राज्यात चारशे टन आंबा निर्यातीतून दोनशे कोटींची उलाढाल

महाराष्ट्रामध्ये समुद्र आणि हवाई मार्गे निर्यातीसाठीच्या सुविधा उपलब्ध आहेत. विविध देशांसाठी आंबा निर्यात करण्यापूर्वी काढणीपश्‍चात आवश्यक प्रक्रिया व सुविधा केंद्रांची उपलब्धता राज्यात आहे. त्यामुळे इंग्लंड, युरोपातील देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया अशा आर्थिकदृष्ट्या संपन्न देशात निर्यातीचा आलेख उंचावत आहे.
Mango Export
Mango ExportAgrowon
Published on
Updated on

गणेश कोरे

विविध पिकातील शेतकरी निर्यातक्षम शेतीकडे वळत आहेत. या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाद्वारे विविध योजना, उपक्रम राबवले जात आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहे. विविध शेतीमालांच्या निर्यातीबरोबरच कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केसर आंबा आपल्या अनोख्या चवीमुळे जागतिक बाजारपेठेत प्रसिद्ध होत आहे. भारतातून दरवर्षी सुमारे ५० हजार टनांपर्यंत आंब्याची निर्यात होते. यात हापूस, केसर, बैंगनपल्ली, दशहरी, चौसा इ. प्रमुख वाणांचा समावेश आहे.

महाराष्ट्रामध्ये समुद्र आणि हवाई मार्गे निर्यातीसाठीच्या सुविधा उपलब्ध आहेत. विविध देशांसाठी आंबा निर्यात करण्यापूर्वी काढणीपश्‍चात आवश्यक प्रक्रिया व सुविधा केंद्रांची उपलब्धता राज्यात आहे. त्यामुळे इंग्लंड, युरोपातील देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया अशा आर्थिकदृष्ट्या संपन्न देशात निर्यातीचा आलेख उंचावत आहे.

शेतमाल निर्यातीसाठी राज्यात कृषी पणन मंडळाने कृषी हवामान विभागनिहाय विविध ठिकाणी ४४ निर्यात सुविधा केंद्रे उभारली आहेत. त्यातील ९ सुविधा केंद्राचा वापर आंबा निर्यातीसाठी होतो. विविध देशांच्या निर्यातीच्या निकषानुसार विविध प्रक्रियांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणा उभारल्या आहेत.

निर्यातीसाठीचे नियोजन आणि प्रयत्न

आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादक, खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या बैठका, मेळाव्याचे आयोजन केले जाते. २०२२ या वर्षी निर्यात हंगामात पणन मंडळ, कृषी विभाग व अपेडा यांच्या संयुक्त सहकार्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यात आंब्याची काढणी, हाताळणी, प्रतवारी, निर्यात प्रक्रिया, सुविधा वापर, साका विकृती समस्या दूर करण्यासाठी अर्क साका निवारकाचा वापर, निर्यातीसाठी आवश्यक परवाने यांची माहिती दिली.

जपान, दक्षिण कोरियासह न्यूझीलंड बाजारपेठ खुणावतेय
या वर्षी दक्षिण कोरिया आणि जपानच्या निर्यातीला नुकतीच परवानगी मिळाली असून, न्यूझीलंडही बाजारपेठही लवकरच खुली होण्याची शक्यता असल्याची माहिती कोकण विभागाचे उपसरव्यवस्थापक भास्कर पाटील यांनी सांगितले. या हंगामात जपान आणि दक्षिण कोरियासाठी प्रत्येकी ५० टन असे १०० टन आणि युरोपियन व अन्य देशांसाठी २०० टन आंबा प्रक्रिया आणि निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विकिरण सुविधा केंद्रावरून या वर्षी अमेरिका ६०० टन, ऑस्ट्रेलिया २०० टन आंबा प्रकियेचे उद्दिष्ट ठेवले असल्याचेही डॉ. पाटील सांगतात.

  • देशनिहाय प्रक्रिया निकष
    अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, निर्यातीसाठी विकिरण प्रक्रिया करण्यापूर्वी ५२ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यामध्ये आंबे ३ मिनिटे ठेवून उष्णजल प्रक्रिया केली जाते.
    दक्षिण कोरियाला निर्यातीसाठीही वरील प्रकारे उष्णजल प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा बाष्पांच्या साह्याने (व्हेपर हीट) उष्णता दिली जाते. या सुविधेची क्षमता दीड टन प्रति तास इतकी आहे.
    युरोप, दक्षिण कोरिया, रशिया, मॉरीशियस, चीन या देशांना आंबा निर्यात करण्यापूर्वी आंबे ४८ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात ६० मिनिटे ठेवून प्रक्रिया केली जाते.

अमेरिकेसाठी होणाऱ्या आंब्याची विविध टप्प्यांवर तपासणी केली जाते. या बाबत सांगताना अमेरिकेच्या निर्यात इन्स्पेक्टर आणि वनस्पती रोगशास्त्र तज्ज्ञ कॅथरिन फिडलर म्हणाल्या, ‘‘शेतकरी आणि निर्यातदारांनी निर्यातीसाठी पाठविलेल्या प्रत्येक १०० बॉक्सच्या मधील ३ बॉक्स तपासणीसाठी घेतले जातात. त्यातील प्रत्येक आंबा व त्याची कोयही कापली जाते. त्यात फळमाशी, कोयकीड यांच्या अस्तित्वाची तपासणी केली जाते. आंब्यामध्ये काही डाग आढळल्यास, त्याचीही सूक्ष्मदर्शकाखाली काटेकोर तपासणी केली जाते. या वर्षीच्या निर्यातीमधील एकाही लॉटमध्ये आतापर्यंत फळमाशी आणि कोयकीड आढळलेली नाही.

निर्यात होईल अधिक वेगवान...
गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे अमेरिकन तपासनीस (इन्स्पेक्टर) भारतात येऊ शकले नाही. परिणामी, आंबा निर्यात झाली नव्हती. या वर्षी महिला इन्स्पेक्टर कॅथरिन फिडलर भारतात आल्या असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्यात सुरू आहे. ही निर्यात प्रक्रिया ७ एप्रिलपासून सुरू झाली असून, १८ जूनपर्यंत चालेल. या दरम्यान या इन्स्पेक्टर पुढील वर्षीच्या निर्यातीसाठी मॅंगोनेटअंतर्गत नोंदणीकृत हापूस व केसर आंबा बागांची तपासणी करतील. तसेच पॅकहाउस व विकिरण सुविधा केंद्राचे लेखापरीक्षणही (ऑडिट) करतील. यात किमान २०० नोंदणीकृत शेतकरी निवडून त्यांच्या बागांच्या मागील ३ वर्षांच्या रेकॉर्डचीही तपासणी केली जाईल.

या तपासणीनंतर आणि एकूण निर्यातविषयक सुविधांबाबत शाश्‍वती निर्माण झाल्यामुळे पुढील वर्षीपासून अमेरिकन इन्स्पेक्टरशिवाय निर्यात होणार आहे. यामुळे दरवर्षी इन्स्पेक्टर येणे, राहणे आणि तपासण्यांवरील खर्च आणि विलंब टाळणे शक्य होईल. यासाठी पणन मंडळ आणि फलोत्पादन विभागाद्वारे हापूस आंबा उत्पादक किमान १५०, तर केसर आंबा उत्पादक किमान ५० मॅंगोनेट नोंदणीकृत शेतकरी निवडून निर्यातीच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित केली जाईल. यासाठी पणन मंडळ कृषी माल निर्यातीची नोडल एजन्सी म्हणून अपेडा, राष्ट्रीय पीक संरक्षक संघटना (एन.पी.पी.ओ.) व फलोत्पादन विभाग यांच्यासोबत समन्वयाने काम करत असल्याचे पणन मंडळाचे निर्यात विभाग प्रमुख सतिष वराडे यांनी सांगितले.

...अशी केली जाते विकिरण प्रक्रिया
आलेला आंबा प्रथम ५२ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यामध्ये ३ मिनिटे ठेवला जातो. यानंतर त्याचे पॅकिंग केल्यानंतर विकिरण भट्टीमध्ये ५४ मिनिटे ठेवले जातात. या भट्टीतून आंबा पेट्या प्रवास करताना त्यावर ४०० ते १ हजार ग्रेड क्षमतेच्या गॅमा किरणांचा मारा केला जातो. ही मात्रा सरासरी ७५० ग्रेड एवढी असते. प्रक्रियेनंतर आंब्याचे बॉक्स पॅकिंग करून कंटेनरद्वारे निर्यातीसाठी सज्ज होतात.

या हंगामातील आतापर्यंत झालेली निर्यात
देश -- टन
जपान --- १२
अमेरिका --- १२५
ऑस्ट्रेलिया --- २०
इंग्लंड --- १५०
युरोप --- १००

‘‘निर्यातीद्वारे शेतकऱ्यांना उत्तम नफा आणि देशाला परकीय चलन मिळते. राज्य कृषी पणन मंडळाद्वारे कृषी हवामान विभागासह उत्पादननिहाय विविध पिकांसाठी सुमारे ४४ निर्यात सुविधा केंद्रे उभारली आहेत. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने मोठी गुंतवणूक केली आहे. विविध देशांच्या निर्यातीसाठी आवश्यक निकष व मागणीनुसार काढणीपश्‍चात निर्यात सुविधा आणि विकिरणासारखे आधुनिक तंत्रज्ञान उभारले आहे. या सुविधेमुळे अमेरिका, जपान देशांमध्ये हापूस, केसरसह विविध आंब्याची निर्यात सुरू आहे. जागतिक पातळीवर आपला आंबा पोहोचत असून, मागणी वाढत आहे. दरवर्षी विविध प्रगतिशील देशांमध्ये आंबा निर्यात खुली करण्यासाठी पणन मंडळ प्रयत्नशील आहे.’’

सुनील पवार पणन संचालक, महाराष्ट्र राज्य आणि कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ

संपर्क
डॉ. भास्कर पाटील, ९४२३००४७९६
(उपसरव्यवस्थापक, कोकण विभाग, राज्य कृषी पणन मंडळ)
सतीश वराडे, ८५५१९५४१९८
(निर्यात विभाग, राज्य कृषी पणन मंडळ)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com