविली. शाखाधिकारी म्हणाले, ‘‘या सह्या तर तुमच्याच आहेत ना?’’ सोपानराव शांत झाले. ते म्हणाले, ‘‘या सह्या तर माझ्याच आहेत. पण मला आठवत नाही की मी ओळख म्हणून या सह्या केल्या होत्या की जामीनदार म्हणून.’’

शाखाधिकारी म्हणाले, ‘‘हे पाहा, सह्या करताना किंवा आपली कागदपत्रे, फोटो देतेवेळी कोणत्या कारणासाठी त्यांचा वापर होणार आहे याची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. कर्ज रक्कम, कर्ज कारण, कर्ज तारण, कर्जाची परतफेड आदी बाबींची संपूर्ण माहिती जमीनदाराने कागदपत्रावर सह्या करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com