Jalgaon News : देशात केळीची टंचाई तयार झाली आहे. निर्यातीच्या केळीचा तुटवडा असून सध्या फक्त ६० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची आवक निर्यातीसंबंधी होत आहे. त्यामुळे दरात मागील आठ ते १० दिवसांत ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. जळगावातून निर्यात बंद असून, आवक घटली आहे.
जळगाव जिल्ह्यात जुलैअखेरीस केळीची निर्यात बंद झाली. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही निर्यीतीच्या केळीची आवक कमी झाली असून, तेथेही सध्या फक्त दोन ते तीन कंटेनर निर्यात परदेशात होत आहे. बऱ्हाणपुरातून जुलै व ऑगस्टमध्ये प्रतिदिन सरासरी पाच कंटेनर केळीची निर्यात विविध खरेदीदार कंपन्यांनी परदेशात केली.
देशात सध्या गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात केळीची आवक घटली आहे. आंध्र प्रदेशातही केळी काढणीवर नाही. तेथे ऑक्टोबरमध्ये पिलबागांमधील (खोडवा) काढणी सुरू होईल. तर नोव्हेंबरमध्ये नियमित हंगामातील केळीची आवक सुरू होईल. तमिळनाडूमध्ये आवक होत आहे. परंतु तेथेही स्थानिक बाजारात उठाव असून, तेथूनही परदेशात निर्यात अल्प किंवा प्रतिदिन दोन कंटेनर एवढीच आहे.
देशातून सध्या आखातात केळीची निर्यात अधिक होत आहे. सर्वाधिक निर्यात सोलापुरातून होत असून, तेथून रोज ४० कंटेनर केळीची पाठवणूक होत आहे. स्थानिक बाजारात किंवा देशांतर्गत बाजारात केळीला २३०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. काश्मीर, पंजाब येथे पाठवणुकीच्या केळीचे दर २४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.
जळगाव जिल्ह्यात सध्या रोज ४० ते ४५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. ही आवक कमालीची घटली आहे. कमी दर्जाच्या केळीचे दरही १३०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीचे दर १६५० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तेथेही केळी दरात मोठी वाढ झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये केळीची लागवड कमी होती. देशात सणउत्सवाचे वातावरण आहे. यामुळे मागणी कायम आहे. पुढे आवक कमी होईल व मागणी अधिकची राहण्याची शक्यता आहे. कारण गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचा कालावधी आहे. यामुळे दरात आणखी वाढ होईल, असे संकेत आहेत. पुढे जळगाव जिल्ह्यात चोपडा, जामनेर, जळगावच्या भागात केळीची आवक वाढेल, परंतु मागणी कायम राहील, असेही दिसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.