
कोल्हापूर : जागतिक बाजारात गेल्या सप्ताहापासून साखरेच्या दरात (Sugar Rate) मोठी वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.२३) न्यूयॉर्क वायदे बाजारात (एस बी एच २३) कच्च्या साखरेचे (Raw Sugar) दर २१.१८ पौंड प्रति सेंट इतक्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले. भारतीय रुपयांमध्ये हा दर ३९००० रुपये प्रति टन एक्स मिल इतका होतो.
निर्यातदार सूत्रांच्या माहितीनुसार, जागतिक बाजारातील मागणीचा विचार करता भारतीय निर्यातदार कंपन्या सध्या कच्ची साखर (रॉ शुगर) ३९००० रुपये प्रतिटन एक्स मिल व पांढरी साखर (व्हाइट शुगर) ४०००० रुपये प्रति टन एक्स मिल या दराने मागणी करत आहेत. हा तेजीचा माहोल जानेवारी २३ पर्यंत राहण्याचे संकेत आहेत.
जागतिक बाजारात नोव्हेंबर २२ ते एप्रिल २३ या कालावधीसाठी अंदाजे ४० लाख टन कच्ची साखर (रॉ शुगर) व ४० लाख टन पांढरी साखर (व्हाइट शुगर) अशी एकत्रित ८० लाख टन भारतीय साखरेची गरज आहे. केंद्राने हंगाम २२-२३ करिता कारखानानिहाय कोटा पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे या हंगामात कच्ची साखर उत्पादन करण्यासाठी मर्यादा आल्या.
जागतिक बाजारातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अंदाजानुसार, हंगाम २२-२३ मध्ये भारतातून ६० लाख टन निर्यातकोट्यापैकी अंदाजे २० लाख टन कच्ची साखर निर्यात होईल. यामुळे जागतिक बाजारात एप्रिल २३ अखेर कच्ची साखरेची जादा मागणी राहील. भारत सरकार आणखीन २० लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी काही वृत्त संस्थांकडून साखर उत्पादन घटीच्या बातम्या आल्या. यामुळे सरकार पुढील निर्यातीला परवानगी देताना सारासार विचार करूनच येणाऱ्या कालावधीत निर्यातीला हिरवा कंदील दाखवेल, अशी शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे निर्यातदार सूत्रांनी सांगितले.
डिसेंबरअखेर १५ लाख टन निर्यातीची शक्यता
१५ डिसेंबरअखेर भारतीय साखर कारखानदारांनी ५० लाख टनापर्यंतचे निर्यात करार केले आहेत. नोव्हेंबरअखेर ६ लाख टनांपेक्षा जास्त साखर प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. डिसेंबरच्या १५ तारखेपर्यंत ९ लाख टन साखर निर्यातीच्या प्रक्रियेत होती. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याअखेर एकूण १५ लाख टन साखर प्रत्यक्षात निर्यात होऊ शकेल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचा आहे.
यंदा पहिल्यापासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर चढे राहतील, असा अंदाज होता. अपेक्षेप्रमाणे साखरेच्या दरात चांगली वाढ आंतरराष्ट्रीय बाजारात झाली. काही कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने साखर विकून चांगला फायदा मिळविला. आणखी एक महिना तरी तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.