हरभरा पिकावरील तांबेरा रोगाचे असे करा व्यवस्थापन 

हरभरा पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव
हरभरा पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव

यंदा मराठवाड्यात उशिरापर्यंत थांबलेल्या पावसामुळे रब्बी पेरणी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, लातूर व औरंगाबाद जिल्ह्यात हरभरा पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असून, सध्या पीक काढणी अवस्थेत आहे. या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दहेगाव (ता. वैजापूर) येथील दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील हरभरा पिकामध्ये तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले. त्याची पडताळणी वनस्पती विकृतीशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मदर्शिकेद्वारे केल्यानंतर तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव निश्चित करण्यात आला. प्रादुर्भावाची कारणे  तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्यामागे वातावरण बदल हे मुख्य कारण असावे. मराठवाड्यात बहुतांश भागांमध्ये हरभऱ्याची उशिरा पेरणी झालेली असून जानेवारी महिन्यापासून सातत्याने ढगाळ वातावरण राहिला. पिकाला पुरेसा स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाला नाही. या कारणासोबतच हरभरा पिकाची दाट पेरणी, नत्र खतांचा अधिक वापर, तणांची अधिक वाढ व उशिरा पाणी देणे यामुळेही तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.  लक्षणे 

  • तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून, हरभरा पिकामध्ये हा रोग ‘युरोमायसिज’ वर्गातील ‘सिसरिज ॲरिएटिनी’ या जातीच्या बुरशीमुळे होतो. या बुरशीला जगण्यासाठी जिवंत झाडांच्या भागांची गरज लागते. 
  • सर्वप्रथम पानाच्या खालील बाजुला लालसर तपकिरी रंगाच्या पुळ्या दिसतात. अशा असंख्य पुळ्या पानांच्या दोन्ही बाजुला, खोड, फांद्या तसेच घाट्यांवर दिसतात. 
  • पिकांची वाढ पूर्णावस्थेकडे झुकत असताना; हवेतील तापमान वाढत जात असताना या पुळ्यांचे रूपांतर काळ्या रंगात होते. 
  • ठिपके मोठे होऊन नारंगी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. 
  • या रोगांचा प्रसार ओलसर दवबिंदूच्या वातावरणात बीजाणूंमार्फत हवेतून फार दूरवर होतो. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर हे बिजाणू उगवतात. 
  • ठिपक्यांमुळे पेशीद्रव्यपटल मृत होते. परिणामी प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावून पिकाचे उत्पादन कमी होते. गुणवत्ता खालावते. 
  • यंत्र, गाड्या, हत्यारे, कपडे आणि पायताणे याद्वारेही या बिजाणूंचे वहन होवू शकते.
  • पीक फुलोऱ्यात आल्यानंतरच या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. हा रोग प्रामुख्याने गहू, बाजरी, ज्वारी, ऊस, मका, अंजीर, वटाणा आणि भुईमूग आदी पिकांसह अनेक शोभिवंत झाडांवर आढळून येतो. 
  • व्यवस्थापन 

  • पेरणीकरिता प्रमाणित, बीजप्रक्रिया केलेल्या योग्य वाणाच्या बियाण्याचा वापर करावा.तांबेरा प्रतिरोधक जातींचा (गौरव, आयपीएफडी-९-२, आदी) पेरणीकरिता वापर करावा. 
  • कृषी विद्यापीठ शिफारशीनुसार पेरणी करावी. पेरणी उशिरा होणार नाही. तसेच पीक जास्त दाट होणार नाही, याची काळजी घ्यावी. 
  • रासायनिक खतांची संतुलित मात्रा द्यावी. विशेषत: नत्राचा शिफारशीपेक्षा अधिक वापर टाळावा.
  • पिकाच्या गरजेपुरतेच व वेळेवरच पाणी द्यावे. 
  • वेळेवर आंतरमशागत करून पीक तणमुक्त ठेवावे.
  • पिकाचे नियमितपणे निरीक्षण करावे. प्रादुर्भाव झालेली झाडे उपटून शेताबाहेर जाळावीत किंवा जमिनीत गाडावीत.
  • रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच, फवारणी प्रतिलिटर पाणी प्रोपिकोनॅझोल (२५ टक्के ईसी) १ मिलि. किंवा
  • मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड ३ ग्रॅम किंवा झायनेब (७५ टक्के डब्लूपी) ३ ग्रॅम. 
  • पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
  • पाण्यात विरघळणाऱ्या गंधकाची एकरी एक ते दीड किलो या प्रमाणात फवारणी करावी.
  •  : प्रा. किशन रेवाळे, ९७६५९८४६४४ (वनस्पती विकृतीशास्त्र विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com