हवामानाविषयी माहितीमध्ये सातत्याने ऐकू येणाऱ्या एल निनो म्हणजे नेमके काय, ते आपण जाणून घेऊ. पुढील टप्प्यामध्ये त्याच्या महाराष्ट्रातील प्रदेशनिहाय परिणामांविषयी माहिती घेऊ. इ. स. १५०० च्या सुमारास पेरू देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर लहान बोटींतून मासेमारी करणाऱ्या कोळ्यांना प्रशांत महासागराचे तापमान दर काही (सुमारे ४ ते ७) वर्षांनी वाढत असल्याचे सर्वप्रथम लक्षात आले. पाण्याचे तापमान वाढण्याची घटना सहसा नाताळाच्या सुमारास घडत असे. त्यामुळे त्या घटनेचे नामकरण ‘एल निनो’ (या स्पॅनिश शब्दाचा अर्थ बालयेशू किंवा छोटा मुलगा) असे केले. इ.स. १७०० ते १९०० च्या दरम्यान अनेक युरोपीय खलाशांनी या तापमानवाढीच्या नोंदी लिहून ठेवल्या. या नोंदींचा उपयोग पुढे एल निनो आणि त्याच्या परिणामांच्या संशोधनांसाठी झाला. १८९१ मध्ये पेरू देशातील डॉ. लुइस करॅंझा या भूगोलतज्ज्ञाने दक्षिण अमेरिकेच्या पाऊसपाणी आणि हवामानातील विचित्र बदल हे एल निनोमुळे होतात, असे सांगणारे संशोधन प्रसिद्ध केले. जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान वाढते आणि प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात. त्यासोबत बाष्पाने भरलेले ढग तिकडे वाहून जातात. परिणामी, पूर्वेकडील भागात अतिवृष्टी, तर पश्चिमेकडील भागात दुष्काळी स्थिती अशाप्रकारे एल निनोचा परिणाम दिसतो. जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते, तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात आणि त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते. त्यालाच ‘ला निना’ असे संबोधले जाते. काही काळापर्यंत समुद्राच्या पाण्याची होणारी तापमानवाढ पृथ्वीवरील हवामानबदलाला कारणीभूत ठरते. ही क्रिया अधूनमधून अचानकपणे घडते. या घटनेचा संबंध पृथ्वीवर होणारी दुष्काळी परिस्थिती, महापूर आणि त्याचा थेट पिकांच्या उत्पादनावर होणारा परिणाम याच्याशी जोडला जातो. उष्ण कटिबंधातील प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याच्या तापमानातील फरक, की ज्यामुळे एल निनो किंवा ला निना हे परिणाम प्रशांत महासागराच्या उष्ण कटिबंधातील पश्चिम भागावर स्पष्टपणे होत असल्याचे दिसून आले आहे. मोसमी पावसावरील परिणाम मॉन्सून हा भारतीयांसाठी फार जिव्हाळ्याचा आहे. कारण, आपल्या पाण्याच्या गरजा भागवणारा तो एकमेव स्रोत आहे. तरीही मॉन्सून भारतापुरता मर्यादित असला तरी त्याचे सहसंबध जगभर पसरलेले आहेत. हे सहसंबध ओळखण्यासाठी हवामानशास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत असतात. मॉन्सूनचा संबंध संपूर्ण युरोपियन खंडाच्या हवामानाशी, त्यावरील हिमपाताशी आहे. मॉन्सूनचा संबध हिंदी महासागरावर होणाऱ्या तापमानाच्या चढउताराशी आहे. आपल्यापासून खूप दूरवर असलेल्या प्रशांत महासागराच्या तापमानाशीसुध्दा मॉन्सूनचा संबध आहे. मोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यासाठी सोळा घटकांचे प्रारूप (मॉडेल) वापरले जाते. त्यामध्ये सहा घटक तापमानासंबंधी, तर पाच घटक हवेच्या दाबासंबंधी आहेत. तापमानाशी निगडित असलेल्या अल-निनोचा परिणाम हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. अल-निनो परिणाम म्हणजे प्रशांत महासागरात असलेले ताहिती नावाचे बेट आणि पेरू या देशाच्या किनारपट्टीजवळून वाहणारा गरम पाण्याचा प्रवाह होय. या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे हजारो चौरस कि.मी. क्षेत्रफळावरील पाण्याचे तापमान वाढण्यास सुरुवात होते. ही तापमान वाढ एक अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास त्याचा पावसाच्या अंदाजावर फारसा परिणाम होत नाही. मात्र, एक ते दीड अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यास पावसाचा अंदाज वर्तविताना या तापमान वाढीचा (अल-निनोचा) प्रभाव विचारात घ्यावा लागतो. अल-निनो तीव्र असल्यास तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढते. या वाढलेल्या तापमानामुळे प्रशांत महासागरात पाण्यालगतची हवा गरम होऊन तिचे बाष्पात रूपांतर होते व ती उंचावर निघून जाते. त्यामुळे या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. हिंदी महासागर व प्रशांत महासागर यांच्यावरील हवेचा दाब एकमेकांशी निगडित असल्याने हिंदी महासागरात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. चांगला मोसमी पाऊस पडण्यासाठी हवेचा दाब हा कमी असावा लागतो. त्यामुळे अल-निनो आल्यास भारत व त्याच्या शेजारील राष्ट्रांत मोसमी पाऊस कमी पडतो वा पडतही नाही. हा अल-निनो दरवर्षी येतोच असे नाही. अल-निनो सोडून सोळा पैकी इतर पंधरा घटक अनुकूल असल्यास अल-निनोचा मॉन्सूनवर परिणाम होत नाही. गेल्या काही वर्षांत अल निनोमुळे पॅसिफिक महासागरातील समुद्राचा पृष्ठभाग उबदार होऊ लागला असून, वाऱ्याचा वेग आणि मार्ग यामध्ये बदल होत आहे. त्याचा ऋतुमानाच्या चक्रावरही वाईट परिणाम घडत असल्याने बऱ्याच देशात दुष्काळसदृश तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणे हे प्रकार अनुभवत आहोत. अल निनोमुळे इ..स.१८७० च्या नंतर सर्वत्र सगळ्यात जास्त उष्मा जाणवू लागला आहे. पुढील भागामध्ये एल निनोचा महाराष्ट्रातील मराठवाड्यावर होणारा परिणाम पाहू. संपर्कः के. के. डाखोरे, ७५८८९९३१०५ (अखिल भारतीय समन्वयीत कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.