
जगाची लोकसंख्या २०५० साली १० अब्ज होण्याचा अंदाज आहे. या लोकसंख्येची अन्नाची विशेषतः प्रथिनांची गरज भागवण्यासाठी सोयाबीन पिकाचे महत्व वाढत जाणार आहे. खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठीसुद्धा सोयाबीनचा उपयोग आहेच. जगभरातील अभ्यास असे सांगतात की, ज्या देशांची क्रयशक्ती वाढली त्या देशात मांस खाण्याचे प्रमाण वाढत जाते. लोकांचे जीवनमान सुधारत जाते, तसे मांसयुक्त खाद्याची मागणी वाढत जाते. हे मांस कोंबडीचे असो (चिकन) की डुकराचे (पोर्क- जे विशेषतः चीन, युरोपात मोठ्या प्रमाणात खल्ले जाते) त्यांच्यासाठी जे पशुखाद्य लागते, त्यातील मुख्य घटक असतो सोयापेंड. त्यामुळे मांसाहाराचे प्रमाण जितके वाढेल, तितकी सोयाबीनची मागणी वाढत राहील. थोडक्यात लांब पल्ल्याचा विचार करता सोयाबीनला चांगली मागणी राहणार आहे. सोयाबीन प्रथिनांनी समृद्ध आहे. त्यात जवळपास ४० टक्के प्रथिने असतात. परंतु सोयाबीनमध्ये(soyabean) ट्रिप्सिन इनहिबिटर सह इतर काही घटक असतात, ज्यामुळे ते थेट खाता येत नव्हते. परंतु आता सोयाबीनचे नवीन वाण विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे या समस्येवर तोडगा निघाला आहे. आपण जशा तुरीच्या हिरव्या शेंगा थेट खातो, त्याप्रमाणे सोयाबीनही थेट खाण्यासाठी वापरता येणे शक्य झाले आहे. या मध्यमातून सोयाबीनमधील पूर्ण प्रथिने पचवणे शक्य आहे का या बाबत अद्याप काही मत-मतांतरे आहेत; मात्र सोयाबीन हिरवे किंवा प्रक्रिया न करता खाता येण्याजोगे होण्यासाठी संशोधन सुरू होणे, ही चांगली बाब आहे. त्यामुळे सोयाबीनची मागणी वाढण्यास मदतच होणार आहे. शाकाहारी लोक प्रथिनांची गरज भागवण्यासाठी मुख्यतः पनीर(paneer) खातात; पण आता दुधाच्या पनीर ऐवजी सोया टोफूची मागणी वाढती आहे. कारण एक तर हे स्वस्त पडते आणि सोयाबीनच्या नवीन वाणांमुळे पनीर व टोफूमधील अंतर ओळखणे कठीण झाले आहे. तसेच लॅक्टोजची ॲलर्जी असणाऱ्यांसाठीही सोया टोफू उपयुक्त आहे. भारतीय सोयाबीन उत्पादकासाठी आणखी एक चांगली बाब म्हणजे अद्याप भारतात जीएम सोयाबीन लागवडीस परवानगी नाही. जगभरातील प्रमुख सोयाबीन उत्पादक देश जीएम सोयाबीनची लागवड(cultivation) करतात. नॉन जीएम सोयाबीन उत्पादक म्हणून भारताचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. जगभरातच आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून नॉन-जीएम, सेंद्रिय उत्पादनांना वाढती मागणी आहे. अमेरिकेत सेंद्रिय अंडी महागली आहेत. अमेरिकेत कोबड्यांना खायला घातल्या जाणाऱ्या सेंद्रिय सोयापेंडेसाठी तो देश दक्षिण आशियाई राष्ट्रावर ४० टक्क्यापेक्षा जास्त अवलंबून आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातही भारतीय सोयाबीनला चांगला वाव आहे. हे हि पहा : दुसरा मुद्दा आहे तो जैवइंधनाचा (बायोडिझेल). या इंधनाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून सोयाबीनचा त्यासाठी वापर वाढत आहे. अर्थात सोयातेल थेट इंधन म्हणून वापरले जात नाही. त्यासाठी आधी रासायनिक प्रक्रिया करावी लागते. अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे जैवइंधनासाठी सोयाबीन तेलाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळाले. सोयाबीनची मागणी वाढण्यासाठी हा घटक महत्त्वाचा ठरणार आहे. जागतिक बाजारात तेजी असल्यामुळे सध्या सोयाबीनचे दर चढे आहेत. ला-निनाचा परिणाम, प्रमुख देशांतील उत्पादनात घट, जहाजांच्या अडचणीमुळे निर्यातीची विस्कळीत झालेली साखळी यामुळे मागणी-पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. त्याचा भारतातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सोयाबीन शेतीतील अडचणी सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी नवीन वाण उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. बदलत्या हवामानास तोंड देणाऱ्या, अधिक उत्पादन देणाऱ्या, पावसाचा खंड तसेच अतिवृष्टीत तग धरू शकणाऱ्या, रोगास प्रतिकारक्षम वाणांची गरज आहे. एकरी किमान १८.५ ते २० क्विंटल उत्पादन देणारे सोयाबीन वाण आवश्यक आहे. चांगल्या वाणांचे बियाणे सहज, मुबलक व योग्य दरात उपलब्ध होणेही आवश्यक आहे. सध्या सोशल मिडीयावर केडीएस-७२६ या वाणाच्या बियाण्यांच्या नावाने काय काय बियाणे म्हणून विकले जाते आहे हे तपासून पाहिले तर यातले गौडबंगाल सहज लक्षात येईल. दुसरी अडचण आहे ती उत्पादन खर्च कमी करण्याची. सोयाबीन पिकास नत्रयुक्त खतांची गरज, प्रत्यक्ष दिले जाणारे खतांचे डोस, इतर निविष्ठांवरील खर्च शास्त्रीय पद्धतीने काढला तर उत्पादनापेक्षा अनेक वेळा खर्च अधिक होत असल्याचे आढळून येते. अज्ञानामुळे, आधुनिक आणि एकात्मिक तंत्राचा अवलंब न केल्यामुळे, आर्थिक नुकसान पातळी गाठण्यापूर्वी बचावात्मक उपाययोजना न करता नंतर अधिक खर्च करत असल्यामुळे सोयाबीन पिकाचे अर्थकारण कोलमडत आहे. तसेही एकरी सरासरी ५ क्विंटलच्या आसपास उत्पादकता मिळवून खर्च कसा भरून काढणार आणि नफा कसा शिल्लक राहणार? त्यामुळेच कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हे किफायतशीर पीक व्हायचे असेल तर अधिक उत्पादन देणारे वाण आणि योग्य पीक व्यवस्थापन हे दोन मुद्दे कळीचे ठरणार आहेत. डोळस प्रयत्न हवेत सध्या गावोगावी नोंदणी होत असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ध्येय मुख्यतः थेट माल खरेदी केंद्र चालवणे असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन किंवा इतर धान्य शेतकऱ्यांपासून प्रचलित दराने खरेदी करून ते थेट प्रक्रिया उद्योजकांना पुरवठा करण्यात विशेष नफा शिल्लक रहात नाही. कारण एक क्विंटल सोयाबीन खरेदी केंद्रावर घेतल्यापासून ते प्रक्रिया उद्योजकास पोहोचवण्यापर्यंत सरासरी १७० रु ते २१५ रु प्रति क्विंटल खर्च होतो. शिवाय जीएसटी, बाजार समितीचे कर वेगळे. तेव्हा अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पूर्ण मूल्यसाखळी कशी उभी करता येईल, २००-४०० टन सोयाबीन खरेदी-विक्री एकट्याने करण्यापेक्षा कंपन्यांनी एकत्रितपणे आकारमान कसे वाढवता येईल, यावर भर दिला पाहिजे. तसेच फक्त खरेदी-विक्रीचा व्यवसाय न करता लागवड ते विक्री मूल्यसाखळी विकसित करणे आणि त्याचा लाभ प्रत्येक भागधारकास अधिकाधिक कसा मिळेल याची व्यवस्था उभारणे यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. अज्ञानापोटी आणि बाजारातील वाढते दर पाहून सोयाबीन पाठोपाठ सोयाबीन असे एकच एक पीक सलग एकाच क्षेत्रावर घेत गेल्यास अनेक समस्या निर्माण होतात. जमिनीचा कस कमी होतो. रोगांचे प्रमाण वाढते. मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी अभ्यास करून, पिकाचे शास्त्र समजून घेऊन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून सोयाबीन पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी कंबर कसली पाहिजे. भविष्यात आंतरराष्ट्रीय आणि देशाच्या बाजारपेठेत सोयाबीनमध्ये निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घेण्यासाठी डोळस प्रयत्नच निर्णायक ठरतील. (लेखक सह्याद्री बालाघाट शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आहेत.) ९०२१४४०२८२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.