हवामान उष्ण, कोरडे राहणार...

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर एक समान १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील, त्यामुळे या आठवड्यात फार मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत. दिनांक १३ एप्रिल रोजी पूर्व किनारपट्टीवर हवेचा दाब कमी होऊन १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मात्र दिनांक १४ एप्रिल रोजी सर्व उत्तर भारतातील हवेचे दाब कमी होऊन ते १००८ हेप्टापास्कल इतके राहतील. त्यामुळे वारे दक्षिणेकडून व नैऋत्येकडून उत्तर भारताच्या दिशेने वाहतील. ही बाब मान्सूनचा रस्ता तयार करणारी असून, या वर्षी हा रोडमॅप लवकर तयार होत आहे. त्यामुळे मान्सून वेळेवर दाखल होणे तसेच चांगला मान्सून होण्यास हे चिन्ह दिशादर्शक आहे.
The weather will remains warm and dry
The weather will remains warm and dry

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर एक समान १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील, त्यामुळे या आठवड्यात फार मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत. दिनांक १३ एप्रिल रोजी पूर्व किनारपट्टीवर हवेचा दाब कमी होऊन १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मात्र दिनांक १४ एप्रिल रोजी सर्व उत्तर भारतातील हवेचे दाब कमी होऊन ते १००८ हेप्टापास्कल इतके राहतील. त्यामुळे वारे दक्षिणेकडून व नैऋत्येकडून उत्तर भारताच्या दिशेने वाहतील. ही बाब मान्सूनचा रस्ता तयार करणारी असून, या वर्षी हा रोडमॅप लवकर तयार होत आहे. त्यामुळे मान्सून वेळेवर दाखल होणे तसेच चांगला मान्सून होण्यास हे चिन्ह दिशादर्शक आहे. महाराष्ट्रातील नगर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत या आठवड्यात पारा ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही बाब तापमान वाढून हवेचा दाब कमी करण्यास व वारे उत्तर दिशेने वाहण्यास अनुकूल ठरेल. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. त्यामुळे दिशा निश्‍चिती लवकर होणे ही बाबही समाधानकारक मान्सून होण्यास अनुकूल ठरेल. या आठवड्यात कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता आहे. कोकण कोकणातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यात प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर व ठाणे जिल्हे असतील. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, जिल्ह्यांत ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १२ एप्रिल रोजी १२ मि.मी. व दिनांक १४ एप्रिल रोजी ४ मी.मी. पावसाची शक्‍यता राहील. सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून तर रत्नागिरी जिल्ह्यात ती नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ५ मि.मी. इतका कमी राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यांत ५० ते ५७ टक्के तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ती ६३ ते ६४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २५ टक्के राहील, त्यामुळे हवामान कोरडे व उष्ण राहील. उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ते ४३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. या आठवड्यात या विभागात आकाश निरभ्र राहील व पावसाची शक्‍यता नाही. मराठवाडा बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. उर्वरीत लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ते ४१ अंश सेल्सिअस राहील, तर उस्मानाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत या आठवड्यात कमाल तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस राहील. तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. लातूर व नांदेड जिल्ह्यांत या आठवड्यातील काही दिवशी हवामान अंशतः ढगाळ राहील. मात्र उर्वरित जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४९ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील. यापुढे तापमानातील वाढ कायम राहील. पश्‍चिम विदर्भ वाशिम जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील, तर बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ते ४३ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. अमरावती व बुलढाणा जिल्ह्यांत ते २४ अंश सेल्सिअस राहील. तसेच वाशिम जिल्ह्यात ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्‍यता कमी आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५० टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अकोला जिल्ह्यात २३ टक्के व उर्वरित जिल्ह्यांत १९ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. मध्य विदर्भ मध्य विदर्भात सुरुवातीस यवतमाळ जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. मात्र त्यात वाढ होऊन नंतर ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तशीच स्थिती नागपूर जिल्ह्यात राहील. मात्र वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. मात्र, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ५० टक्के राहील. पूर्व विदर्भ गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ते ४१ अंश सेल्सिअस राहील व याच आठवड्यात त्यात वाढ होऊन ते चंद्रपूर जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस तर गडचिरोली जिल्ह्यात ते ४२ अंश सेल्सिअस आणि भंडारा जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५९ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र नगर जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. मात्र दोन दिवसांत त्यात वाढ होऊन ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्‍य आहे. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ते ४१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, तर सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ते २५ अंश सेल्सिअस राहील. सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ६२ टक्के तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ती ४३ ते ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते २१ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ५ किलोमीटर राहील, वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.

कृषी सल्ला

  • आठवड्यात कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ होईल.त्यामुळे पिके, जनावरांची पाण्याची गरज वाढेल. पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे.
  • जनावरांना सावलीत बांधावे. पुरेसा हिरवा चारा, पशुखाद्य द्यावा. आरोग्याची काळजी घ्यावी.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र राज्य)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com