Cashew Market News राजापूर, जि. रत्नागिरी ः प्रतिकूल हवामानासह अन्य विविध कारणांमुळे काजूचे उत्पन्न (Cashew Production) काहीसे घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे हापूसप्रमाणे (Hapus Mango) काजूच्या जमाखर्चाचा मेळ बसताना दिसत नाही.
अशा स्थितीमध्ये सुक्या काजू (Dry Cashew) बियांपेक्षा ओल्या काजूगराला (Cashew Nut) काहीसा चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वा बागायतदारांकडून सुक्या काजू बियांपेक्षा ओले काजूगर विक्री करण्यावर भर देण्यात येत असल्याचे दिसत आहे.
चविष्ट अन् पौष्टिक असलेल्या ओल्या काजूगराला सद्यःस्थितीमध्ये प्रति किलो १००० ते १६०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ओसाड असलेले माळरान रोजगार हमी योजना आणि फळबाग लागवडीच्या माध्यमातून ओलिताखाली येऊन काजूच्या बागा विकसित झाल्या आहेत.
मात्र, प्रतिकूल हवामानासह विविध कारणांमुळे उत्पन्नासह काजू बियांच्या विक्रीदरामध्ये कमालीचा चढ-उतार दिसत आहे.
त्यातून, जमाखर्चाचा मेळ बिघडत चालला आहे. त्याचवेळी सुक्या काजूबियांपेक्षा ओल्या काजूगरांना मागणी आणि जादा दर मिळताना दिसत आहे. शेतकरी आणि बागायतदारांकडून ओले काजूगर विक्री करण्याला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.
चविष्ट, रूचकर असलेल्या ओले काजूगरांना मुंबई-पुणे या मोठ्या शहरांसह दिल्ली, बेंगलोर आदी राज्यांमध्ये मागणी असल्याचे काही शेतकऱ्यांनी माहिती दिली. सुक्या काजू बियांच्या खरेदीचा दर किरकोळ असताना ओल्या काजूगरांना हजार ते १६०० पर्यंत दर मिळत आहे.
असे आहे अर्थकारण
सुक्या काजू बीच्या एका किलोमध्ये सरासरी ६०० ते ९०० बियांचा समावेश असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सुक्या काजूबियांना मिळालेल्या प्रति किलो सरासरी दराचा विचार करता एका सुक्या काजू बीची किंमत सरासरी ५७-९०-१२० पैसे ठरताना दिसते.
दुसऱ्या बाजूला ओल्या काजूंचा विचार करता साधारणतः २८० ते ३६० ओली काजू बी फोडल्यानंतर एक किलो ओले काजूगर मिळतात. ओल्या काजूगराला मागणीप्रमाणे मिळणाऱ्या दराचा विचार करता एका काजूगराला सरासरी २ ते ४ रुपये भाव मिळतो.
तुलनात्मकदृष्ट्या विचार करता सुक्या काजू बियांच्या दराच्या तुलनेमध्ये ओल्या काजूगराला मिळणारा दर जास्त दिसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.